28 उद्धवा, अजब तुझे अॅमेझॉन – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

दिवसातून फक्त दोन तास वीज असणे ही शिक्षा समजायची की संधी? आम्हाला तर संधीच वाटत होती. फोन, कॅमेरा, बॅटरीज असं सगळं तेवढयाच छोटया वेळाच्या तुकडयात चार्ज करून घेतलं की अॅमेझॉनचा अजबखाना बघायला मोकळे! ते सुद्धा, हे टिपायचं राहिलं, अरे ते आपण फोटो काढून घेतलं नाही अशी हुरहूर परत लागायला नको म्हणून, नाहीतर डोळ्यांनी जे पाहात चाललो होतो ते खरोखर अद्भुत होतं.

अरण्य-विद्या

जंगल भटकंतीत आमचा मार्गदर्शक वेलेस्डे आम्हाला इतक्या विविध गोष्टी दाखवत होता की नंतर नंतर आम्ही लहान मुलासारखे झालो होतो. आता काय नवीन सापडेल अशा भिरभिरत्या डोळ्यांनी सगळीकडे बघत चाललो होतो. माणूस जगायला लागला तोच मुळी नदीकाठाशी. नदीनं, काठावरच्या अरण्यानं त्याला भरभरून दिलं. तो निसर्गाकडून शिकत सुधारत गेला, स्वतःला घडवत गेला. त्यातल्या बऱ्याच गोष्टी शहरात संदर्भहीन वाटतात. नळ सोडला की पाणी येण्याच्या ह्या काळात वेलेस्डे आम्हाला काहीतरी अतर्क्य दाखवत होता. जाताजाता त्यानं एका झाडाची फांदी तोडली तर त्यातून नळासारखं पाणी! ओंजळ भरा, प्यायला लागा! हा अनुभव आला आणि आम्ही ह्या अरण्य-विद्येच्या प्रेमात पडायला लागलो. वेलेस्डेला हे माहीत होतं कारण इथे माणूस त्या निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून जगत होता. अशा दृश्यांची मग रांगच लागली. जरा पाच मिनिटं मनुष्यवस्तीपासून चाललं की जंगल इतकं घनदाट असे की आपण फारच खोल येऊन पोहोचलो असं वाटून जाई. दहा-दहा माणसांच्या हाताच्या वेढयात मावणार नाहीत इतकी प्रचंड मोठी झाडांची खोडं! इथल्या वनस्पतींचे अगणित औषधी उपयोग सांगता सांगता वेलेस्डे तर अगदी बहरून आला होता. आम्ही मात्र थोडया असूयेनं त्याच्याकडे बघत होतो. ‘पाने उकळा, साली आंबवा’ असा मूलमंत्र होता बहुधा ह्या औषधांचा. पोटापासून पाठीपर्यंत, आणि घोटयापासून डोईपर्यंत सगळा उपाय खच्चून भरलेला जंगलात!

‘कॅटस् क्लॉ’ नावाच्या एका झाडाच्या सालीतून तर हुबेहूब रक्तासारखा द्रव येतो, मात्र तो जखमा बऱ्या करतो. पुढं जाताजाता एका अजस्त्र अस्ताव्यस्त झाडानं मध्येच रस्ता अडवला होता. ह्याला चालणारं झाड म्हणतात. त्याची अनेक खोडं हातापायासारखी पसरली होती.

ह्या अजबखान्यातून पुढं जात असताना वेलेस्डे अचानक एका मोठया वारुळापाशी थांबला. ते वारूळ एका झाडाच्या बुंध्यावर होतं. त्यानं त्यातल्या काही छिद्रांवर हात ठेवला आणि मुंग्या येऊन त्याच्या हातावर चालायला लागल्या! हे नवीनच अजून! तो सांगत होता, ‘ह्या मुंग्या कीड-प्रतिबंधक म्हणून काम करतात!’ त्यांच्या चालण्याने हाताला विशिष्ट वास येतो जो कीटकांना लांब ठेवतो. आम्हीही लगेच सरसावलो! खरंच हाताला आम्ही नेहेमी लावतो तशा डास प्रतिबंधक क्रीमसारखा वास येत होता. फक्त तो नैसर्गिक होता. आमचा आ वासला गेला तो काही मिटायलाच तयार नव्हता.

ह्या अरण्यविदयेत भर पडली मासेमारीची! गळाला भक्ष्य लावून नदीपात्रात कसं टाकावं आणि मासा गळाला लागला की कसा वर ओढावा वगैरे. आम्ही शांतपणे मासे यायची वाट पाहायला लागलो. ते आले, त्यांनी पाहिलं आणि भक्ष्य घेऊन निघून पण गेले! आम्ही नुसतेच बसून राहिलो. आमचा गळ मोकळाच राहिला. फक्त आमच्यातल्या एका मुलीला एका ‘पिरान्हा’ माशाची शिकार मिळाली, आणि तो मासाही अगदी छोटा होता. त्या आनंदाप्रीत्यर्थ आम्हाला ‘पिरान्हा’ माशाची (अर्थात दुसऱ्यांनी पकडलेल्या) मेजवानी मिळाली. त्या मानानं पक्षी निरीक्षण बरंच जमलं. नदीपात्रातून भल्या सकाळी निघालो. मोटार बंद करून नाव वल्हवत होतो. त्या शांत निवांत परिसरात अनेक पक्ष्यांचे आवाज भरून राहिले होते.
रात्रीचं जंगल हाही एक निराळा ‘अध्याय’ असतो. तो ज्याला वाचता आला त्याला निसर्गाचा एक भरजरी पदर पाहायला मिळतो. आम्हीही एका रात्री वेलेस्डेवर भिस्त ठेवून जंगलात चक्कर मारून आलो!

माणसाचा शोध

आमच्या इथल्या राहण्यात याग्वास नावाच्या एका आदिवासी जमातीला भेटायचा योग आला. संपूर्ण बदललेले, मर्यादित शहरी सुविधा घेणारे आणि अजिबात न बदललेले असे तीन प्रकारचे आदिवासी अॅमेझॉनमध्ये दिसून येतात. याग्वास हे काही सुविधा वापरून थोडे ‘मॉडर्न’ झालेल्यांपैकी एक. ह्या सगळ्यांना जगापासून अलिप्त राहायचा अधिकार इथं कायद्यानंच दिला आहे.

ढोलांच्या पारंपरिक तालावर आमचं त्यांच्या छोटया वाडीत स्वागत झालं. जमातीच्या प्रमुखानं त्यांच्या प्रथेप्रमाणे आमच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे चट्टे ओढले. हा रंग चक्क फळाच्या बियांपासून बनवतात म्हणे. त्यांची घरं आणि वस्ती पाहून झाली. शिकारीसाठी हे लोक एक वेगळंच हत्यार वापरतात. एका लांब पोकळ नळीच्या एका तोंडाला छोटा विषारी बाण लावायचा. नळीच्या दुसऱ्या तोंडानं नेम धरून जोरात फुंकर मारली की तो बाण जाऊन प्राण्याला लागतो आणि विषामुळे तो प्राणी तिथेच बधीर होऊन पडतो. आम्ही आपले प्रात्यक्षिक म्हणून बिनविषारी बाण मारून बघितले. अजून कायकाय बघायला मिळणार हा विचार करत असताना अचानक पुन्हा ढोल वाजू लागले आणि लाल कपडे केलेले पुरुष आणि स्त्रिया वर्तुळ करून नाचायला लागल्या. आम्हीही त्यात सामील झालो. हाडं, सापाची कात, गवत, झाडांची मुळं असल्या गोष्टींचा वापर करून आदिवासी स्त्रियांनी अतिशय सुरेख शोभेच्या वस्तू आणि दागिने तयार केले होते! (काहीही म्हणा पण बायकांचा हा सोस सगळीकडे सारखाच!) संध्याकाळी पुन्हा मुक्कामाकडे निघालो.

तऱ्हा खाण्या-पिण्याच्या

ह्या काही दिवसांत अनेक प्रकारचं चित्रविचित्र पण चवदार खाणंपिणं समोर आलं. आम्ही अगदी भक्तिभावानं ते स्वीकारलं. किती तऱ्हा! झाडांची सात वेगवेगळी मुळं वापरून ‘सिद्ध’ केलेली वाईन इथं फार प्रसिद्ध आहे. ही ‘विनो-दे-सिएते-रेस’ फारच चविष्ट लागते. आम्हाला आयुर्वेदाच्या काढयांची आठवण झाली. कामू-कामू नावाच्या फळांचं सरबतही असंच पोटाला आणि मनाला थंड करून गेलं.

खाण्याचीही गंमत होती. जंगल स्पॅघेटी म्हणून एक पांढऱ्या स्वच्छ रंगाची कोशिंबीर आम्हाला फार आवडली होती. प्रथम अकाई नावाच्या पामच्या छोटया फांदया सोलाव्यात! फांदीच्या गाभ्यात असलेली पांढरी कांडी एका सुरेख प्लेटमध्ये लांबलचक किसावी. मीठ मसाले टोमॅटो वगैरे आवडीप्रमाणे वापरून जंगल स्पॅघेटी ‘सर्व्ह’ करावी, अशी त्याची कृती जेव्हा कळली तेव्हा त्याच्या चवीबरोबर नावालाही दाद मिळाली! फक्त मांस खाताना आम्ही फार साहस करायच्या भानगडीत पडलो नाही. आधी सुरी-आळ्या खाल्या होत्याच, नंतर फक्त छोटया सुसरीचं (अॅलिगेटर) मांस खाल्लं! ‘सुसरबाई तुझं मांस मऊ’ (आणि थोडं चिवट पण) हे म्हणायचा योग त्या निमित्तानं आला.

इकीतोसला परत आलो. आधी राहिलं होतं म्हणून इथल्या ‘मॅनटी’ रेस्क्यू सेंटर’ला गेलो. मॅनटी हा इथला अगदी लाजाळू आणि निरुपद्रवी जलचर. छोटा पाणहत्तीच! आपल्या वजनाएवढं खाऊ शकणारा हा प्राणी पाण्याचा ‘फिल्टर’ म्हणून ओळखला जातो. ह्या केंद्रात त्यांना निसर्गात परत सोडण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले जातात. तिथून परत निघत होतो आणि अचानक समोरच्या झाडावर हालचाल झाली. इगुआना नावाचा एक प्रचंड मोठा सरडा शांतपणे झाडावरून सरकत होता. त्याच्या अंगावरच्या रंगछटा तर अक्षरशः अगणित होत्या… तो आम्हाला नुकत्याच भेट दिलेल्या अॅमेझॉन अरण्यासारखा वाटला! अजब जातीचा, स्वतःतच रमलेला आणि अगणित, अगम्य रंग दाखवणारा!

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW Series.

Scroll to Top