35 गुहेतलं गुपित – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

Garden outside Auckland university, New Zealand
आळसावलेल्या रविवारी सकाळी, ‘आता कुठं जाऊ यात’ हा विचार करत बसलोय. अचानक बेत ठरला आणि लगेच तयारीला लागलो. आम्ही काविटी गुहा बघायला जाणार होतो. ह्या गुहा अजब आहेत म्हणून आम्हाला सांगण्यात आलं होतं! फार लांब नव्हतं, फक्त २२० किलोमीटर! आपल्याकडे एवढया प्रवासासाठी, ‘सकाळी सहालाच निघू म्हणजे व्यवस्थित पोहोचता येईल’ अशा वाक्यानं सुरुवात झाली असती. इथं मात्र चक्क सकाळचे दहा वाजून गेले होते आणि तरी आम्ही तिकडे जायला तयार होत होतो. ह्याचं कारण म्हणजे न्यूझीलंडच्या गुगल नकाशावर जितका वेळ जायला लागेल असं लिहिलेलं असतं तितक्याच वेळात तिथं पोहोचता येतं. शंभरच्या वेगानं जाणारी वाहतूक शहराजवळ सत्तरीच्या आसपास असते आणि शहरात गेलं की ती पन्नाशीत येते! सगळं आखून दिलेलं. रस्त्याची कामं चालू असतील तर वेगाची नवीन तात्पुरती मर्यादा सुबकपणे रस्त्यावर लिहिलेली. रामभरोसे काहीही नाही.

North bound NH1 out of Auckland, New Zealand

An off road of North bound NH1 out of Auckland, New Zealand heading to the Kawiti glow worm caves

काविटी गुहा ह्या काविटी कुटुंबाच्या खाजगी मालकीच्या आहेत. ‘नाती हिने’ जमातीतल्या ह्या काविटी कुटुंबाच्या प्रमुख स्त्रीला सतराव्या शतकात अपघातानं ह्या गुहेचा शोध लागला. हिनेमारू नावाची ही स्त्री वायोमो दरीत भटकत असताना तिला अर्धवट खाल्लेल्या काही ‘बेरी’ दिसल्या. तिची उत्सुकता चाळवली गेली. त्या बेरीचा माग एका टेकाडावर गेला होता. कुणीतरी संकटात असेल तर आपली मदत होईल म्हणून बाई टेकाड चढून गेली. एका गुहेच्या तोंडाशी शेकोटी पेटवून रोकू नावाची दुसऱ्या जमातीतली एक बाई नवऱ्याकडून पळून आश्रयाला आली होती. आता ह्या दोन बायकांत काय बोलणं झालं, रोकू परत ‘नांदायला’ गेली का? हिनेमारूनं तिला काय सांगितलं हे गुपित काळाच्या ओघात गडप झालं, पण निसर्गाचं एक वेगळंच गुपित त्या दिवशी न्यूझीलंडच्या भूमीला मिळालं!

Entrance to the Kawiti glowworm caves in North island, New Zealand

आम्ही गुहेपाशी येऊन पोहोचलो. चुनखडीपासून (लाईमस्टोन) बनलेलं छत आणि जमीन. निरनिराळ्या चित्रविचित्र आकारांनी भरून गेलेली गुहा. काही ठिकाणी तर खालपासून वरपर्यंत मोठेच्या मोठे नैसर्गिक खांब. आमची उत्सुकता वाढली. जे पाहायला आलो होतो ते कधी येणार ह्याची वाट पाहू लागलो. आत जाऊ तशी पायवाट अंधारू लागली. खालचा दगड आदल्या दिवशी झालेल्या पावसानं निसरडा झाला होता. बाजूला रेलिंग लावली असल्यानं त्यांना धरून हळूहळू पुढं निघालो. त्या अंधारलेल्या भिंतींवर ‘चमक’ दिसू लागली. आमच्या हातात ‘एलईडी’चे कंदील होते. गाईड एका ठिकाणी येऊन थांबला. त्यानं आम्हाला ते दिवे बंद करायला सांगितले. स्तब्ध उभे राहून त्या अंधाराची सवय व्हायला काही काळ गेला. गाईड म्हणाला आता ‘छताकडे बघा!’ आम्ही वर पाहिलं आणि भान हरपलं! चांदण्यांनी खचलेलं आभाळच जणू त्या गुहेत कायमचं आलं होतं. त्या असंख्य चमचमत्या ताऱ्यांच्या वर झळझळीत प्रकाश असलेल्या जणू ‘रेशीमरेषा’ होत्या. त्या रेषांना धरून हे तारे आम्हाला भेटायला खाली येताहेत असा भास होत होता. हे तारे म्हणजे त्या गुहेचं गहिऱ्या अंधारातलं सनातन गुपित होतं. आम्हाला पहिल्या रात्री ‘त्या’ जंगलात निराश करणाऱ्या ग्लोवर्म्सचं हे आश्रयस्थान होतं! निळ्या हिरव्या मिणमिणत्या उजेडानं ती गुहा जिवंत झाली होती. जणू आकाशगंगाच! मान उंच करून आम्ही ते दृश्य हावरटासारखे पिऊन घेऊ लागलो. किती पाहावं आणि किती नाही? असं होऊन गेलं.

हे ग्लोवर्म्स म्हणजे अजब चमत्कारच म्हणायचे! काडेपेटीच्या काडीएवढे हे कीटक इथं झुंडीनं राहतात. त्यांच्या शरीराचा मागचा भाग निळसर-हिरवा उजेड बाहेर फेकतो. हे सगळे कीटक स्वतःला एका अतिशय बारीक पण चिवट धाग्यानं हवेत टांगून घेतात. हे धागेपण चमकू लागतात. बिचारं भक्ष्य आपोआप अंधार उजेडाच्या ह्या मोहक जाळ्यात ओढलं जातं. ग्लोवर्म मग त्या जाळ्यात अडकलेल्या छोटया मोठया किडयाला ओढून खाऊन टाकतात. इतकी साधी जगण्याची तऱ्हा. खरंतर ग्लोवर्म्सचं हे नेहेमीचं जगण्याचं साधन पण अापली मात्र ते पाहताना नजरबंदी झालेली! सगळी गंमतच.

Street art at KawaKawa in North Island, New Zealand
आम्ही ती आकाशगंगा पाहात पुढं चालत होतो. इथं फोटो काढायला परवानगी नाही त्यामुळं जेवढं मनावर ‘छापता’ येईल तेवढं छापत होतो. गुहेतून लख्ख प्रकाशात बाहेर आलो तरी आतलं ते आभाळ काही नजरेसमोरून हलेना. मकरंदच्या एका वाक्यानं मात्र आम्ही खाडकन आभाळातून जमिनीवर आलो. तो काय म्हणतोय त्याच्यावर आमचा विश्वास बसेना! मकरंद म्हणत होता की ‘जाता जाता टॉयलेटस् पाहू. इथून जवळच आहेत!’ आम्हाला समजेना की शौचकुपात ‘पाहण्या’सारखं काय असतं? त्याच संभ्रमात कावाकावा नावाच्या गावी पोहोचलो. एक रंगीबेरंगी सिरॅमिक लावलेला खांब दिसून गेला. त्याचं कौतुक करतोय तोवर एकदम वेगळ्या आकाराचे आणि रंगांचे तसेच सिरॅमिक खांब दिसायला लागले. मग एक कोलाज दिसलं. त्यातली कलात्मक संगती कळायला लागली. सिरॅमिकचे तुकडे, धातूच्या वापरलेल्या वस्तू, रंगीत जुन्या बाटल्या असल्या माध्यमातून हा एक विलक्षण सर्जक खेळ त्या कलाकारानं मांडला होता. इतका अप्रतिम की ह्या खेळाचा मध्यबिंदू एका शौचकुपात आहे ह्याच्यावर विश्वास बसत नाही. या अनोख्या टॉयलेट आर्टचा खेळीया आहे फ्रेडरिक हुंडर्टवॉसर नावाचा ऑस्ट्रीयन कलाकार.
The toilet, designed by Hundertwasser at KawaKawa, New Zealand
कावाकावा शहरातून लोक मोठया प्रमाणात स्थलांतरीत व्हायला लागले. ही गळती थांबवायला, शहरात काही नवीन आलं तर लोक राहातील म्हणून फ्रेडरिकला पाचारण करण्यात आलं. कुठल्याही हुशार पण विक्षिप्त कलाकाराप्रमाणं आपली सगळी सर्जकता पणाला लावून फ्रेडरिकनं चक्क प्रशस्त ‘संडास’ बांधले! ते सुद्धा असे, की लोक आवर्जून बघायला येतील! सिद्धहस्त कलाकार कसा मैल्यातून ‘मूल्य’ काढू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या फ्रेडरिकची टॉयलेट आर्ट!

The toilet, designed by Hundertwasser at KawaKawa, New Zealand
The toilet, designed by Hundertwasser at KawaKawa, New Zealand

संध्याकाळ होत होती. आम्ही ऑकलंडच्या दिशेनं वळलो. छोटया मोठया हिरव्यागार चराऊ टेकडया. प्रत्येक टेकडीला कुंपण. मेंढरं चरून झाल्यावर भरल्या पोटानं घरी परतत होती. पण त्यांना हाकायला मेंढपाळ नव्हता, की कुरण राखायला राखणदार नव्हता. न्यूझीलंडच्या हवेतच ही शिस्त होती की काय कुणास ठाऊक! मेंढरंही शहाण्यासारखी वागत होती. हे दृश्य थेट चमचमती ऑकलंड नगरी येईपर्यंत दिसत राहिलं.

Muriwai beach near Auckland, New Zealand

समुद्रकिनाऱ्याच्या भेटीशिवाय सगळं अपूर्ण वाटलं असतं म्हणून एका संध्याकाळी शहराच्या पश्चिमेला, मुरीवाई नावाच्या किनाऱ्यावर गेलो. सगळा कडयांचा किनारा. फत्तराला फोडून पाणी आत घुसतंय आणि तो कठीण खडक टक्कर देत खडा आहे! सूर्य मावळतोय. स्वच्छ सोनेरी चरचरीत रंगानं सगळं न्हाउन गेलंय. क्षितिजापासून, हिरव्या टेकडयांपासून ते त्या खडया कडयांपर्यंत सगळं रंगात बुडालेलं. जवळच असलेल्या गॅनेट पक्ष्यांची वसाहत पाहून झाली. हे दोन अडीच किलो वजनाचे चांगले दोन मीटर पर्यंत पंखविस्तार असलेले पक्षी म्हणजे न्यूझीलंडची खासियत. ऑस्ट्रेलियातून हे पक्षी ह्या खडकाळ प्रदेशात येतात. अंडी देतात. पिल्लं मोठी झाली की प्रवास करून परत जातात.
The gannet colony at Muriwai beach near Auckland, New Zealand
Sunset at gannet colony, Muriwai, New Zealand
आम्ही तिथून संध्याकाळचे परत निघालो आणि काविटी गुहा आठवून गेली. त्या दिवशी त्या प्रकाशाच्या अद्भुत खेळातून बाहेर आल्यावर काविटी कुटुंबाचा प्रमुख आम्हाला भेटायला आला होता. ही गुहा खाजगी असल्यानं रीत म्हणून कुटुंबप्रमुख पाहुण्यांची भेट घ्यायला येतो. आम्ही भारतातून आलोय म्हणल्यावर त्याला आनंद झाला. आमच्या गुहेविषयी भारतात सांगा असं तो आम्हाला म्हणत होता आणि आमच्या मनात एकच प्रश्न, ‘हे दोन बायकांचं काय गुपित होतं ज्यानं आख्खी आकाशगंगा त्या गुहेत उतरली? काय होतं ते गुपित?…
Coastline along the Muriwai beach near Auckland, New Zealand

क्रमशः

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
लेखक आणि छायाचित्र : संदीपा आणि चेतन

This was originally published in the RTW Series.

Next : ‘सरळ’ वळणाचा देश!

Are you planning a trip to New Zealand?

We DESIGN a travel experience just for you – whether you are travelling solo, with a friend, a spouse or your family. Know more or Call +917887518601

Dreaming of New Zealand

Scroll to Top