02 ‘पावलो’पुरता प्रकाश – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

मुक्काम पहिला

Street art from Sao Paulo, Brazil
‘साओ पावलो’. आमच्या पहिल्या मुक्कामाचं टिंब. ब्राझीलमधलं. बोरकरांच्या एका ललितलेखात ‘पावलापुरता प्रकाश’ ही कल्पना वाचली होती त्याची आठवण झाली. माणसाला पुढचं पाऊल टाकण्याइतका प्रकाश असला तरी पुरेसं होतं. एका क्षणाचं ज्ञान, मिणमिणता उजेड. पुढच्या पावलाचा ठाम विश्वास आणि नवीन गोष्टी पाहण्याचं मानवी कुतूहल. ते पाऊल आणि हे पावलो! आमचं पहिलं पाऊल.

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावरच कुतूहल वाढू लागलं. याआधी कामानिमित्त परदेशवाऱ्या घडल्या होत्या त्यावेळचं विमानतळ आणि आत्ताचं त्याचं रूप ह्यात फारच हवाहवासा फरक पडला होता! आम्ही थक्क झालो. त्याची रंगसंगती, म्युरल्स आणि वास्तुरचना सर्वच अप्रतिम. इष्ट मित्रांचा, नातेवाईकांचा निरोप घेतला. सगळ्या औपचारिकता पार पडल्या. विमानात जाऊन बसलो. कतार एअरवेजच्या विमानानं दोन उडयांमध्ये आणि एकवीस तासांमध्ये (प्रथम दोहा आणि मग साओ पावलो) आम्हाला मुक्कामावर सोडलं.

ब्राझीलच्या जमिनीवर पाऊल पडल्याक्षणी नजर भिरभिरू लागली. लहानसहान नवीन गोष्टी टिपू लागली. आनंद आणि हुरहूर ह्यांचं मिश्रण झालो होतो आम्ही. बॅकपॅक आणि इतर बॅगा सांभाळत ‘इमिग्रेशन ऑफिसर’ नामक शनीच्या प्रसन्न होण्याची वाट पाहात रांगेत लागलो! आमच्याकडे परतीचं तिकीट नव्हतं. त्यानं परत कधी जाणार असं विचारलं तर काय सांगायचं, बाहेर जायला वेळ तर नाही ना लागणार असल्या शंका कुशंका मनात डोकावून गेल्या. आम्ही त्याच्या समोर निरागस चेहरा घेऊन उभे राहिलो. त्यानं आमच्याकडं एकदा बघून आमच्या पासपोर्टवर शिक्के उमटवले आणि ‘वत्सा तुजप्रत कल्याण असो’ थाटात आमचं ब्राझीलमध्ये स्वागत केलं. त्या सुंदर विमानतळाचं सौंदर्य अचानक वाढलं! सुव्यवस्थित, सुनियोजितपणे चाललेला तो हलता बोलता ग्लोबल कट्टा एकदम मोकळा मोठ्ठा श्वास भरून पाहून घेतला. आम्ही ब्राझीलला पोहोचलो.

इतके दिवस यजमान, ‘होस्ट’ होतो ते आता पाहुणे झालो. पार्टी बदलली! आमचा पाहुणचार साओ पावलो मध्ये स्टीव्ह आणि त्याची पत्नी पॅट्रीशिया करणार होते. आमचे पहिले काउच सर्फिंग होस्ट. विमानतळावरून सिटी शटल बस, मेट्रो असे दरमजल दर करत मेट्रोच्या इच्छित स्टेशनवर उतरलो तर स्टीव्ह आम्हाला गाडी घेऊन न्यायला आला होता. आम्हाला फार आनंद आणि आश्चर्य वाटलं. ब्राझीलमधल्या सर्वात भव्य शहरात आमच्याशी सहानुभूती दाखवणारा स्टीव्ह एका चांगल्या अनुभवाची नांदीच करून गेला. तसे इथे शेकडो आश्रयदाते काउच सर्फर्स, पण आम्ही एखादा सोन्याचा शेलका दागिना निवडावा इतक्या कटाक्षानं स्टीव्हचं घर निवडलं होतं. आमची निवड त्यांनी सार्थ ठरवली. इतकं लेकुरवाळं घर उभ्या साओ पावलोत शोधून सापडलं नसतं! स्वतः स्टीव्ह, पत्नी पॅट्रीशिया, त्यांची साडेतीन वर्षांची धिटुकली मुलगी ल्युआना, तिच्या दोन आज्या, घरातले दोन पेइंग गेस्टस् अशी जंगी संख्या होती घरातल्या लोकांची! वर दोन मांजरं आणि दोन कुत्रीही! त्यात आम्ही दोघे येऊन जमा झालो. त्यांचं घर अजूनच भरून गेलं. ह्या भरल्या घरात आम्ही सहज वावरू लागलो.

With Steve, Patricia and Luana at their home, Sao Paulo, Brazilचहा, गप्पा सुरु झाल्या. साओ पावलोची लोकसंख्या मुंबईएवढी पण आकार मात्र मुंबईच्या दुप्पट. आपल्यासारखं कॉस्मॉपॉलिटन. कला आणि सांस्कृतिक राजधानी. इतर शहरांच्या तुलनेत थोडं वरचढ राहणीमान आणि गर्दी असलेलं. स्टीव्ह मोठया प्रेमानं आम्हाला गर्दीचे फायदे तोटे सांगत होता तेव्हा आम्ही त्याच्याकडे, चेहऱ्यावर केवळ प्रसन्न आध्यात्मिक भाव ठेवून पाहात होतो. ‘हाय कम्बख्त तूने ८.१७की कल्याण- सीएसटी फास्ट लोकल देखीही नही, असे! गर्दी आणि मुंबई ह्यांचं समीकरण थोडयाच वेळात त्याच्या लक्षात आलं आणि आमची गप्पांची गाडी रूळ बदलून पुन्हा धावू लागली. चित्र, रंग, ग्राफिक्स आणि ग्राफीटी (भित्तिचित्रे) ह्यांचा फार जवळून संबंध आला होता. स्टीव्ह राहातो त्या विला मॅदलेना भागात खास कलाकारांसाठी ग्राफीटी वॉल्स राखून ठेवल्या जातात हे ऐकून उत्सुकता वाढली. हे सगळे रस्त्यावरचे कलाकार, आणि घरांच्या, आजूबाजूच्या सर्व प्रकारच्या भिंती म्हणजे ह्यांची आर्ट गॅलरीच. उद्या तिथेच भेट देऊ म्हणून गप्पा आवरत्या घेतल्या.

कला संस्कृती आणि संग्रहालय

Artist Unknown - Beco do Batman, Sao Paulo, Brazil
माणसाची कला कशा स्वरूपात त्याच्यामधून प्रकट होईल हे अनुभवायचं असेल तर ह्या ग्राफिटी वॉल्स पाहायला हव्यात. ह्या गॅलरी परिसराला गंमतशीर नाव आहे, ‘बेको दो बॅटमॅन’! एकदम तजेलदार झगझगीत रंग, धीट रंगसंगती आणि खिळवून टाकणारा विचार. किती पाहू आणि किती नको असं झालं. ही ग्राफिटी एका निराळ्या संस्कृतीची ओळख करून देऊ पाहात होती. अनेक धारांनी, पंथांनी, माणसांनी, विचारांनी आणि जीवनपद्धतीनी एकत्र येऊन संक्रमित झालेली. ब्राझीलच्या प्रयोगशील कलाकारांची ही चिन्हं जागोजागी विखुरली होती. शहराच्या सौंदर्यात नकळत भर घालत होती. ह्यातलाच एखादा कलाकार नावारूपाला येतो. त्याच्या स्वतंत्र कलाविष्काराला येथे वेगळी बाजारपेठ उपलब्ध आहे. इतर अनेक छोटया छोटया आर्ट गॅलरीतून ह्या ‘स्ट्रीट आर्टीस्टस्’ चं विविध काम विक्रीसाठी ठेवलं जातं. एका विशिष्ट अर्थानं आपली संस्कृतीही ग्राफिटीचीच. अजिंठासारख्या लेण्यातून बुद्धाच्या महान जीवनाचा समग्र वेध घेणारी!

Model shoot - Beco do Batman, Sao Paulo, Brazil

Beco do Batman, Sao Paulo, Brazil

Beco do Batman, Sao Paulo, Brazil

ब्राझीलच्या बहुरंगी संस्कृतीची ओळख विविध संग्रहालयातून देखील जोपासली जाते. ‘इटाऊ कल्चराल’ हे त्यामधील महत्वाचं संग्रहालय. येथील संस्कृतीवर मूळनिवासी, पोर्तुगीज, आफ्रिकी आणि त्यानंतर युरोपातील विविध देशांमधून स्थलांतरित झालेल्यांचा प्रभाव आहे. ह्यातून समृध्द झालेल्या कला संस्कृतीचा हा सविस्तर इतिहास. मजेची गोष्ट अशी की एका बॅंकरला ही कल्पना सुचली! ब्राझील मधील सर्वात मोठया बँकांपैकी ‘बांको इटाऊ’ ह्या बँकेनं हे संग्रहालय स्थापन केलं. बँकेच्या व्यवहारी जगात अशी रसिक मंडळी असतील तर कलाकारांच्या रसिकतेची कल्पनाच केलेली बरी.

Museu Da Lingua Portuguesa, Sao Paulo, Brazilह्या संग्रहालयाला भेट देऊन साओ पावलो च्या सर्वात जुन्या आणि भव्य अशा लूझ स्टेशनपाशी आम्ही दाखल झालो. ह्या भारदस्त इमारतीच्या तीन मजल्यांवर आहे पोर्तुगीज भाषा संग्रहालय. कित्येक वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये स्थलांतरीत झालेले लोक बंदरामार्गे इथे पहिल्यांदा येत. त्यांची पोर्तुगीज भाषेशी ओळख इथेच पहिल्यांदा होत असे! हे ‘म्युझियम’ म्हणजे भाषेचा जिवंत इतिहास आहे. ब्राझील हा पोर्तुगीज भाषा बोलणारा जगातला सर्वात मोठा देश. व्यवहाराची भाषा म्हणून ब्राझिली संस्कृतीत पोर्तुगीज भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. ह्या भाषेची महती, त्याची ब्राझीलमध्ये रुजलेली मुळं, भाषेचा उत्कर्ष ते थेट आधुनिक भाषेपर्यंतचं आश्चर्यकारक दर्शन आपल्याला इथे घडतं. किती प्रकारची माहिती! शब्दापासून ते महाकाव्यापर्यंत आणि लिखित स्वरूपापासून ते अगदी फिल्म, इंटरॅक्टीव्ह किऑस्क पर्यंत. असं सर्वांगसुंदर सादरीकरण पाहताना ही भाषा जाणणारा प्रत्येकजण भाषाप्रेमानं उफाळून आलेला पहिला आणि आम्हाला ह्या भाषेचा हेवा वाटू लागला. आपल्या भारतीय भाषांचं असं ‘डॉक्युमेंटेशन’ व्हायला हवं, भाषा माहिती होण्यासाठी प्रेझेन्टेशनचे इतके देखणे प्रयोग व्हायला हवेत असं मनापासून वाटून गेलं.

Museu Da Lingua Portuguesa, Sao Paulo, Brazil

Museu Da Lingua Portuguesa, Sao Paulo, Brazil

शांत निवांत मस्त

साओ पावलोतला जून महिना एकदम निराळ्या उत्सवाचा असतो. मक्याच्या काढणीचा हा हंगाम इथे ‘जून फेस्टिव्हल’म्हणून उत्साहात साजरा करतात. देशी संगीत, नृत्य, पारंपारिक पोशाख आणि डिशेस ह्यांनी भरगच्च असलेला हा उत्सव. डिशेस मुख्यत्वे मक्यापासून केलेल्या. एखादया चर्चचं आवार किंवा एखादया पार्कचा कोपरा अशा ठिकाणी ही जून पार्टी रंगात आलेली असते. इथल्या स्त्रिया एकजात सगळ्या सुरेख, देखण्या. पारंपारिक पोशाखात ‘फोहो’ नाचात आपल्या जोडीदाराबरोबर त्या नाचू लागल्या की पाहतच राहावंसं वाटतं. एरवी फॅशनसॅव्ही असलेल्या ह्या मुली. स्कीन टाईटस शिवाय बात नाही! पण जूनची हवा त्यांना तात्पुरतं बदलून टाकते. ह्या तरुण मंडळींबरोबर लहान आणि थोर देखील सारख्याच उत्साहानं सामील होतात. गाणं आणि नाच हा ब्राझीलचा श्वास आहे. ते ह्या आनंदात आकंठ डुंबत असताना आम्ही आपले काठावर उभे राहून मजा पाहून आलो!

साओ पावलो जून फेस्टिव्हल – वेऴ: ५६ सेकंद

ह्याबरोबर सार्वजनिक जागेचा सुयोग्य वापर ही इथली खासियत. आम्ही राहत होतो त्या कॉलनीतली ‘नेबरहूड पिकनिक’ जवळून अनुभवली. पार्कच्या कोपऱ्या कोपऱ्यांत निरनिराळया गोष्टी. कुणाचं छोटेखानी ग्रंथालय, कुणी लहान मुलांना गोष्टी सांगतंय तर कुठे झाडांना झोपाळे टांगले गेले होते. ट्रॅम्पोलीनवर मुलं नाचतायत आणि जेवणाचं टेबल लावण्यात मोठी मंडळी गुंतलेली.
Parque Amadeu Decome, Sao Paulo, Brazil
आम्हाला मुंबईची गर्दीतली बाग आठवून गेली! छोटेखानी सफर, हिरवीगार नॅशनल पार्क, थोडा पाऊस, सतरंजीवर बसून उघडलेल्या डब्यातल्या खमंग बटाटा भाजीचा आणि लसणाच्या चटणीचा वास आणि पोटात खवळलेली भूक. इथे फक्त गर्दी जरा कमी आणि स्वच्छता जास्त! वातावरणात रविवार भरून राहिला होता. स्टीव्ह आम्हाला विचारत होता आर यू एन्जॉयिंग धिस? आम्ही म्हणत होतो ओह्ह येस.. वुई आर!! आमच्या मनाचा एक कोपरा रविवारच्या त्या पार्कसारखा लख्ख उजळून गेला होता. आमचा ‘’पावलो’पुरता प्रकाश झळाळत होता…

ईमेल : rtw@sandeepachetan.com
शब्दांकन : अभय अरुण इनामदार

This was originally published in the RTW series.

Scroll to Top