13 सीमेवरचा जीवनोत्सव – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

अघोरी वेळ आणि आम्ही यांचं एक गणित साधलं गेलंय. रात्री एक दोन हीच वेळ आम्हाला निघण्यासाठी सोयीस्कर वाटायला लागलीये. याचं कारण पण आहे. रात्रीपर्यंत बाहेर भटकून परत यायचं. सगळा दिवस, संध्याकाळ आणि रात्र असं घसघशीत हातात पडलेलं असतं. चटकन जेवण उरकून बॅगा भरल्या की निघाले दुसरीकडे! झोपबिप गाडीतच उरकली; सकाळी नव्या ठिकाणी पोहोचलं की परत सुरु. सगळा उत्सव! मध्ये काही झालं तर? हा विचार न करता असा धोका मर्फी’ज लॉ (जर काही वाईट होणार असेल तर ते होईलच) नावाच्या एका अतिहुशार वाक्यावर अवलंबून आम्ही बिनधास्त घेत असतो. शक्यतो वाईट नाहीच झालं. आत्तापर्यंत..!

मर्फीची मजा

अर्जेन्टिनातली शेवटची रात्र. रात्री एक वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडून आम्ही ‘ला कियाका’ला चाललोय. अर्जेन्टिना- बोलिव्हिया सीमेवरचं शेवटचं गाव. बसमधून उतरलो की मुक्काम बोलिव्हिया. आम्ही या वेळी मात्र प्रार्थना करत होतो की मर्फीज लॉ नं आम्ही उशिरात उशिरा सीमेवरच्या ह्या गावात पोहोचावं. आम्हाला तसल्या थंडीत बाहेर तडफडायचं नव्हतं. पण बस नेमकी वेळेवर पोहोचली! पहाटे बरोब्बर पाच. व्हिसाचं दुकान उघडणार सहानंतर. बस टर्मिनलला आपल्या यष्टी ष्टांडाची कळा होती. भली मोठी बोचकी, सुटकेसेस, सामान ह्यांच्या उबेला माणसं माना मुरगाळून पडली होती. गरम कॉफी नाही, कॅफे नाही की कसला आडोसा नाही. ओढगस्तीला आल्यासारखं आम्ही सामान घेऊन गाडीच्या बाहेर पडलो. थंडी येऊन एकदम अंगाला डसली. तिथंच थोडया पायऱ्या चढून सामान ठेवलं आणि बसल्या बसल्या जरा पेंगलो.

घडयाळाचा काटा हत्तीच्या पावलानं पुढं सरकत होता. थोडया वेळानं झालं, सुरु झालं बरका! अशा आशयाची धांदल उडाली आणि आम्ही जागे झालो. इथून आंतरराष्ट्रीय सीमा दोन किलोमीटरवर. एरवी आम्ही सरळ वाट तुडवत चालून गेलो असतो. पण ३६०० मीटर उंचीवरच्या त्या थंडीनं गोठवलेल्या वाटेकडे पाहूनच आम्ही मुकाट ‘फ्रंतेरा’ (सीमा) टॅक्सीत जाऊन बसलो! सीमापार जाणाऱ्या गर्दीची आम्हाला कल्पना दिली गेली होती. एवढया पहाटे लवकर तडमडत म्हणूनच आम्ही त्या रांगेचं शेपूट पकडायला आलो होतो. पाहातो तो रांगेत आम्ही साधारण दहावे! म्हणजे कामकाज सुरु झालं की तासाच्या आत आम्ही बोलिव्हियाचे होणार.

कुठल्याही साधारण टोलनाक्यासारखा त्या परिसराचा तोंडवळा होता. यथावकाश दारं किलकिली झाली, झरोके मोकळे झाले आणि माणसं रांगेतून गळत गळत निघाली. अर्जेन्टिनानं आम्हाला शिक्के मारून ‘रामराम’ म्हणून मोकळं केलं. भरलेले फॉर्म्स घेऊन आम्ही लगेच बोलिव्हियाच्या रांगेत लागलो. सगळीकडं अजून अंधारलेलंच होतं. दोन देशांना विभागणाऱ्या विलाझॉन नदीवरचा पूल ओलांडला की झालं.

सीमा अधिकाऱ्याच्या हातात आम्ही आमचे फॉर्म्स आणि पासपोर्टस् दिले रे दिले आणि एकदम मर्फीनं ‘बांग’ दिली! अगदी सणसणीत! आम्हाला काय ऐकू येणार ती? पण त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरून आम्ही ताडलं. भारतीय प्रजासत्ताकचे दोन इसम त्याच्या देशात यायची परवानगी मागत होते. हे जरा नवीनच होतं. परीक्षेत अभ्यास न करता गेल्यावर सगळे प्रश्न भीषण दिसतात आणि चेहऱ्यावर आपोआप एक बावळट, तुपाळ भाव दाटतो तसा तो ऑफिसर आमच्याकडे बघायला लागला! आम्ही आता काय ? म्हणून आल्या प्रश्नाला तोंड दयायला सज्ज! बराच वेळ पासपोर्टस् जणू पाठच करतोय इतके बघून त्यानं आमची परतीची तिकिटं मागितली. ती दाखवली. पण ‘भाऊसाहेबांचं’ समाधान होईना. मग ते म्हणाले, ‘तुम्ही इथून पुढे पेरूला चाललाय तर तिकडे जायची तिकिटं दाखवा’ आम्ही म्हणलो, ‘दादा, आमी गरीब मान्सं, यष्टीनं जानार, ततनं जाताजाता काडणार नव्हं का तिकटी!…’ आम्ही खरंच गरीबासारखे तिथं उभे. अडाणी आणि अडलेले! भाषा माहीत नाही आणि साहेब तर स्पॅनिशचा पदरच सोडायला तयार नाहीत. मग ते बोलते झाले, ‘पण बोलिव्हियातून पेरूला बसच नाहीत’. ही त्यांनी एक शुध्द लोणकढी सोडली होती. आमचा अंदाज घ्यायला.. थोडया वेळानं त्यानं आमचं बोलिव्हियामधलं राहायचं बुकिंग मागितलं. आम्ही असे सडे. त्यातूनही आमच्याकडं सुदैवानं एका दिवसाचं तुपिझा ह्या ठिकाणाचं बुकिंग होतं ते पुढं सरकावलं. त्याचे प्रश्न संपुष्टात आले. शेवटी तो आमची सगळी कागदपत्रं घेऊन दारामागे अंतर्धान पावला!

डोळ्यांत झोप उतरलेली, डोक्यात राख झालेली आणि अंग गारठलेलंय. ‘जर काही वाईट होणार असेल तर ते होईलच’! तब्बल तीन तास आम्ही शून्य चेहऱ्यानं त्या बंद दाराकडे बघत होतो. मग ते दार किलकिलं झालं, भाऊसाहेब आले आणि आमच्या पासपोर्टसच्या कपाळावर गुलाल बुक्का रेखला! आम्ही बघतोय. ‘आणि मर्फी हसला’ म्हणून आम्ही ‘मुचास ग्रासिआस’, (मंडळ)आभारी आहे म्हणायचा सराव पण केला. पण ह्यावेळीही अंदाज चुकला. प्लीज वेट असं इंग्लिशमध्ये म्हणून साहेबांनी अजून दोन तास आम्हाला थांबवलं. बहुधा आमच्या भारतीय चेहऱ्यांनी त्याच्या ऑफिसला शोभा येत होती की काय कुणास ठाऊक. किंवा त्या बोचऱ्या थंडीचा जरा अजून ‘मझा’ आम्ही घ्यावा असा सद्हेतू त्याच्या मनात असावा! बिन-अकलेच्या गरजवंतासारखे आम्ही थांबलो.

सरतेशेवटी आमचा टांगणीला लागलेला जीव मोकळा झाला. बाहेर आलो आणि एकमेकांकडे पाहून हसलो. इतका त्रास कधीच झाला नव्हता आत्तापर्यंत. म्हणूनच त्याचं महत्वही मोठं वाटत होतं. आमचा बोलिव्हियातला प्रवासोत्सव सीमेवरच्या सेल्फीनं सुरु झाला.

उठाठेवीतून उत्सवाकडे

Woman dancing at the festival of Virgin of Guadalupe in Tupiza, Bolivia

Women dancing in traditional clothes at the Virgin of Guadalupe festival in Tupiza, Bolivia

Women enjoying beer during the festival of Virgin of Guadalupe in Tupiza, Bolivia

तुपिझामध्ये पोहोचताच घरी फोन करून सुखरूप पोहोचल्याचं सांगितलं आणि ताणून दिली. सगळं अंग सैलावलं, झोप अलगद उतरली आणि आम्ही गाढ झोपलो. किती वेळ गेला कळलं नाही. ही साखरझोप एकदम संगीताच्या आवाजानं चाळवली गेली. धडपडत बाहेर येऊन पाह्यलं तर गणपती उत्सवासारखी मिरवणूक चालली होती. रंगीबेरंगी पारंपारिक पोशाखातल्या बायका, सैतानी झगे घातलेले पुरुष आणि अगदी तंग, आखूड स्कर्टसमधील मुली. सगळेजण त्या दणदणत्या तालावर नाचत होते. ते छोटं शहर सगळं रस्त्यावर लोटलेलं. आपल्याकडच्या गणपती-रथासारखं चारचाकी गाडयांना ‘डेकोरेशन’ केलं होतं. निरनिराळी ब्लँकेटस, सॉफ्ट टॉईज आणि फुलं. मिरवणूक चालू होती. एकदम ब्रेक लागावा तशी ती थांबली आणि लोक विश्रांती घ्यायला म्हणून एकदम बियर काढून तोंडाला लावू लागले! म्हणलं हे बरं आहे! काही म्हाताऱ्या कोका पानं (कोकेन बनवण्याचा कच्चा माल) चघळत होत्या. ह्या मिरवणुकीत आणि काश्मिरमध्ये सानी गावात पाहिलेल्या मिरवणुकीत कमालीचं साम्य होतं. अगदी सैतानी पोशाखापासून ते सैतानी पेयापर्यंत! ‘बायामान्सं’ही फुल ‘पियेली’ होती. तिथे बुद्धाच्या सन्मानासाठी आणि इथे व्हर्जिन मेरीच्या एका स्वरूपासाठी हा उत्सव चालला होता.

आमच्या सकाळच्या यथेच्छ अपमानाचा मोबदला म्हणून की काय हा उत्सव आम्हाला अगदी भावून गेला. इतका सहज सामोरा आला. आमच्याच बाबतीत हे का झालं, इतका त्रास का? हे सकाळी पडलेले प्रश्न आपोआप त्यात विरले. सीमेवरचा तो अहंकारांचा उत्सव ह्या सीमेच्या आत येऊन ताल-वादयात, नाचगाण्यात आणि आनंदात संपायचा होता. माणसाला असे प्रश्न सतत पडतात ज्याची उत्तरं तो शोधू शकत नाही. म्हणून तो जगायचं थांबवत नाही. जीवनोत्सव थांबवत नाही. मिरवणूक आमच्या दारावरून वाजतगाजत गेली. ‘बोलिव्हियात तुमचं स्वागतच आहे’. भरपूर पाहा, अनुभवा, आणि आमच्या जीवनोत्सवात आमचे म्हणून तात्पुरते का होईना रंगून आठवणी घेऊन जा’ असा संकेत देऊन गेली.

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW Series.

Scroll to Top