‘वेलकम अॅबोर्ड द इंटरअायलंडर’! त्या भव्य जहाजाच्या दारात परिचारिका आमचं स्वागत करत होत्या. न्यूझीलंडचे उत्तर आणि दक्षिण न्यूझीलंड असे दोन भाग पडतात. ह्या भागांना इंटरअायलंडर नावाच्या बोटसेवा जोडते. आम्ही उत्तरेच्या वेलिंग्टनहून दक्षिणेच्या पिक्टनकडे चाललो होतो. ‘बुकिंग-बाई’नं फक्त आडनावाची खात्री करून आम्हाला सामान कन्व्हेयर बेल्टवर ठेवायला सांगितलं. जहाजात पाय ठेवताच नेहेमीसारख्या सीटस् दिसल्या. इतक्यात बसायची इच्छा नव्हती. हळूहळू जहाजाचं अंतरंग उलगडलं. पुढं गेल्यावर लाकडी बाकं असलेलं रेस्टॉरंट, त्यापलीकडे ज्यूकबॉक्स, गेम्स! मग एक कॅफे आणि मागचा भाग. इथं मात्र गर्दी जमलेली! त्याचं कारणही तसं होतं. ह्या भागात निवांत पडून प्रवासात समुद्र बघता यावा म्हणून खुर्च्यांची सोय होती. आणि त्या एकनएक खुर्चीवर बारके चायनीज डोळे चमकत होते! आत्ता आमच्या लक्षात आलं की ही ‘पि(व)ळा’वळ रांग सुरु झाल्यावर पहिल्यांदा का धावली ते!
त्यांच्याकडे अत्यंत उदारपणे पाहात मागचं दार उघडून डेकवर आलो. संध्याकाळचे चार वाजलेले. वेलिंग्टनचं ते निळं गहिरं पाणी बोटीच्या पंख्यानं डहुळलं आणि भरारा वारा येऊ लागला. इंटरअायलंडर आम्हाला पोटात घेऊन निघाली. ओळखीचे किनारे मागे पडले आणि बोट खुल्या समुद्रात घुसली. डेकवरचा वारा हळूहळू थंडीची भट्टी पेटवत गेला आणि आम्ही थंड थंड होत गेलो. शेवटी कुडकुडत आत आलो. सुरेख सोफा आणि आतल्या गरम उबदार हवेत विरघळू लागलो.
पिक्टन आलं तेव्हा अंधारलं होतं. बोट पोहोचण्याच्या आणि आमची पुढची बस येण्याच्या वेळेत फक्त पंधरा मिनिटांचं अंतर होतं. आम्ही इथून थेट ‘नेल्सन’ शहरात चाललो होतो. उतरल्यावर घाईघाईनं सामान घेऊन बसथांब्यापाशी आलो. तिथं एक मुलगी उभी. ‘नेल्सनला जाणारी बस इथूनच सुटते ना?’ आम्ही तिला विचारलं. ती ‘हो’ म्हणाली तरी आमच्या चेहऱ्यावरची काळजी गेली नाही! ह्याचं कारण म्हणजे सहाला पाच कमी होते आणि मनात प्रश्नाचं मोहोळ! गेली तर नसेल ना? का रद्द झाली असेल? बस भलत्याच ‘फलाटावर’ नाही ना लागली? ती शेजारची मुलगी मात्र तेव्हा भयंकर शांतपणे उभी होती. आम्ही न राहवून तिला परत विचारलं आणि लक्षात आलं की ती या मार्गावरून रोज जाणारी होती. ‘आत्ता येईल बस’ म्हणून तिनं सांगितलं. आणि खरोखर सहा वाजता एक झोकदार वळण घेऊन बस आमच्या समोर लागली. स्वारगेटवर ‘साहेब सहाची बस किती वाजता येणार आहे?’ या अचाट प्रश्नाला सरावलेल्या आमच्या मनाला हा धक्का होता!
एक उंच, ढेरपोटया आणि कुरळ्या केसांचा चालक हसतमुखानं सामोरा आला. इतका हसतमुख की ‘ही इज अ जॉलीगुड फेलो’ ही ओळ त्याला समोर बसून लिहिली असावी! प्रवास सुरु झाला. काहीजण नंतरच्या थांब्यांवर चढले. त्यानंतर थोडयाच वेळात त्या संध्याकाळची गंमत सुरु झाली. एका प्यायलेल्या इसमाला अचानक कंठ फुटला. ‘रावबाजी’ आपल्या खास ढंगात चालकाला, ‘जोरात चालव, आणि असा इकडून जा!’ तू वेगात चालव, वगैरे सल्ला द्यायला सरसावले! तरी बरं जागेवर बसूनच हे चाललं होतं. दारू प्यायल्यावर माणसं किती बोलू शकतात हे वेगळं सांगायलाच नको! ‘जॉली गुड फेलो’ मात्र हसत होता, मजा घेत होता. त्याच्याकडे न्यूझीलंडच्या रस्त्यावर चालणाऱ्या यच्चयावत नागरी वाहनाचं ‘लायसन’ होतं. त्याला कुठल्याच सल्ल्याची गरज नव्हती!
नेल्सनला पोहोचल्यावर त्यानं आम्हाला यूथ हॉस्टेलला कसं जायचं ते सांगून ‘गुडनाईट’ केलं. हॉस्टेलला पोहोचलो तर दाराला कुलूप! असं कधी शक्यतो होत नाही. तिथली घंटा वाजवली. एका मुलीनं दार उघडलं. ‘आम्ही यूथ हॉस्टेलचे सभासद आहोत’ असं सांगत तिला जागा मागितली. मुलगी थंड. त्याच थंडपणे तिनं ‘रिझर्व्हेशन’ आठला बंद होतं’ म्हणून चक्क आम्हाला जागा दयायला नकार दिला. दुसरीकडे कुठे जागा मिळेल ह्यालाही तिनं माहीत नाही असं उत्तर दिलं. भारतात हे सहज पचलं असतं पण न्यूझीलंडमध्ये असला असहकार सहन होत नव्हता. आम्ही ‘काऊचसर्फिंग’वर केलेल्या विनंतीचं काय झालं बघायला इंटरनेट द्या म्हणून विनंती केली त्यालाही ‘नन्ना’चा पाढा! चडफडत नवी जागा शोधायला लागलो. शेजारीच एक अजून हॉस्टेल मिळालं. छप्पर ‘घावल्याच्या’ नादात झोप ‘बेष्ट’ लागली!
नेल्सनमध्ये शनिवार हा बाजारचा वार असतो. बाजारात धातू, लाकूड आणि सुतापासून तयार केलेल्या असंख्य वस्तू होत्या. इथल्या माओरी जमातीशी नातं सांगणाऱ्या. आम्ही जत्रेतून मौज बघत निर्हेतुक फिरत होतो. अचानक एका गोड गोष्टीनं आमचं लक्ष वेधून घेतलं. मानुका नावाच्या एकाच फुलापासून जमा झालेला मध विकणारे अनेकजण तिथं होते! हा मध चाखून राहावलं नाही. आम्ही तसे आठवण म्हणून काही विकत घेणाऱ्यातले प्रवासी नाही, पण हा मध मात्र घेतला. फळाफुलांनी आणि खाद्यपदार्थांनी बाजार तुडुंब भरलेला. एकदम एका पपेटच्या स्टॉलकडे लक्ष खेचलं गेलं. ती बाहुली आपल्या रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुलीसारखी होती. झगझगीत लाल शर्ट, पांढरी पँट आणि पांढरा शर्ट घालून तिचा ‘बोलावता धनी’ शेजारीच बसलेला होता. बाहुलीची आणि त्या कलाकाराची देहबोली एकदम सारखी! ते दुकान अक्षरशः परीकथेत शोभेल असले दागिने, पोशाख आणि इतर शोभेच्या वस्तूंनी गच्च भरलं होतं. नेल्सन हे ‘वॉव’, म्हणजे ‘वर्ल्ड ऑफ वेअरेबल फॅशन’ म्हणून प्रसिद्ध आहे. अत्यंत ऊटपटांग साधनं वापरून शिवलेला कपडा इथं मिळतो! ह्या कलेतही तो बाहुलीवाला तरबेज असावा. कारण आम्ही त्याचे फोटो काढत असताना एक बाई येऊन अदबीनं त्याच्या फॅशनकलेचं कौतुक करून गेली.
तुम्हाला ईमेलवर फोटो पाठवतो म्हणल्यावर त्याचे डोळे चमकले. त्याच्यातला कलाकार जागा झाला. हातातलं बाहुलं खाली ठेवून तो उद्गारला, ‘एवढं सोपं नाही ते!’ जणू त्याचा ईमेल आयडी देणं हा एक विधी असावा तसा त्याचा चेहरा! संदीपाला आपलं अंगठीचं बोट त्यानं पुढं करायला सांगितलं. तो कुशल हात आता झरझर त्या बोटाचं माप घ्यायला लागला. थोडयाच वेळात एक सुंदर, नाजूक गुलाबाची अंगठी त्याच्या हातात तयार झाली होती. आपल्या सुरेल इंग्रजीत त्याचा आवाज किणकिणला, ‘अँड होम इज व्हेअर, मे आय नो?’ आम्ही म्हणालो, ‘इंडिया’! तो गूढ हसला आणि मान हलवली. पठ्ठा पुस्तक लिहायला म्हणून महिनाभर उदयपूरमध्ये तळ ठोकून राहून आला होता! ‘माझ्या लेकरांची आई माझ्यापेक्षा जास्त वेळ भारतात काढते!’ त्यानं आम्हाला सांगितलं. अजून ईमेल गुलदस्त्यातच होता! आम्हाला कळत नव्हतं की तो देण्यात एवढं काय अवघड आहे. अचानक आपल्या समोरच्या एका पाकिटावर नजर टाकत तो पुटपुटला, ‘पण ईमेल तर त्या लखोटयावर लिहिलीये आणि लखोटा नुसता रिकामा कसा द्यायचा?’ असं म्हणत त्यानं झर्रकन ती गुलाबाची अंगठी पाकिटात टाकून संदीपाला ते पाकीट पेश केलं. स्त्री-दक्षिण्याच्या ह्या अस्सल नमुन्यातून परत बराच वेळ बाहेरच आलो नाही!
हॉस्टेल बदलायचं होतं. ज्या मुलीनं आम्हाला प्रवेश नाकारला तिथंच राहायला जायचं होतं. त्या निरागस चिन्यांपासून ह्या निखालस कलाकारापर्यंत भेटलेल्या माणसांत ती तसली ‘जरठ’ मुलगी कशी भेटली हा विचार करतच होतो. एकदम कुणीसं सांगितलं की आम्ही जी सामुद्रधुनी ओलांडून आलो त्याला माओरी भाषेत म्हणतात, ‘बिटर लीव्हज्!’ आम्हाला लगेच ‘त्या’ कडू पानाचा स्त्रोत लक्षात आला!
९२२ शब्द
अभय अरुण इनामदार
vachak.vishesh@gmail.com / rtw@sandeepachetan.com
छायाचित्र : संदीपा आणि चेतन शब्दांकन : अभय अरुण इनामदार
Photos: https://photos.sandeepachetan.com/Article39/
कृपया वाक्ये गाळू नयेत. त्याचे संदर्भ काळजीपूर्वक निवडलेले आहेत.