40 सुंदराचे सोहळे – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

आपल्या आवडीची एखादी आकर्षक अंगठी, एखादं दुर्मिळ पुस्तक असावं. अशा वस्तू मग खास कार्यक्रमासाठी मोठया दिमाखात बाहेर काढल्या जाव्यात. त्या अंगठीची चमक एखाद्या डोळ्यात चमकून जावी, किंवा विद्वान पाहुण्यानं त्या पुस्तकाचं विशेष कौतुक करावं. आपल्या आनंदाला अजून एक झालर लागावी. आपल्याकडे जे आहे त्याच्या अभिमानाची नाही तर आपल्याकडच्या गोष्टीनं समोरच्याला आनंद होतो त्याची झालर! ह्या न्यूझीलंडमध्ये जैविक संपत्ती अशाच प्राणपणानं जपली जाते, त्याचं संगोपन केलं जातं. ह्या सुंदर भूमीला कुठलाही बाहेरचा डाग लागू नये ह्याची काळजी घेतली जाते.

नेल्सनचा आमचा शेर संपला म्हणून पुढं निघालो. मुक्काम होता अेबल टॅस्मन नॅशनल पार्क. सकाळी हॉस्टेलला आम्हाला घ्यायला बस आली. ह्या बसेस मोठया गंमतीच्या. प्रत्येक बसच्या मागे एक वेगळा छोटा डबा हुकच्या मदतीनं जोडलेला, त्यात आपलं सामान ठेवायचं आणि नुसतं बसायला बसमध्ये शिरायचं! ह्या राष्ट्रीय उद्यानात ‘कायतेरीतेरी’ नावाच्या ठिकाणी पोहोचायचं होतं. अगदी छोटी शहरं पार करत ‘मोटुएका’ ह्या शहराच्या जरा आधी बस थांबली आणि ड्रायव्हर साहेबांनी ‘इथलं जगणं’ ह्याविषयी एक बौद्धिक घेतलं!त्यांच्या सांगण्यात मुख्यत्वे सफरचंद आणि बियरमध्ये चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘हॉप्स’ नावाच्या फळाचा समावेश होता! ‘इथली हॉप्स फळं जगात भारी’ हे त्याचं मत आम्हाला थोडयाच वेळात बियरचे कॅन हातात आल्यावर पटलं! सफरचंदही मोठी गोड आणि रसाळ. तिथून थोडं पुढं गेल्यावर एक अमानवी सफरचंद मध्येच पडलेलं दिसलं. सफरचंदाच्या आकाराचा तो एक आठ फुटांएवढा मोठ्ठा खडक होता. हे सफरचंद जणू कुणीतरी आत्ता येऊन खाणारच आहे असं मधोमध कापून ठेवल्यासारखं दिसत होतं. प्रवास होत राहिला आणि सगळीकडे अचानक निळंशार पाणी, पांढरी स्वच्छ वाळू आणि हिरव्यागार डोंगरांचा एक ‘सिलसिला’च सुरु झाला. हा भाग जेव्हा राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर झाला तेव्हा इथल्या माणसांना हलवायला सरकारनं जबरदस्ती केली नाही. त्यांनी सांगितलं ‘ राहा तुम्ही इथं, पण पाणी आणि वीजेचं तुमचं तुम्ही बघा!’ हेतू हा की वनांचं संगोपन आणि संवर्धन नीट व्हावं. तरीही काही ‘वेडे’ अजून तिथं तग धरून राहतातच. त्यांनी ती व्यवस्था कशी केली ते माहीत नाही पण त्यांच्या त्या वृत्तीला आम्ही मनोमन सलाम केला. हा भाग रूढार्थानं जगापासून तुटल्यासारखा आहे पण त्याच वेळी इतका आकर्षक आहे की ती माणसं तिथं राहिली ह्याचं आश्चर्य नाही वाटत!

न्यूझीलंडची जैवसाखळी, त्याचं पर्यावरण एकूण सगळ्या जगात अद्वितीय आहे. करोड वर्षांपूर्वी जेव्हा खंड स्थिर होत होते तेव्हा हा भाग सगळ्यांपासून फटकून वेगळा झाला. वेगळं होतं असताना ह्या भूमीच्या वाटयाला शिकारी आलेच नाहीत! (नंतर पाश्चात्यांनी भूमीची शिकार केली ते निराळं) न्यूझीलंडमध्ये साप (सरपटणारा शिकारी) नाहीत. प्राण्यांना स्वसंरक्षणाचं भय नाही. न्यूझीलंडमधले पक्षीसुद्धा उडत नाहीत. ‘जर तो उडला, तर तो नाही इथला’ अशी म्हण आहे इथे! जेव्हा कुक किंवा टॅस्मनसारखे गोरे आले तेव्हा नुसतं ‘विन्ग्लीश’ घेऊन नाही आले, झाडंही घेऊन आले. ती वाढून इथल्या वनस्पतींवर कुरघोडी करू नये म्हणून आता सरकार डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवते. सुंदर जे आहे, अनाघ्रात जे आहे ते टिकवून ठेवायची ही धडपड पाहून आम्ही चाट पडलो होतो. आपल्याकडे सुद्धा अशा साखळ्या कमी नाहीत, पण कास पठारावरचा धुमाकूळ कधी पाहावत नाही. आता बदल घडतायत आणि त्यातून सुंदर जे आहे ते टिकून राहावं.

बोटीतून फेरफटका मारत असताना कप्तान आम्हाला काही पिवळी झाडं दाखवून म्हणाला, ‘ ही पिवळी झाडं पानगळीच्या रंगासारखी सुंदर दिसतात’. पण ती पानगळ नव्हती. ते एका पाईन वृक्षाचं मरण होतं. पाईन वृक्ष इथला नाही. तो वेगानं वाढतो आणि इथल्या झाडांना कधी मारून, कधी कुपोषित ठेवून जगत राहातो. अशा ‘निरागस’ शिकाऱ्यालाही इथं जागा नाही. पाईन वृक्ष इथे रसायनांच्या साहाय्यानं पद्धतशीरपणे मारून कमी करतात. का? तर इथल्या झाडांना इजा पोहोचू नये. ही निष्ठा आमच्यासाठी नवी होती. (म्हणूनच इथले जैविक कायदेही अतिशय कडक आहेत)

किनाऱ्या-किनाऱ्यांवरून बोट चालली होती आणि आम्ही त्या दृश्यात डुंबत होतो! प्रत्येक किनाऱ्याला कँम्पसाठी अगदी छान, स्वच्छ जागा तयार करून ठेवलेली. हा निसर्ग तुमचाच आहे, तुम्ही तिथं केव्हाही येऊ शकता फक्त त्याचं पावित्र्य राखा इतक्या साध्या हेतूनं इथली यंत्रणा काम करते. डिपार्टमेन्ट ऑफ काँझर्व्हेशनकडून कँम्प लावायला जागा बुक करून घेता येते. इकडची खरी गंमत चालण्यात आहे! त्यातही वाटा मोठया रसिकतेनं आखलेल्या. काहीजण कयाक वापरून चक्कर मारतात.

तोतारानुईपासून बोट वळली. ही जागा (विरुद्ध दिशेकडून) रस्त्यानं जोडलेली आहे. उन्हाळ्यात गर्दी खूप होते. इतकी की जागा ‘फुल्ल’ झाली की कित्येक किलोमीटर आधी ‘हाऊसफुल’चे बोर्ड लागतात. आम्हीही मेडलँडस् ह्या ठिकाणी बोटीतून उतरलो. उतरल्या उतरल्या अकरा किलोमीटरचा एक फेरफटका होता त्याला सुरुवात केली. जातानाही सगळं इतकं शिस्तबद्ध होतं की माणूस काही आगळीक केली तरच चुकू शकतो. झरझर चालत निघालो. पुढं जाताना मध्येच, ‘ आता उजवीकडे वळा,’ ‘इथून खाली दरीत समुद्र काय सुंदर दिसतोय बघा’, किंवा ‘इथून अमुक ठिकाणी जाऊन येता येतं’ अशा छोटया छोटया पाटया.! एका खोल नदीपात्राच्या झुलत्या पुलावरून पार झालो आणि टोरेंट नावाच्या किनाऱ्यावर उतरलो. इतकी पांढरी वाळू आम्ही कधीच पाहिली नव्हती. स्तब्ध निळं पाणी आणि उगीच चित्र पूर्ण करायला लांबवर एखादी बोट… इथून आम्ही जिथं चाललो होतो त्या ‘अँकरेज’ ह्या ठिकाणी ओहोटी असताना जायला जवळचा रस्ता होता. पण ओहोटी नसल्यानं परत वर येऊन चालायला लागलो. आमची बोट आम्हाला तिथं न्यायला येणार होती. लवकर पोहोचल्यानं निवांत होतो. बोट यथावकाश आली आणि पुढचा प्रवास सुरु झाला. एक जोडपं भेटलं. ते विचारत होतं ‘ आता कुठं जाणार?’ आम्ही म्हणालो, ‘माहीत नाही, दक्षिणेकडे कुठंतरी जाऊ’ ते समजूतदारपणे हसले आणि म्हणाले, ‘हे बघा! किनारे आवडत असतील तर इथून पूर्वेला जा, पानगळीचे रंग पाहायचे तर ‘लुईस पास’मधून सरळ निघा! कुठंही गेलात तर सगळं सुंदरच आहे, आणि आम्हाला ते तंतोतंत पटलं, हे सगळं सुंदर आहेच पण माणसं साजरे करतायत ते आहेत ‘सुंदराचे सोहळे!’

vachak.vishesh@gmail.com / rtw@sandeepachetan.com
छायाचित्र : संदीपा आणि चेतन शब्दांकन : अभय अरुण इनामदार
Photos: https://photos.sandeepachetan.com/Article40/

Scroll to Top