34 ‘हक्काचं’ ऑकलंड – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

Early morning rainbow over Auckland, New Zealand

ती शहाळयासारखी ‘गारीगार’ हवा. त्यात जेटलॅगचं गोंधळलेलं शरीर. झोप हलकेच डोळ्यात उतरली. उबदार पांघरुणातली आमची झोप सकाळी चक्क अकरा वाजता चाळवली गेली. क्षणभर कुठं आहोत ह्याचा अंदाज घेत असतानाच मकरंदचा आवाज आला, उठा रे, ‘ब्रेकफास्ट ला काय करून देऊ तुम्हाला?’ आम्ही ऑकलंडमध्ये ‘शेफ’ मकरंदच्या घरी होतो. मकरंद हा चेतनचा ऑकलंडमध्ये स्थायिक झालेला भाऊ. आमचा पहिला मुक्काम अगदी घरगुती आणि हक्काचा. मकरंदच्या डिशेस आम्ही फेसबुकवर फक्त डोळ्यांनी खाल्ल्या होत्या. आता स्वतः शेफच जातीनं आम्हाला काय हवं नको बघायला तत्पर होता! उत्साहानं अंथरूण सोडून आम्ही उठून बसलो!

Auckland landing, New Zealand

ऑकलंडमध्ये नेहेमीचं तापमान होतं तरी आम्हाला भारतातून आल्यानं पडलेला २० अंशाचा तो फरक लगेच जाणवला. ह्या ‘आमच्या’ घरात आम्ही मोकळेपणानं वावरू लागलो. घरची ख्यालीखुशाली, खाऊ, भेटवस्तूंची देवाणघेवाण ह्यात दिवस संपला. रात्री जेवणानंतर आता उद्या काय करायचं याचा विचार करत बसलो होतो. बाहेर पावसाळी हवा होती. ‘चला ग्लोवर्मस पाहायला जंगलात जाऊ’ अशी हवा झाली. आता शहरापासून जंगल म्हणजे किमान एक तास, असं गणित करून गाडीत बसलो आणि अगदी दहा-पंधरा मिनिटांनी रस्त्यात थांबलो. ‘जंगल आलं सुद्धा. रातकिडे किरकिर करतायत. पावसानं रस्ते निसरडे झाले आहेत. बॅटरीच्या तीन चार झोतांनी त्या गडद अंधाराला भोकं पडली आहेत, आणि त्या उजेडात आम्ही चाललोय पुढं! एका छोटया झऱ्यापाशी येऊन पोहोचलो. तिथून काही अंतरावर अगदी तुरळक ग्लोवर्मस दिसत होते. पावसानं त्यांची ‘शाळा’ उधळली होती! आम्ही आपलं त्यातच समाधान मानून घेतलं. समोर लक्ष गेलं आणि दूर अंतरावर लक्ष दिव्यांनी ऑकलंड उजळलं होतं. आम्ही शहरापासून इतक्या जवळ इतक्या दाट जंगलात आहोत ह्याच्यावर विश्वास बसेना. पाऊस पुन्हा यायच्या आत तिथून निघालो. ‘हरित न्यूझीलंड’ विषयी जे ऐकलं होतं त्याचा अनुभव मुक्कामाच्या पहिल्याच रात्री आला. जसा मुक्काम वाढला तसं लक्षात आलं की ही सगळ्या न्यूझीलंडवासीयांची हक्काची जंगलं आहेत. तिथं त्यांना रिझर्व्हज म्हणतात. अतिशय प्रेमानं, काळजीपूर्वक जपलेली ही पार्क्स इथली शान आहेत. जंगलातून काढलेल्या आखीव रेखीव दगडी वाटा. ह्या रिझर्वच्या दर्शनी भागात व्यायाम करायला येणाऱ्या माणसांसाठी ट्रॅक्सपासून टॉयलेटपर्यंत अद्ययावत सुविधा. जसे आत जाऊ लागू तसं दाट होत गेलेलं, झऱ्यांचं आणि झाडांचं, प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं हिरवंगार जंगल. त्यावर ती ताजीतवानी रसरशीत आईसफ्रूट हवा! हे सगळं न पाहिलेलं, न अनुभवलेलं.

View of the sky tower, on the coast to coast walkway at Mt Eden, Auckland, New Zealand

ह्या सगळ्या हिरवाईच्या गारूडातून वेळ काढत माऊंट-ईडनला गेलो. हा बाबाजी म्हणजे एक विझलेला ज्वालामुखी! ऑकलंडचा सर्वांत उंच भाग. निम्म्या भागापर्यंत मोटारी नेता येतात. तिथून पुढं चालत चालत. शहराची रचना घोडयाच्या नालासारखी आहे. त्यामुळं पूर्व आणि पश्चिम दिशेला दोन किनारे आहेत. ह्या माऊंट-ईडनवरून एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनाऱ्याला जाता येतं. जिथं ज्वालामुखी असायचा तिथं आता पन्नास मीटर खोल मोठाच्या मोठा क्रेटर आहे. त्यावर हिरवळीनं आपला हक्क केव्हाच सांगितला आहे. आत जायला मनाई आहे. ह्या अजस्त्र घसरगुंडीवरून आत घसरायला धमाल आली असती.

The crater at Mt Eden, the highest point of Auckland, New Zealand

The crater at Mt Eden, the highest point of Auckland, New Zealand
हा ‘माजी ज्वालामुखी’ पाहायला आम्हाला फार मजा वाटली!. चारही बाजूंनी पसरलेलं शहर इथून सुरेख दिसतं. त्या प्रचंड क्रेटरच्या कडेकडेनं पुढं निघालो आणि एकूण ह्या शहराचा स्वभाव लक्षात येऊन गेला. त्या तसल्या व्यस्त दिवसातही अनेकजण निवांत ब्लँकेटस् अंथरून सगळा खाण्यापिण्याचा जामानिमा बाजूला घेऊन पहुडले होते! हातात एखादं पुस्तक आणि कंटाळा आला की डोळ्यासमोर शहराचं आपलं आवडतं उन्हाळलेलं दृश्य!
View of the Skytower from Mt Eden in Auckland, New Zealand
जगातल्या मुख्य शहरांची ह्या जागेपासूनची अंतरं दाखवणारा एक खांब इथं आहे. ऑकलंडमधून मुंबई आणि आम्ही जिथं जाऊन आलो ते रिओ शहर सारख्याच अंतरावर (फक्त १२०००किमी!) आहे हा गंमतीशीर तपशील हाताला लागला!
The highest point of Auckland, New Zealand

The Viaduct, one of the ports in Auckland, New Zealand

ऑकलंड शहर हे समुद्र, खाडी आणि नदी अशा पाणथळ जागी वसल्यासारखं आहे. अशा पाणथळ जागेला ‘वॉटरफ्रंट’ म्हणतात. व्हायाडक्ट नावाच्या इथल्या एका वॉटरफ्रंटला गेलो. दुपारच्या जेवणाच्या ‘टायमाला’ खूप गर्दी झाली होती. हॉटेल्स आणि बार फुलून गेले होते.
Restaurants next to waterfront at Viaduct in Auckland, New Zealand
काहीजण तर चक्क पळायचा व्यायाम करत होते. पांढऱ्याशुभ्र लहानमोठया बोटींनी ते बंदर व्यापून गेलं होतं. ऑकलंडमध्ये माणसं कमी आणि बोटी जास्त आहेत म्हणे! इथंही परत आराम करायचा असेल तर ऐसपैस आरामखुर्च्या टाकून ठेवलेल्या. दिवसभर जाणाऱ्या येणाऱ्या बोटी बघत उन्हात निथळत बसून राहा. ते नको असेल तर बाजूलाच फिरतं ग्रंथालय आहे त्यातून सरळ एक पुस्तक आणून जंगी बैठक जमवा.
View of the sky tower at the Viaduct in Auckland, New Zealand
तहानभुकेला हॉटेल्स आहेतच. ह्या भागातून मुख्य शहराला जोडणारा एक पूल आहे. हा पूल घडीचा आहे! चक्क मधून दोन्ही बाजूला उघडता येतो. पुलाच्या खालून मोठया बोटी जाणार असतील तेव्हा एक सायरन वाजायला लागतो. वरच्या लोकांची पळापळ सुरु होते. पूल मुडपुन मधोमध दुभंगतो आणि मोठया बोटींना जायला जागा करून देतो. हे सगळं टिपत आम्ही फिरत होतो.

Folding bridge at the Viaduct  in Auckland, New Zealand

The Viaduct, one of the ports in Auckland, New Zealand

ऑकलंड शहरात सगळं काही सहजपणे होतं. ह्या शहराला निवांतपणाचा एक भरजरी पदर आहे. ज्या ठिकाणांना आम्ही भेट दिली ती ठिकाणं कायमची मनात घर करून बसली. ज्या गोष्टी तिथं टूरिस्ट करत असतील असं आम्हाला वाटलं होतं त्याच गोष्टी तिथले सामान्य नागरिक आठवडयातल्या अधल्या मधल्या वाराच्या दिवशी करत होते. त्यांना विकेंडची वाट पाहायला लागत नव्हती. कामाची धावाधाव नव्हती. उलट, वेळ आहे तर व्यायामासाठी जरा ‘पळून’ येतो अशी भावना होती. स्वच्छ हवा शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातही मिळत होती. आमचं नवल वाढत गेलं आणि मग त्याचा अर्थ हळूहळू कळत गेला.

Photograph by Chetan Karkhanis

आम्ही जगातल्या एका ‘फर्स्ट वर्ल्ड’ देशात होतो! एका पूर्ण विकसित देशातलं सर्वांत मोठं शहर. जगणं सोपं असणं त्यांच्यासाठी नवल नव्हतं. तो त्यांचा उपजत हक्क होता. ह्याच हक्कातून जे मिळालं आहे ते असोशीनं सांभाळायची प्रामाणिक धडपड सुद्धा होती. आमच्यासारख्या गजबजलेल्या देशातून आलेल्या माणसांना हे आश्चर्य वाटणं साहजिक होतं. आपण एकमेकांच्या अगदी खेटून राहातो. चाळा म्हणून आपल्या शहराची लोकसंख्येची घनता पाहिली तरी थक्क व्हायला होईल. न्यूझीलंडच्या भूमीवर एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये सरासरी अवघी सतरा माणसं राहतात. भारतात तेच प्रमाण साधारण १:३८२ एवढं प्रचंड आहे. दिल्ली मुंबईसारख्या महानगरात हे प्रमाण १:११००० असं अव्वाच्या सव्वा वाढतं आणि सगळ्या न्यूझीलंडची मिळून लोकसंख्या केवळ ४५ लाख भरते! हे सगळं समोर येत होतं. मोकळ्या जागा, अतिशय काटेकोरपणे सुस्थितीत ठेवलेल्या सार्वजनिक सुखसोयी, स्वच्छ हवा हा त्यांच्या जगण्याचा एक अपरिहार्य भाग आहे. आपल्याकडे दुर्दैवानं ती परिस्थिती सगळीकडे सारखी नाही. सगळे समान असतात पण काहीजण अजून विशेष समान असतात ह्या उक्तीचा प्रत्यय आपल्याकडे येतो. ह्या विरोधाभासात, दाटीवाटीनं राहणाऱ्या आपल्या भारतीयांची मनं हवी तेवढी विशाल होऊ शकतात ह्याचा आनंद होता! जगणं खडतर असलं तरी आनंद कमी व्हायचं कारण नाही. त्याच हक्कानं आमचा न्यूझीलंड प्रवासाचा श्रीगणेशा मकरंदच्या घरात झाला होता!

क्रमशः

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
लेखक आणि छायाचित्र : संदीपा आणि चेतन

This was originally published in the RTW Series.

Next : गुहेतलं गुपित

Are you planning a trip to New Zealand?

We DESIGN a travel experience just for you – whether you are travelling solo, with a friend, a spouse or your family. Know more or Call +917887518601

Dreaming of New Zealand

Scroll to Top