30 शेवट आणि शून्य – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

मनाऊसच्या विमानतळावरुन आमच्या विमानानं रिओकडे झेप घेतली. अॅमेझॉनचा हिरवा भरजरी पदर खिडकीतून एकदा शेवटचा फडफडताना पाहिला. रिओपर्यंतचं अंतर हवाई मार्गानं तब्बल चार तासांचं. देशांतर्गत प्रवासात एवढा विस्तीर्ण भूप्रदेश अगदी मोजक्या देशांचा. पहाटेचे रिओमध्ये येऊन उतरलो. बस्स, आता संपत आला प्रवास, राहिलेलं पाहून घेऊ ह्या विचारात बाहेर पडलो.

आमचं प्रवासाचं वर्तुळ पूर्ण होत आलं होतं. जिथून निघालो तिथंच परत चाललो होतो. इथल्या समुद्रकिना-याची आठवण झाली आणि समोर दिसली ती बीआरटी बस पकडली. ती बस कुठं निघाली होती ते माहीत नव्हतं. हळूहळू ओळखीच्या खुणा दिसायला लागल्या. आनंदानं खिडकीतून बाहेर पाहात राहिलो. आम्ही परत आनंदी लोकांच्या ब्राझीलमध्ये, रिओमध्ये होतो. ‘हे आधी राह्यलो होतो ते फिलिपेचं घर, इथे पहिल्यांदा समुद्रावर आलो होतो’ असं बघत जात होतो आणि अॅल्व्होराडो नावाच्या ठिकाणी बस ‘संपली’! बाहेर पडलो तर समोर इपानेमा ह्या ओळखीच्या किना-याला नेणारी बस लागली होती. लगेच आत शिरलो. एका तासानंतर इपनेमा किना-याची झळझळीत वाळू आणि पाणी दिसलं. उतरलो. आता आम्ही नुसत्या नजरेनं, किंवा वासावरुन हॉस्टेल शोधू शकतो! तसंच झालं. एक गुलाबी रंगाचं घर हॉस्टेलच निघालं! जरा महाग निघालं पण आम्ही काणाडोळा केला.

सरत्या दुपारी समुद्रावर गेलो. सर्फिंगचा हंगाम जोरात सुरु होता. सूर्यास्ताची वेळ झाली तसं ‘अॅपोराडोर’ नावाच्या एका मोठया खडकाकडे सरकलो. हा खडक इपानेमा आणि कोपाकबाना ह्या दोन किना-यांना विभागतो. तिथं निवांतपणे बसून उसळणारं पाणी आणि त्यावर उसळणारी माणसं पाहात राहिलो. ह्या मुक्कामातला अटलांटिकचा आमचा बहुधा शेवटचा सूर्यास्त. तसाच झगझगीत गुलाबी! सूर्य वेगानं खाली सरकला. संध्याकाळच्या रंगात रात्र भरु लागली. खाली उतरुन आम्ही निघालो आणि अचानक तिथं आम्हाला आधी कुस्कोत भेटलेलं कलाकारांचं ऑरविक कुटुंब पुन्हा भेटलं. लगेच बिअर फेसाळली आणि धो धो गप्पा सुरु! त्यांचा निरोप घेतल्यानंतर केलेल्या अॅमेझॉन ट्रीपविषयी आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी आम्हाला त्यांची इन्का प्रवासकथा ऐकवली. मजेत वेळ गेला. रात्र आनंदात पुढं सरकू लागली.

दुस-या दिवशी ऑरविक कुटुंबाबरोबर रिओची ऑलिम्पिक तयारी बघायला बाहेर पडलो. परवाच्या बसप्रवासातच त्याची झलक दिसली होती. नवीन बसथांबे, रस्ते, ठिकठिकाणचं बांधकाम अशी धांदल चालू होती. मेट्रो मार्ग तयार होत होता. जगातल्या सर्वोच्च खेळमेळाव्यासाठी रिओ सजत होतं. काही महिन्यांपूर्वी पाहिलेल्या आणि आत्ताच्या रिओच्या रुपात फार फरक पडला होता.

मराकाना हे रिओमधलं आणि एकूणच जगभरातल्या फुटबॉलप्रेमींचं पवित्र मैदान. जणू फुटबॉल पंढरीच. अनेक अभूतपूर्व फुटबॉल लढतींचं साक्षीदार असलेलं हे मैदान याचि देहि.. पाहून घेतलं. तिथल्या ‘म्युझियम’मध्ये पेलेनं आपला हजारावा गोल ज्या फुटबॉनं केला तो बॉलही पाहायला मिळाला. गेला बाजार प्रेसबॉक्स, खेळाडूंच्या चेंजिंग रुम्सही हिंडून घेतल्या! ऑलिम्पिकच्या सगळया फुटबॉल लढती इथं खेळल्या जाणार आहेत. ‘ऑलिम्पिक्स स्टेडियम’ला मात्र तिथल्या रखवालदारांनी आत जाऊ दिलं नाही. आम्ही खूप विनंती करुनही ते बधले नाहीत. एकतर तिथं बांधकाम जोरात चालू होतं. त्यात आमच्यासारख्या परदेशी पाहुण्यांना गाफीलपणे आत सोडून त्यांना अपघाताचा धोका पत्करायचा नव्हता. मात्र त्यांनी आम्हाला अॅथलेटिक्सच्या मुख्य स्टेडियमला आवर्जून भेट द्यायला सांगितलं. ते पाहून आम्ही समाधान मानलं. रिओ तयार होतंय. ‘कॅरिओकास'(रिओची ‘मान्सं’!) काळजीत आहेत, अहोरात्र झटत आहेत. आम्ही मांडवातला गोंधळ पाहून परतत होतो! मनातून खात्री पटत होती की ऑलिम्पिक धुमधडाक्यात पार पडणार! ह्या वेळी टीव्हीवर ऑलिम्पिक पाहताना आमची भावना इतरांपेक्षा कांकणभर जास्त आपुलकीची असेल ही जाणीव झाली.

नवीन गोष्टी पाहण्याबरोबर नवीन भेटीही झाल्या. आम्ही रिओमध्ये सचिन भंडारीला भेटलो. मुशाफिरीच्या क्षेत्रातला चौफेर अनुभव असलेला! त्याच्या २५दिवस २५रेल्वेज् ह्या प्रवास-प्रयोगानं आम्हाला भुरळ घातली होती. २५ दिवसांत त्यानं भारतातल्या २५ रेल्वेगाडयांतून प्रवास केला. आता ‘बारा देश बारा धडे’ म्हणत तो बारा देशांचं पाणी चाखायला निघाला होता. रिओत त्याला भेटायचा योगायोग जुळून आला. सेलरॉन स्टेप्सवर रात्री बीअरचे कॅन उघडत दणकून मराठीत गप्पा मारत बसलो होतो. प्रवास, अनुभव आणि माणूस हे विषय रात्रभर सुद्धा गप्पा मारायला कमी पडले असते! हे फक्त प्रवासातच घडतं. अगदी वेगळ्या ठिकाणचा नवाकोरा अनुभव पदरात पडून जातो.

नंतरचा दिवस आम्ही फक्त समुद्रात खेळत राहिलो. मागचा पुढचा कसलाही विचार डोक्यात नाही. इपानेमा समुद्रकिनारा लाटा फेकत होता, आम्ही त्या झेलत होतो. पाण्याचा कंटाळा आला की रेती आणि रेतीचा कंटाळा आला की पाणी! एक आदर्श रिओ-दिवस होता तो! आता आम्हाला निघायचं होतं. वेळेचा डोळा आमच्यावर वटारला गेला होता. इथला ‘शेर’ संपला. इथून साओपावलो विमानतळ, की दक्षिण अमेरिका मागे पडली. साओपावलोत आम्ही स्टीव्हनकडे पहिल्यांदा उतरलो होतो. इथला प्रवास त्याचाच निरोप घेऊन संपवावा म्हणून त्याच्याकडे गेलो. स्टीव्हन आणि पॅट्रिशिया दोन दिवसाच्या ट्रीपला बाहेर पडणार होते म्हणून सकाळीच जाऊन त्यांना गाठलं. आम्हाला शहर पाहायला घेऊन जाणारी तेरेसाही प्रेमानं भेटायला आली. परदेशी माणसाच्या पुनर्भेटीचा आनंद, तो सुद्धा परदेशात, एवढा मोठा असेल ह्याची कल्पना नव्हती. जणू आपलीच माणसं परत भेटली! थोडा वेळानं यजमान ट्रीपला निघून गेले. घरातल्या आजीबाईंनी आमचा ताबा घेतला. जिथून निघालो होतो तिथेच येऊन सांगता झाली! मन भरुन पावलं. एक वर्तुळ पूर्ण झालं. त्या रात्री डोना-नीना ह्या दोन आज्यांनी प्रेमळ सुरकुतलेल्या हातानं कुरवाळून आम्हाला निरोप दिला.आम्ही पाठीवरचं बि-हाड उचललं. का कुणास ठाऊक, फार जड वाटायला लागलं. परतीच्या प्रवासासाठी साओपावलो विमानतळावर पोहोचलो. विमान झेपावलं. ‘अमेरिकास’ची जमीन सुटली!

तब्बल सव्वीस तासांनी आम्ही चक्क बॅंकॉकमध्ये होतो! स्वस्त पडतं म्हणून हा प्रवास असा वेडावाकडा केला! एकदम खंडबदल झाला होता. आम्हाला भूक लागलीये, की झोप आलीये की नुसताच थकवा आलाय हे कळत नव्हतं. आम्ही आता नवलाईचे भारतीय नव्हतो. आमच्या आजूबाजूला ‘इंडिया! म्यू लेगो, म्यू बोनितो’ (आह, भारत! खूप लांब आहे, आणि खूप सुंदर देखील) म्हणणारा ब्राझीलचा माणूस पण नव्हता. त्यामुळे ह्या गोंधळात अजून भर पडली. आता कुठेच फिरायची इच्छा नव्हती. घरी जाण्यासाठी आमच्या मनाची तयारी झाली होती. थायलंड खरं तर फार सुरेख आहे. आम्ही फक्त स्वस्त पडतं म्हणून इथं पाय ठेवला. मनातल्या मनात त्या देवभूमीची माफी मागून आणि परत यायचा वायदा करुन कोलकत्याला नेणा-या विमानात पाय ठेवला. घरच्या वाटेला लागलो. तृप्त मनानं कोलकत्यात उतरलो. नेहेमीच्या सवयीनं आता किती पैसे काढले असता आंतर्राष्ट्रीय सर्व्हिस चार्ज लागणार नाही हा विचार करु लागलो आणि लक्षात आलं आपण आता भारतात आहोत. कितीही काढले तरी चालतील! दुरांतो एक्स्प्रेसच्या डब्यात बॅगा ठेवल्या. मुंबईला जायला गाडी हलली. एक शून्य मनाला व्यापायला लागलं. आता काहीही करायचं नाहीये. इथून फक्त घरी जायचं. ह्या काय, कुठल्याही प्रवासाची सांगता अशी शून्यात व्हावी, ही गंमत जगण्याची. पाच देशांचा, २३०००किमीहून अधिक रस्त्याचा, अनेक ब-या वाईट अनुभवांचा, सागरांचा, महासागरांचा, नद्यांचा, तळ्यांचा आणि अरण्यांचा, पशुपक्ष्यांचा आणि माणसांचा हा घसघशीत प्रवास. आम्ही ज्यासाठी सारं आयुष्य पणाला लावलं त्याचं जोरदार समर्थन करणारा एक समृद्ध अनुभव!

सकाळची जाग सह्याद्रीच्या पर्वतरांगात आली! कसारा घाटातून गाडी यथावकाश सीएसटीला थडकली. आधी अनेक प्रसंगात बसमधून उतरल्यावर बाकीच्या सहप्रवाशांना उतरवून घ्यायला त्यांची स्नेही-कुटुंबीय मंडळी आलेली पाह्यली होती. आता तो प्रसंग जवळजवळ पाच महिन्यांनी आमच्या बाबतीत घडला. एरवी आम्ही उठवळासारखे ‘चला जागा शोधा पथारी टाकायला’ असल्या व्यवधानात अडकून चालायला लागायचो. आज मात्र आमच्या बॅगा प्रेमानं उचलल्या गेल्या. कसा झाला प्रवास वगैरे बरे वाटणारे नेहेमीचे प्रश्न विचारणारी, नेहेमीची पण आपली माणसं पाहून मनात विचार आला, चला हा प्रवास तर संपला. दक्षिण अमेरिका सुफळ संपूर्ण झाला. ज्यासाठी अट्टाहास केला होता त्या राऊंड द वर्ल्ड प्रवासाचं पहिलं पाऊल आश्वासक होतं. धीर देणारं होतं. ह्या आधारावर जगाची ही वारी आम्ही करत राहू. अनोळखी प्रदेशांचा आणि नितांतसुंदर जगण्याचा, हा फक्त आपल्या माणसांमधला आणि ओळखीचा अर्धविराम!… तात्पुरता रामराम!

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW Series.

Scroll to Top