22 जळ वाळूचे सकळ – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

ती एक सुंदर राजकुमारी होती. सकाळच्या वेळी स्नान करत असताना एका दुष्ट शिकाऱ्यानं तिला पाहिलं. ती आंघोळीचं पाणी तसंच सोडून आपली वस्त्रं सावरत धावत सुटली. तिचं वस्त्र जमिनीवरून जसजसं लोळत गेलं तश्या तिथं लहान मोठया वाळूच्या टेकडया निर्माण होत गेल्या. त्या टेकडयांमुळे शिकाऱ्याची मात्र वाट खुंटली! पाणी तसंच राहिलं. आणि त्याच्या भोवती आता छोटं वाळवंट तयार झालं. इका शहराजवळ असलेल्या वाकाचीना ओअॅसिसची, मरुद्यानाची ही छोटीशी दंतकथा!

वाळूतल्या ‘वाकाचीना’कडे

दंतकथा फार सुरेख असतात. त्यात खरेपणाचा अंश कितपत असतो हे माहीत नाही पण त्या आपली उत्सुकता चाळवतात. आम्ही वाळवंट कधी पाहिलं नव्हतं. ते आमच्या जायच्या वाटेवरच होतं. म्हणून इकाला जाऊन पोहोचलो. जातानाच्या रस्त्याचा फरक मात्र अगदी प्रचंड होता. रात्री निघालो होतो तेव्हा सगळीकडे उंचउंच डोंगर आणि सकाळी एकदम सरळ उजाड पठार! हे म्हणजे शाळेत शास्त्राच्या तासानंतर एकदम मराठीच्या तासाला बालकवींची कविता म्हटल्यासारखं. खरं तर इका शहर हे पेरू देशाची वाईन राजधानी आहे पण आम्हाला ओअॅसिसच्या पाण्याची तहान लागली होती!

ते जग एकदम काल्पनिक जगासारखं वाटतं. फार मोठं नाही. निवांत चक्कर मारता येईल इतपत. वाकाचीना ओअॅसिसच्या त्या चिमुकल्या तळ्याभोवती वर्तुळाकार रस्ता बांधून काढला आहे. सगळीकडे हॉटेल्स आहेत. असं वाटतं कुठल्यातरी निराळ्याच जगात आलो आहोत. आजूबाजूच्या वाळूच्या टेकडया त्यात भर टाकतात. कुठल्याही छोटया मोठया टेकडीवर चढून जा आणि बसून राहा. सूर्यास्त बघा आणि परत या! पहिल्या संध्याकाळी आम्ही तेच केलं. आमच्या कुवतीप्रमाणे एका छोटया टेकडीवर चढायला लागलो. ‘तीन पावलं चढल्यावर एक पाऊल मागे घसरा’ ह्या हिशेबानं चढायला वेळ लागला! वर पोहोचल्यावर मात्र तिथल्या दृश्यानं संमोहित झालो. सगळीकडे लांब लांब पसरलेलं, निर्विकार पहुडलेलं वाळवंट. वाऱ्यानं वाळूवर उमटलेल्या लाटा. दूरवर उजळणारे इका शहराचे दिवे. थंडी पडत चालली होती. मंद वारा वाहात होता. संध्याकाळच्या त्या शांत प्रहरात उगीच एखादया टेकडीवर ती राजकुमारी येऊन जाईल असं वाटून गेलं. बराच वेळ तिथं घालवून खाली उतरलो. ओअॅसिसमध्येही दिवेलागण झाली होती.

वाकाचीना ओअॅसिस मुख्यत्वे एका दिवसाच्या ‘ट्रीप’चं प्रसिध्द स्थान आहे. फार कमी पर्यटक मुक्कामी असतात. कदाचित हंगामात गर्दी असावी. त्या दिवशी मात्र फार तुरळक होती. एवढं सुंदर ठिकाण फक्त आमच्या फिरण्यासाठी रिकामं पडलं होतं.

बग्गी, बोर्ड आणि बाउन्सिंग

वाकाचीनाला एक भन्नाट खेळ खेळता येतो. एकदम चरचरीत लाल, हिरवी किंवा पिवळी रंगवलेली एक बग्गी असते. मोठमोठे टायर्स आणि शक्तिशाली इंजिन. सगळ्या बाजूनी उघडी, एखादया गाडीच्या सांगाडयासारखी. आत आठ-दहा ‘शिटा’ बसवलेल्या. आपण सुरक्षा पट्टा आणि जीव धरून त्यात बसायचं. गाडी सुरु होते आणि त्या वाळूच्या टेकडयांवरुन सुसाट वेगानं वर खाली होत धावायला लागते. उतारावरून खाली येताना आपला प्राण कंठाशी आलेला असतो आणि वर जाताना छातीवर मणामणाचं ओझं यायला लागतं. सगळी धमाल. शेवटी एका छोटया टेकडीवर थांबलो. बग्गीतून खाली उतरलो. उतरताना आपलं पोट हे एक मोठी रटरटती कढई असून त्यात भरपूर रसायनं उकळतायत असं वाटत होतं! सगळी आतडी गोळा झाली होती. त्या टेकडीवर आम्ही कसेकसे आलो ते काहीही उमगत नव्हतं. सगळ्या टेकडया सारख्याच दिसत होत्या. वाळवंटात हरवायला का होत असेल ते कळलं. ओळखीची कुठलीही चिन्हं, खुणा इथं नव्हत्या.

आम्ही जरा कुठं स्थिरस्थावर होतोय तोवर गाईडनं एक बोर्ड हातात दिला आणि म्हणाला, ‘हंs जा आता खाली घसरत ह्याच्यावरून!’ आमच्या पोटात पुन्हा गोळा. काही महाभाग अगदी सराईतासारखे दोन्ही पायांखाली बोर्ड घेऊन समुद्राच्या लाटांवर सर्फिंग केल्यासारखे खाली जात होते. आम्ही त्यातल्या त्यात सोपा मार्ग निवडला. सरळ बोर्डावर पालथे झोपलो. हातपाय बोर्डाला घट्ट चिकटलेले. डोकं उंचावलेलं! मऊ कोमट वाळूचा सूक्ष्म वास येतोय. आम्ही खाली पाहातोय! आणि अचानक एका धक्क्यानं उताराला लागतो. पोटातला गोळा मोठा होतोय. सगळं जग आपल्याबरोबर खाली चाललंय. बोर्डचा वेग वाढतो अजून वाढतो आणि सर्रकन आपण बघता बघता खाली येऊन पोहोचलेले असतो! ‘व्वाह, हे तर मस्त आहे आणि पुन्हा करणं ‘मस्ट’ आहे!’ असं म्हणेपर्यंत जाणीव होते की मगाशी आपल्याला गाडीनं वर सोडलं होतं. आता आपलं आपलंच वर जायला लागेल! पण तेवढे कष्ट घेण्याइतका हा अनुभव जबरदस्त असतो. पुन्हा वर जायला लागलो. असा अजून एक दोनदा सराव झाल्यावर एका भल्यामोठया टेकाडावर चढून गेलो. तिथल्या घसरण्याला तर तोड नव्हती. असं वाटलं की हा उतार कधी संपणारच नाही, हा वेग वाढतच जाईल आणि ही मस्ती अखंड राहील. पण शेवटी खाली पोहोचलोच! आमच्या हसण्याला अंत नव्हता. जगात कुठं उर्जा भरलेली असेल तर अशा निखळ निर्भेळ आनंदाच्या अनुभवात भरलेली आहे!

इस्ला बाल्येस्तासचे मृगजळ

ह्या ओअॅसिसच्या कोरडया धरतीवरून आता आम्हाला उसळत्या समुद्राचं आणि प्राणी-पक्षांच्या नंदनवनाचं एक मृगजळ दृष्टीस पडत होतं. पण खरं पाहाता ते मृगजळ नव्हतं, एक वस्तुस्थिती होती. इथून अवघ्या काही तासाच्या अंतरावर पॅसिफिक महासागरात इस्ला बाल्येस्तास नावाची बेटं आहेत. पेलिकन, ब्लू फुटेड बूबी, पेंग्विन, सील्स अशा नवलाईच्या पक्ष्या-प्राण्यांची मोठी वसाहत. इथं जायला निघाल्यावरच पेलिकन पक्ष्यांच्या लीला सुरु झाल्या. बोटीपासून अगदी हाकेच्या अंतरावर ते सुरेख पिवळ्या, पांढऱ्या मोठया चोचीचे पक्षी शिकारीसाठी पाण्यात सूर मारत होते. बूबीज, कॉर्मोरंटस, दुर्मिळ असा इन्कन टर्न अशा अनेक सुंदर पक्ष्यांनी आम्हाला उदारपणे दर्शन घेऊन दिलं. बाल्येस्तास म्हणजे कमान. ही बेटं नैसर्गिकरित्या तयार झालेल्या अनेक कमानींनी नटलेली आहेत. अशाच एका कमानीवर काही बुटके काळे-पांढरे ‘म्हातारे’ चालताना बघितले आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. आम्ही पहिल्यांदाच पेंग्विन बघत होतो. डुलत डुलत म्हाताऱ्यासारखे पुढं चालले होते! ह्या बेटांवर खाली उतरायला परवानगी नाही. सगळं बोटीत बसूनच बघायचं.
पक्ष्यांची संख्या खूप असल्यानं त्यांच्या विष्ठेनं ह्या बेटांची जमीन माखून गेली होती. त्याचा वासही येत होता. पण ही विष्ठाही क्षारयुक्त आणि पोषणास योग्य असल्यानं सरकार दर वर्षी ‘स्वखर्चानं’ एक स्वच्छता अभियान राबवून ही जागा स्वच्छ करते हे ऐकल्यावर हे जग किती वैविध्यानं आणि चमत्कारिक गोष्टींनी भरलंय यांचं आश्चर्य वाटलं. कुठं दगडांवर निवांत बसलेले सील्सपण आढळले पण त्या दिवशी त्यांचा सुट्टीचा दिवस वगैरे असावा! बहुतेक जण उन्हाला आपली तुकतुकीत त्वचा वाळवत निवांत पडले होते.

ह्या सगळ्या नैसर्गिक आश्चर्यांत एक मानवी आश्चर्यही आढळलं. प्रचंड आकाराचं, अगदी बारा मैल लांब समुद्रातूनही दिसणारं एक भूचिन्ह किंवा ‘जिओग्लीफ’. कुणी म्हणतात हे मानवी नाही, परग्रहावरच्या मानवांनी बनवलं. ह्या भूचिन्हाचं उद्देश्य काय ह्याच्याभोवती शक्याशक्यतांचं एक मोठं धुकं दाटून आहे. अशा धुक्या-मृगजळांच्या धूसर पण तरीही आकर्षक वाटा आम्हाला सतत बोलावतात. ‘इकडे या, प्रश्न पडू दया, काहींची उत्तरं सापडतील, काही अनुत्तरीत प्रश्न घेऊन परत निघा’ असं सांगतात. इका शहराकडे परतत असताना मात्र आम्हाला सापडलेल्या ह्या जळाच्या आणि वाळूच्या अनुभवाविषयी मनात एकच भावना होती.

जळ वाळूचे सकळ|
अनुभव हे निर्मळ |
जणू हाती मृगजळ|
गवसले|

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW Series.

Scroll to Top