37 अॅब्सुल्यूटली पॉझिटिव्हली वेलिंग्टन – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

ही ह्वा अतिशय सोसाटयाची. वेगवान मेट्रो आयुष्य, आणि त्याहून वेगानं वाहणारे थंड वारे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन ही जगातल्या सर्वांत वाहत्या हवेच्या शहरांपैकी एक. वेलिंग्टनच्या फुटपाथवरून चालत आम्ही सकाळचे ‘वॉटरफ्रंट’कडे निघालोय आणि वारा एकदम पडलाय. आपण जसे पुण्यात आलेल्यांना पहिल्यांदा शनिवारवाडा, पर्वती पाहा असं आवर्जून सांगतो तसं डार्सी आणि सायमननं आम्हाला वॉटरफ्रंटला जा म्हणून सांगितलं होतं. आठवडयाच्या त्या मधल्या वारी, गडबडीच्या त्या शहरात रिकामे, निवांत आम्हीच वाटत होतो. काळे करडे सूट, स्कर्टस्, बूट आणि स्टीलेटोजमध्ये आमची पावलं विसंवादी पडत होती. सगळे कामाला चाललेले आणि आम्ही पाहायला! हेच आमचं काम होतं.

चालता चालता लांब अंतरावर, मधाच्या पोळ्यासारखी दिसणारी एक इमारत दिसायला लागली. हे न्यूझीलंडचं संसद भवन होतं. आम्ही तिथंच चाललो होतो. मोठया काळ्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो. एका फलकावर संसदेच्या विविध ऑफिसेसची माहिती लिहिली होती. ‘व्हिजिटिंग अवर्स’मध्ये आत जाऊन संसदेचं कामकाजही बघता येतं. एवढया अतिमहत्वाच्या इमारतीला सुरक्षाव्यवस्था नगण्य होती! गार्डची टपरी नाही, सिमेंटच्या पोत्यांमागून रोखलेल्या बंदुकीच्या नळ्या नाहीत, सीसीटीव्हीचे गुप्तपणे वटारलेले डोळे नाहीत! एका सार्वभौम राष्ट्राला आपल्या व्यवस्थेवर एवढा विश्वास आहे हे पाहून आनंद वाटला. आम्ही बाहेर भटकायचं ठरवलं होतं म्हणून न थांबता पुढं निघालो. डाव्या उजव्याचा गोंधळ व्हायचा तो झाला आणि रस्ता चुकलाच! आम्ही नकाशात डोकं खुपसून रस्ता शोधतोय तेवढयात एक पुरुषी आवाज कानावर आला, ‘एक्स्क्यूज मी, इट अॅपिअर्स दॅट यू आर लॉस्ट’. अशी मदत न मागता मिळाली तर कोण कशाला नकाशा बघेल? त्या भल्या गृहस्थानं रस्ता सांगितला आणि आम्ही पुढं निघालो. जाताजाता तो माणूस म्हणून गेला, ‘इट’स अ लव्हली डे, एन्जॉय!’ ते किती खरं होतं! निळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगानं न्यूझीलंडच्या भूमीवर मुक्तपणे उधळण केलेली आहे. पाण्याभोवती इथलं जगणं एकवटलं आहे. पाणी तेच पण किती वेगळं दिसणारं. एक अॅमेझॉनमधलं आणि दुसरं वेलिंग्टनचं!

‘वॉटरफ्रंट’हा बंदराचाच एक भाग. स्वच्छ पांढऱ्या बोटी नांगरून पडल्या होत्या. तरुण मुलं मुली तिथल्या रोईंग क्लबमधून चिंचोळ्या बोटी घेऊन समुद्रात सराव करीत होती. ज्यांना पाण्यात जायचं नाही त्यांना सायकलींचा पर्याय होता. काठाकाठानं निवांत फेरी मारायची सोय होती. न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर जायला इथून बोट मिळते. ही व्यवस्था पहिल्यांदा माओरी जमातीच्या पूर्वजांनी बसवली. ठीकठिकाणी माहितीफलक लावलेले होते. सगळं पाहात हिंडत होतो आणि आभाळात घुसलेलं एक भलं मोठं क्रेनचं टोक दिसलं. पुढं जाऊन पाहातो तो ही अजस्त्र क्रेन पाण्यात एका बोटीवर बसून तरंगत होती. हिकीशिया हे ब्रिटीश काळातलं इंजिनियरिंग आश्चर्य. अवजड मशीन्स, रेल्वेचे डबे आणि काहीही जडशीळ सामान उचलायला ही क्रेन सतत तयार असायची. तब्बल तीस टन वजनाच्या बोटीतलं वाफेवर चालणारं हे यंत्र आता इतिहासाची वैभवी साक्ष देत उभं आहे. न्यूझीलंड आपल्या इतिहासाची आवर्जून नोंद ठेवतं. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होती. ह्या फलकाच्या तळाशी न्यूझीलंडचं मानचिन्ह असलेलं सिल्व्हर बर्च वृक्षाचं एक पान धातूमधून सुबक कोरलं आहे. सूर्य डोक्यावर आला की ह्या पानाची सावली रस्त्यावर पडते आणि ती सावली पाहून येणारे जाणारे ही माहिती पाहायला उत्सुकतेनं पुढं येतात. ह्याच्याच बाजूला पाण्यात सूर मारायला अगदी काठाच्या कडेला हात पसरून उभा असलेला एक सुरेख पुतळा पाहिला. तिथल्या वादळी वाऱ्याला तोंड देत निश्चलपणे उभ्या असलेल्या आणि त्याच धीरानं कर्तव्यासाठी युद्धात जाणाऱ्या मानवी आयुष्याचं ते एक सकारात्मक प्रतीकच होतं. त्या पुतळ्याचं ‘सोलेस इन द विंड’ (वावटळीतला आधार) हे नाव पाहून मनोमन त्या कलाकाराला दाद दिली. खूप वेळ चाललो. दुपार टळली होती. खूप भूक लागली होती. तिथंच एका ठिकाणी बसून राईस क्रॅकर्स आणि टयूना फिश बरोबर आणले होते ते खाल्ले. बसलो होतो ती जागा फार सुंदर सजवली होती. जवळच वेगवेगळ्या कवी-साहित्यिकांनी वेलिंग्टनवर व्यक्त केलेलं आपलं शब्दप्रेम सुरेख कोरलं होतं. बसायच्या बाकांवरही माओरी संस्कृतीची निरनिराळी चिन्हं कोरली होती.

खाऊन झाल्यावर त्याच रस्त्यानं पुढं निघालो. ह्या भागाला ओरीएंटल बे असं नाव होतं. वेलिंग्टनचा बहुधा सर्वात महागडा भाग. त्या वळणदार रस्त्यावरून आलिशान घरं पाहात निर्हेतुक चालत राहिलो आणि अचानक बाकाच्या एका कडेला एक पुष्पगुच्छ खोचलेला दिसला. आम्हाला त्याचं कारण काही कळेना. जवळ जाऊन पाहिलं तर त्यावर एक संदेश होता. आपल्या दिवंगत लहान मुलीची आठवण म्हणून तिच्या घरच्यांनी ही फुलांची सुरेख श्रद्धांजली तिला वाहिली होती! संध्याकाळ होत चालली होती. बघत बघत खूप लांब आलो होतो. तिथूनच परत वळलो.

सकाळी येताना रेल्वे स्टेशन दिसलं होतं म्हणून परत येता येता तिथं गेलो. एकदम लक्षात आलं की आम्ही वेलिंग्टनला पहिल्यांदा बसमधून इथंच उतरलो होतो. अंधारात त्या दिवशी ते लक्षात आलं नव्हतं. पुढं आलो तर स्टेशनच्या बाहेर चक्क गांधीजींचा पुतळा! थक्क झालो. पुतळ्यासमोर जाऊन उभे राहिलो. तिथल्या फलकावर लिहिलं होतं, ‘भारतीयांकडून वेलिंग्टन शहरास सप्रेम’ (अर्थात इंग्लिशमध्ये!) आणि खाली महात्म्याचं ते प्रेरणादायी वाक्य, ‘ ‘बी द चेंज यू विश टू सी!’ ह्या जगात ह्याहून सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं दुसरं वाक्य नाही. आणि ते वेलिंग्टन मध्ये आम्हाला वाचायला मिळालं ह्यासारखा दुसरा आनंद नव्हता. कारण वेलिंग्टनचं घोषवाक्यच मुळी ‘अॅब्सुल्यूटली पॉझिटिव्हली वेलिंग्टन’ असं आहे! ह्याचा प्रत्ययही आम्हाला आज जागोजागी फिरताना आला होता. ह्या अगदी सर्वार्थानं सकारात्मक योगायोगामुळं फार खुश होऊन घाईनं घरी निघालो. त्याला कारणही तसंच होतं. ‘बाहेर काही हादडू नका, घरीच जेवायला या’ म्हणून सायमननं आम्हाला बजावलं होतं. परत येताना ‘वॉटरफ्रंट’च्या त्याच दृश्यात कायापालट झाला होता. सकाळची बंद हॉटेल्स उघडली होती, ऑफिसवाले घरी जायच्या आधी एखादं ‘ड्रिंक’ घेत निवांत बसले होते. रंगीत दिवे, उबदार शेकोटया ह्यांनी वातावरण बदललं होतं. ग्रिल्ड स्टेकच्या वासानं भूक चाळवली गेली आणि पावलं घाईनं घराकडं पडली.

जवळजवळ वीस किलोमीटर चालून अक्षरशः थकून गेलो होतो. सायमन भारतीय पद्धतीचं सांगून आम्हाला काय जेवायला देतोय याचीही उत्सुकता होती. घरी पोहोचताच अगदी खास भारतीय पदार्थाचा सुगंध नाकात शिरला. पोटात अजून खवळलं. ‘मद्रास चिकन करी’ एकीकडे शांतपणे ‘पकत’ होती. दुसरीकडे पनीर बटर मसाला आणि डाळ शिजवायची तयारी चालू होती. सायमनकडे एकही मसाल्याचं पाकीट दिसलं नाही. स्वतः सगळं भाजून कुटून तो ओले सुके मसाले तयार करत होता. नान मात्र एका भारतीय रेस्टॉरंटमधून त्यानं आणले होते. आम्ही जेवायला बसलो. ह्या ‘गोऱ्या’च्या हाताची चव चांगलीच भारतीय होती. जेवण चविष्ट होतं. आम्ही आमच्या सकारात्मक वेलिंग्टन अनुभवाची पोतडी उघडली. गप्पा सुरु झाल्या. बोलता बोलता सायमनच्या हातात ही चव कशी आली हेही लक्षात आलं. हा ब्रिटीश माणूस जवळजवळ नऊ वर्ष गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंडत होता! हा बाबा चक्क एक भारतीय आचारीच त्याच्या मठीत आणून ठेवायचा. आचारी त्याच्यासाठी जे शिजवायचा तो हे शिकून घ्यायचा. त्याच्या ह्या निष्ठेची आम्हाला मौज वाटली. जेवण झालं. आवराआवरी करता करता दोन दिवसांनी परत जायचा विषय निघाला. (डार्सीनं आम्हाला दोनच दिवस बोलावलं होतं.) डार्सी आपणहून म्हणाली, ‘हे तुमचंच घर आहे, अजून रहा!’ त्या रात्रीची बहुधा ती सगळ्यात आनंदाची आणि सकारात्मक गोष्ट होती! वेलिंग्टनमध्ये आम्ही जोडलेल्या अॅब्सुल्यूटली पॉझिटिव्ह नात्याची.

vachak.vishesh@gmail.com / rtw@sandeepachetan.com
छायाचित्र : संदीपा आणि चेतन शब्दांकन : अभय अरुण इनामदार

Scroll to Top