Cha village seen at a distance surrounded by the green farms with a rickety wooden bridge over river Lungnak to cross over to Purne is a homestay option for the first night halt on the trek to the remote and isolated Phuktal or Phugtal monastery or gompa passing through a deep gorge or ravine formed by the Lungnak, a tributary of the Indus river between the brown, golden and barren Greater Himalayan and Zanskar mountain ranges in the offbeat Zanskar valley in Jammu and Kashmir in North India.

01 पूर्वरंग – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

We are Chetan and Sandeepa at Tso Moriri, Ladakh, Indiaआम्हाला एका वेडानं झपाटलं. नवीन वाटा, प्रदेश आणि एका अनोख्या अनुभवाचं वेड. त्याचीच ही कथा. मी चेतन, जाहिरात-डिझाईन क्षेत्रातला तर संदीपा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर. एकदम सुखवस्तू. निसर्गाची ओढ आणि त्यासाठी प्रवासाची आवड असे गुण जुळले आणि आम्ही म्हणलं ‘चला लग्न करू यात’. लग्न झालं आणि आमची भटकंती प्रचलित आणि अप्रचलित ठिकाणी सुरु झाली. ह्यात मजा होती पण फिरण्याची आमची भूक वाढत होती. ह्याचं कारण होतं इन्टरनेट.

‘आपुल्या जातीचे’ अजून कोण आहेत हे आम्ही नेटवर शोधू लागलो आणि थक्क झालो. सहा महिने, वर्ष, दोन वर्षं अशी मॅरेथॉन प्रवास करणारी ही मंडळी (काही भारतीय, बरेचसे परदेशी). आपले हे भन्नाट प्रवास ते travelpod.com ह्या वेबसाइटवर मांडत होते आणि आम्ही ते वाचून अजूनच पेटत होतो! मनात एक मध्यमवर्गी विचार डोकावायचाच. बरं भागतंय यांचं. नोकरी, पैसे, संसाराचे ताप; काही नको. मनासारखं फिरावं, फोटो काढावे, लिखाण करावं, एक निर्भेळ आनंद. मग लक्षात आलं त्यांना त्यांच्या कॉर्पोरेट संस्कृतीत सबॅटिकल लिव्हचा पर्याय आहे. आम्ही मात्र मुकाटयानं दोन-तीन दिवस, फार तर आठवडा फिरायचं आणि दुधाची तहान ताकावर भागवायची. नाहीतर नोकरी सोडायची!….ते कसं जमायचं… असो…आम्ही दोन वर्षांच्या प्रवासाच्या कथा ह्या वेबसाइटवर लिहायला सुरुवात केली. प्रतिक्रिया मिळू लागल्या, उत्साह कायम राहिला. आमच्या मनात एका स्वप्नाचं धूसर बीज पेरलं गेलं.

एका स्वप्नाची सुरुवात

टूरिंगविषयीचं वाचन हे नेहेमीचंच झालं. नवे ब्लॉग्स, वेगवेगळी माहिती आणि आमच्या पर्यटनज्ञानात पडणारी रोजची भर. हळूहळू लक्षात आलं की दिसतं तितकं हे साधं नाही. पण आपला विचार साधा असला तर हे शक्य आहे. पैशासाठी नोकरी, नोकरीतून पैसा ह्या गरगरत्या चक्रातून कायमचे बाहेर पडलेले अनेक अवलिये नेटवर ओरडून सांगत होते ‘अरे सगळं होतं, करून तर बघा’. समजा वडाळा-दादर स्टेशनला टॅक्सी ऐंशी रुपये घेत असेल; आपण १५ रुपयात बसनी गेलो तर? असं जगणं कायमचं बदलणारे निर्णय! थोडी सोय, थोडी गैरसोय. गरजा कमीतकमी आणि सहज भागणाऱ्या. शक्य आहे हे? आमच्या मनाची तयारी सुरु झाली. त्यादरम्यान couchsurfing.com या पर्यटकांसाठी असलेल्या खास वेबसाइटवर आम्ही नाव नोंदवलं. अतिशय सुंदर कल्पना. तुमच्या शहरात येणाऱ्या परदेशी पर्यटकांचं तुम्ही यजमान म्हणून आदरातिथ्य करा. त्याचा मोबदला काहीही नाही हीच पूर्वअट. त्या बदल्यात नवे परदेशी मित्र, अचाट अनुभव आणि नव्या देशातलं सहज मुक्कामाला जाता येणारं एक घर कमवा. युरोप, कॅनडा ते अर्जेन्टिना, कॉस्टारिका मधले ‘भटके’ आमच्याकडे अधूनमधून आपली पथारी पसरू लागले. आमच्या बरोबर हसू-खेळू-जेवू लागले. आम्ही एकमेकांना फिरण्याचा अनुभव सांगू लागलो. दिवसागणिक ते जगाच्या वारीचं स्वप्न गडदच होत गेलं. त्याभोवती आमचं सगळं जगणं एकवटलं आणि ते प्रत्यक्षात उतरवायची तयारी आम्ही सुरु केली.

पूर्वतयारी

एका आगळ्या मुशाफरीसाठी आम्ही सज्ज होत होतो. जवळच्या सेव्हिंग्सचा ताबडतोब आढावा घेतला. तेवढयावर भागेल असं लक्षात आल्यावर आम्ही दोघांनीही आमच्या स्वीकृत कामाला कायमचा रामराम ठोकला. आता आमचे आम्ही आणि अज्ञात ठिकाणी नेणाऱ्या सुरेख नागमोडी वाटा. मुंबईमधील घर विकून आवश्यक असलेला पैसा उभा करण्याचा आमचा विचार पक्का होता. त्याप्रमाणे पेपरात फ्लॅट विक्रीसाठी जाहिरात दिली. पण समाधानकारक किंमत मिळेना म्हणून काही महिने हा घरविक्रीचा कार्यक्रम पुढे ढकलला. एक मोठा अडथळा; घसघशीत पोकळी. अचानक एक कल्पना चमकून गेली. आता नोकरी नव्हती, काम नव्हतं. सगळा वेळ संपूर्णपणे आमचा होता. आम्ही ठरवलं ह्या राउंड-द-वर्ल्ड (आर.टी.डब्ल्यू) ची देशी रंगीत तालीम करू. कसं वाटतंय बघू. मे महिन्याचे दिवस. आम्ही तातडीनं जम्मू काश्मीरला प्रयाण केलं. श्रीनगरमध्ये ‘गर्मी’ आणि ‘गर्दी’ यांचं असं काही मिश्रण जमून आलं होतं की आम्ही मुंबईत होतो ते काय वाईट होतो असं वाटून गेलं! यातली अतिशयोक्ती सोडली तर आम्हाला वेगळा अनुभव घ्यायची जणू तहानच लागली होती. म्हणून फारशा प्रचलित नसलेल्या ठिकाणांचा शोध सुरु झाला. दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग, अचबल, दकसुम, सिन्थनटॉप, वेरीनाग हा पल्ला पूर्ण केला. आमच्या शिकवणीचा पहिला धडा वीज नसलेल्या छतपाल ह्या गावातून सुरु झाला; जगण्यासाठी वीज अत्यावश्यक नाही! मग अमरनाथ यात्रा घडली, कुपवाराजवळ रेशवारी, लोलाब खोऱ्यात फिरलो. कयानबोल ह्या ठिकाणी पीरबाबाच्या थडग्याला भेट देण्याचा अनुभव केवळ थरारक होता. हे ठिकाण अंतरराष्ट्रीय सीमेच्या केवळ पंचवीस मीटर अलीकडे. सात गाडयांमध्ये आमच्यासह इतर पर्यटक भरलेले आणि मागे पुढे भारतीय सेनेचे अवाढव्य ट्रक्स. आमचं राष्ट्रीय महत्व फारच वाढलं होतं त्या दिवशी. हे ठिकाण प्रतिबंधित क्षेत्रात येतं. भारतीय सेना वर्षातून फक्त पंधरा दिवस सद्भावना यात्रा म्हणून भाविकांसाठी ही सवलत देऊ करते. आम्ही खूप सुदैवी होतो.

अनुभवांचं तळं थेंबे थेंबे साचत होतं. किती अनुभव. म्हणजे प्रवासाला चार चाकं असलेलं कोणतंही वाहन चालतं, उदाहरणार्थ इंडियन ऑईलचा ट्रक वगैरे! तो पण शिवनेरी एसी बसइतकाच सुखाचा असतो. प्रवास संपला की नदीच्या काठाशी त्या ट्रकमध्ये रात्रभर झोपायची सोय पण होते. हा झाला परकाचिक ते झंस्कार प्रवास.
The group that traveled in the trucks to Zanskar
हे झंस्कार म्हणजे थोरच प्रकार. संडास बाथरूम हा विषयच नाही. वीस ते पंचवीस उंबऱ्यांचं गाव खूप मोठं झालं इथे. सगळ्या प्रदेशात मिळून एकच पेट्रोल पंप. आणि नकाशे काही ठिकाणी चक्क ‘इथून पुढे रस्ता संपला’ हे सांगणारे. आम्ही खरोखर काश्मीरच्या सुदूर भागात पोहोचलो याची जाणीव झाली. ह्या गैरसोयींचा विसर पाडायला लावत होता तिथला निसर्ग. झाडं, पानं, फुलं, रस्ते, तळी, वळणदार वाटा, हिरवंगार गवत आणि प्रेमळ माणसं. पाहण्यासारखं अजून काय असतं जगात? सुरु आणि झंस्कार खोरी झाल्यावर मग फुकताल, लडाख आणि मग मनाली, चंदीगड, अमृतसर आग्रा दिल्ली असा परतीचा प्रवास झाला.

आम्ही तीन महिने प्रवासात होतो! शरीराचं आणि मनाचं भरपूर वजन घटलं. आम्ही हलके झालो. अनुभवांनी काठोकाठ भरलो. ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर येऊन आम्ही खुल्या दिलानं जगण्याला पुकारलं आणि त्यानं आम्हाला निराश केलं नाही. खांदयावर संसार घेऊन फिरणं, असेल ते खाणं, कुठेही राहाणं, परक्या लोकांवर सहज विश्वास ठेवणं. किती शिकलो आम्ही. वर्ल्ड कॅन बी अ सेफ प्लेस ह्याचा प्रत्यय आला. आमची रंगीत तालीम जोरात पार पडली. मुख्य प्रयोगाची धडधड वाढू लागली.

आर टी डब्ल्यू – पहिलं पाऊल

राउंड द वर्ल्डची तयारी सुरु झाली. घराचे पैसे येणारच होते. सोशल मिडिया मध्ये आम्ही आमचे अनुभव व फोटो शेअर करू लागलो. आम्ही स्वतः sandeepachetan.com तयार केली व सजवली. नॅशनल जिऑग्राफिक आणि याहू ट्रॅव्हलनं आमच्या फोटोची आणि प्रवासाची दखल घेतली. येणाऱ्या प्रतिसादांनी आमचा आत्मविश्वास वाढला. मार्गदर्शन करा म्हणून मेल्स आल्या. परदेशी मित्रांच्या ‘लवकर या, वाट पहातोय’ अशा हाका अजून जोरात ऐकू येऊ लागल्या. भारताच्या पासपोर्ट धोरणातील गुंतागुंत लक्षात घेता सलग एक वर्ष फिरता येणार नाही हे कळलं. म्हणून आम्ही पहिल्या प्रवासाला लॅटीन अमेरिका निवडलं. ह्याची कारणं अनेक होती. एरवी थोडयाच दिवसांत घाईघाईनं हा टूरिस्ट कार्यक्रम ‘उरकला’ जातो. वेळ आणि अंतराचं गणित बसत नाही. आम्हाला वेळ पण होता आणि अंतराचा फरक पडत नव्हता. त्यात पुन्हा खर्च पण इतर देशांच्या तुलनेत कमी येणार होता. ह्या निमित्तानं मुख्यत्वे ब्राझील, अर्जेन्टिना, बोलिव्हिया आणि इक्वेडोर मधील अप्रचलित ठिकाणांना भेट देण्याचा आमचा हेतू सफल होणार होता. सगळी तयारी झाली. व्हिसा आला.

आता हुरहूर आहे आपल्या देशापासून लांब जाण्याची, संपूर्ण अपरिचित निसर्गाची, संस्कृतीची, माणसांच्या अगणित वाणांची आणि उत्तरोत्तर समृद्ध करत जाणाऱ्या एका कोवळ्या अनुभवाच्या उबदार घोंगडयाची! आम्ही आता कधीही निघणार. तुम्ही जेव्हा हे वाचत असाल तेंव्हा बहुतेक आम्ही रीओ मध्ये कोपाकबाना बीचवर ‘हँगआऊट’ करत असू.

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW Series.

2. पावलो’पुरता प्रकाश
3. लीबेर्दार्ज म्हणजे
4. सूर्याचं आणि ‘प्राया’चं रिओ
5. मोठया बेटाची निळी कहाणी
6. सैतानी घसा आणि सैतानी प्रवास
7. ‘आमचं’ बोयनॉस आयरेस
8. व्हिसा, रोसा.., ‘माते’की जय
9. ‘साऊथ’चं समुद्र-स्वप्न
10. हिमसाम्राज्याचे शिलेदार
11. निसर्ग-दान – राउंड द वर्ल्ड
12. रोमान्स, रोष आणि रंग
13. सीमेवरचा जीवनोत्सव
14. इथला नसे हा सोहळा
15. सरळ सपाट सालार
16. सुट्टीचे शुभ्र ‘सुक्रे’!
17. पाचामामा ते चांदोमामा
18. ओळखीचं; जुन्या नव्या
19. संस्कृतीच्या मांडवाखाली
20. शहरवाटांची शिकवणी
21. पर्वतांतला पाचू: माचूपिचू
22. जळ वाळूचे सकळ
23. महासागरांचे मावंदे
24. ‘अमेझिंग’ अॅमेझॉनकडे
25. सोनेरी सापाच्या पाठीवरून
26. नाव आहे चाललेली…
27. पाहावं ते नवलच!
28. उद्धवा, अजब तुझे अॅमेझॉन
29. परतीची वाट
30. शेवट आणि शून्य
31. राऊंड द वर्ल्ड- व्हाया ठाणे
32. इथून पुढे- न्यूझीलंड
33. वाटाघाटीच्या वाटेनं..!
34. ‘हक्काचं’ ऑकलंड
35. गुहेतलं गुपित
36. ‘सरळ’ वळणाचा देश!
37. अॅब्सुल्यूटली पॉझिटिव्हली वेलिंग्टन
38. ऐसपैस अनुभव
39. माणसं- कडू आणि गोड
40. सुंदराचे सोहळे
41. छोटंसं मोटुएका
42. मन शुद्ध तुझं
43. भूकंप: एक विषयांतर