14 इथला नसे हा सोहळा – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

काही गोष्टी फसव्या असतात. उदाहरणार्थ वेरूळ अजिंठा लेणी. आपल्याला वाटतं, असतील दोघं इथंच एकमेकांच्या परसात. पण वेरूळला जाऊन पोहोचतो तेव्हा कळतं की अजिंठा अभी दूर है! चालले परत गाडी काढून. आणि एक दिवस एका ठिकाणी पुरत नाही. तसंच दुसरं लाडकं ठिकाण म्हणजे अष्टविनायक. दोन दिवस फिरतोय आपलं गाडीतून. मात्र दोन्ही ठिकाणी जाऊन आलं की मिळणारं समाधान मात्र तळपत्या उन्हातून येऊन डोक्यावरून थंड पाणी ओतल्याइतकं! एकात काळाच्या ओघात गडप झालेल्या शिल्पकारांचं, चित्रकारांचं सामर्थ्य आणि एकात भक्तिभावाचं. हा एक सोहळाच म्हणायचा.

चला सालाssर सालाssर!

तुपिझाच्या रस्त्यांवर उभे राहून आम्ही अशा अष्टविनायक यात्रा छाप जाहिराती बघत होतो. ‘सालार दे उयुनी’ ला नेणाऱ्या यात्रा कंपन्यांची अगदी थेट आवाहनं, ‘तीन दिवसात चहा नाश्ता जेवण आणि गाडीखर्चासह’ चला! जगातील ह्या सर्वात मोठया आश्चर्यकारक मीठसागराला जायला मजल दर मजल करतच जावं लागतं. पण तिथे जाणारा प्रवासही मौजेचा असतो असं कळलं होतं. आमचा पहाण्याचा अधाशीपणा असा पथ्यावर पडतो! पैसे वाचतातच आणि नजरबंदया त्या निराळ्या! पाऊल टाकलेल्या पहिल्याच कंपनीत अगदी फक्त आमच्यासाठी ‘पेशल’ दोन जागा ‘डायवर’च्या बाजूला राहिल्या होत्या. या योगायोगाचं कौतुक करायचं का त्या माणसाच्या विक्रयकलेला दाद दयायची ह्याचा निर्णय काही घेतला नाही! आमचा वेळ वाचणार होता. लगेच त्या ‘डिस्काऊंट मारके’ जागा भरून काढल्या. चलो राईड…दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी त्या भल्या मोठया फोरव्हील ड्राईव्ह लँडक्रूझरचं शक्तिशाली इंजिन धडाडलं. चार दिवस खाना पिना रहना सगळं आता दुसऱ्याच्या हातात. आपण पाहायचं मनसोक्त. जेवायला मिळालं की खायचं, झोपायला मिळालं की अंग टाकायचं. आमच्यासोबत इटली,ब्रिटनची दोन तीन ‘कलमं’, आणि आमचा सारथी फिलिपे. चार दिवसांचा तारणहार.

दक्षिण पश्चिम बोलिव्हियाच्या धूळभरल्या रस्त्यांवरून आणि डोंगरांमधून आमची क्रूझर कूच करत निघाली. तपकिरी लाल रंगांचा कॅनव्हास. त्यावर फरकाटे ओढल्यासारखे निवडुंग आणि गाडीतून प्रवास करणारे आमच्यासारखे मानव! हे सगळं बघत त्याची संगती लावण्यात दोन तास कसे गेले कळलं नाही. ‘चला खाऊन घ्या’ असं फिलिपे म्हणाला. त्यानं गाडी बाजूला लावून लगेच मागचं दार उघडून नाश्त्याचा जामानिमा बाहेर काढला. सकाळची थंड वेळ. ऐन डोंगरात कोपऱ्यावर थांबलेली गाडी आणि हातात वाफाळता चहा. ब्रेड, लोणी आणि मार्मालेड नावाचा किंचित कडवट मुरांबा. जरा हे सँडविच संपवून ती फ्रेम कॅमेऱ्यात पकडावी की आधी झटकन फोटो काढावा असला गोंधळ.

त्यानंतर मात्र प्रवासाची तंद्री लागली. मग हे लामा प्राण्यांचे तांडे निघाले, तिकडचे धनगर किती छान, अरे हे गाव तर फक्त ऐंशीच लोकांचं आहे, मग इथे पाणी कुठून आणत असतील म्हणत सगळ्या मंडळींची जरा डुलकीही झाली! फिलिपे नावाचा ‘समंध’ मात्र गाडीच्या चाकामागे सतर्क होता. समंध अशासाठी की तो आम्हाला संध्याकाळच्या तशा कातरवेळी चक्क पिशाच्चांच्या गावी नेत होता. पुअेब्लो फान्तसमा ह्या गावी काही अज्ञात कारणांमुळं तिथली सगळी माणसं जीवाला मुकली. ओसाड भकास घरं, चर्चेस, शाळा असं बघत संध्याकाळ अजूनच हळवी झाली. जिथे एखादी पणती, दिवाही पेटत नाही, स्वयंपाक शिजत नाही तिथलं गावपण कायमचं हरवलं! आमचे श्वास जड झाले. त्याला आम्ही कापलेली उंचीही तितकीच कारणीभूत होती. ही भावना तशी परकीच होती. स्वाऱ्या पुढे निघाल्या. सोनसळी गुलाबी सूर्यास्ताच्या सुमारास मुक्कामी लागलो. एदुआर्दो आवरोआ राष्ट्रीय उद्यानात होस्टेल ही आम्हाला फारच चैन वाटत होती. कुठेच काही नाही, सगळं वैराण माळरान आणि एकदम जादूची कांडी फिरवून स्वच्छ बिछाने आणि उबदार पांघरूणं. जेवण उरकून त्या कडाक्याच्या थंडीत झोपायचा प्रयत्न केला. इतक्या उंचीवरच्या श्वासोच्छवासाचं गणित काही जमेना. कशीबशी तळमळत रात्र जाऊ लागली.

दिवस असे की

रात्री किती वेळा जाग आली, की झोप लागली आता कळत नाही पण सकाळी साताच्या प्रस्थानाला तयार व्हायला शेवटी एकदाचे उठलोच! प्रवास होता दाली वाळवंटाचा, राष्ट्रीय उद्यानाचा आणि फिलीपेच्या त्या प्रदेश-कौशल्याचा! पुढच्या दोन दिवसांच्या प्रवासाचा एक खोल ठसा मनावर उमटत गेला. काय काय बघावं. जिथं पाहावं तिथं रसरशीत स्वरूपातलं अक्षरशः नावीन्य. साधी नावाची पाटी नसलेल्या त्या प्रदेशात आमचा सारथी आम्हाला सराईतपणे फिरवत होता. कधी गरम पाण्याचे झरे, कधी गारगोटीसारख्या दिसणाऱ्या हिरव्या तळ्याकडे (लगुना वेर्दे) नेत होता. तिथून पुढे नुसती तळीच तळी. कधी पांढरी, कधी लाल. आम्ही ह्या प्रदेशांचे फोटो वारंवार पाहिले होते. त्याचं सौंदर्य बघून वेडे झालो होतो. पण प्रतिमा आणि प्रत्यक्ष दर्शन ह्यांची तुलना होऊच शकत नव्हती. ह्यालाही कारण होतं. आमच्या प्रत्येक दृश्यात भणाणणारा थंडगार बोचरा वारा होता! सहविचारी माणसांचा रसिक घोळका बरोबर होता. आणि प्रत्येक दृश्यात ‘हे काही पृथ्वीवरचं वाटत नाही’ ह्याच विचारात धडाडणारा दोघांचा श्वास होता!

आमच्या ह्या भासाला पुष्टी दिली अचानक उफाळणाऱ्या सल्फरच्या वाफेनी. ह्या उंच उसळणाऱ्या वाफेच्या कारंजाकडे पाहून ‘मज्जा’ तर वाटत होती पण वास मात्र अगदी सहन होत नव्हता. सडलेल्या अंडयाचा रसायन प्रयोगशाळेत हटकून मारणारा वास! इतक्या वेगळ्या दृश्याचा इतका भयाण वास ह्या भूतलावरचा असू शकत नाही ह्याची खात्रीच झाली! त्यानंतरच्या प्रवासात वाऱ्यानं आणि इथल्या वातावरणानं मांडलेली आर्ट गॅलरी पाहण्यात आली! आत्तापर्यंत पाहिलेल्या कलाविष्कारांपैकी सर्वांत अजब. त्याचा शिल्पकार अज्ञात होता. त्याला कुणी सांगितलंही नाही की इथे तुला फुटेज मिळेल, इथेच लाव तुझी गॅलरी! त्या वैराण वाळवंटात मोठमोठया पाषाणांची शिल्पं आपोआप तयार झाली होती. जणू छिन्नी हातोडा घेऊन कुणी आवर्जून करावीत इतकी कलात्मक. प्राणी, पक्षी, कार्टून, विचित्र चेहरे. तुम्ही लावाल तसा अर्थ. ‘हे सगळं ‘एलियन’ आहे’ ह्या आमच्या समजात भर पडली.

होस्टेलमध्ये पण हाडं गोठवणारी थंडी. सहा सात थरांच्या त्या गरम कपडयांत आम्ही स्वतःच परग्रहवासी दिसत होतो! खोलीत पेटलेल्या अपुऱ्या शेकोटीवर ऊब घेत होतो. ह्याच वेळी फिलिपे आणि त्याचे इतर सहकारी गाडयांची देखभाल करण्यात गुंग होते. कुठं पेट्रोल भरून ठेव, टायर्स तपास, इंजिनाचा रागरंग बघ. असल्या निबिड भागात गाडी बंद पडणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. त्यांच्या त्या निष्ठेचं कौतुक वाटलं. शेवटच्या दिवशी तर संध्याकाळच्या सुमारास एका सखल मिठागरात आमच्या गाडीचा टायर अडकला. सगळ्यांनी जोर लावूनही गाडी निघेना. होस्टेल चालण्याच्या अंतरावर आलं होतं. फिलिपे चालत चालत मदत आणायला गेला. तेवढयात मागच्या गाडया आल्या. त्यांना लक्षात आल्यावर दोघंही म्हणाले आम्ही ह्यांना सोडून मदतीला येतो. ते दोघंही फिलिपेच्या कंपनीचे नव्हते. पण इथे असल्या क्षुद्र विचारांना मागे ठेवण्याइतकी शहाणी जाणीव त्यांना होती. विपरीत निसर्ग माणसांना नकळत एकत्र आणत होता, बांधत होता. तेव्हा क्षणभर वाटून गेलं आम्ही ‘माणसाच्या’ पृथ्वीवरच आहोत.

पण हा समज पुन्हा खोटा ठरलाच! सालार दे उयुनीला पोहोचायच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही होतो. रात्र आश्चर्यकारक रित्या जरा कमी थंड होती. आम्ही बाहेर पडलो आणि समोरच्या आकाशगंगेनं अगदी आम्हाला तिच्यात खेचूनच घेतलं. त्या आकाशात आम्ही विरघळू लागलो. ताऱ्यांनी खच्चून भरलेलं आभाळ आणि मनात केवळ विस्मय दाटून आलेले आम्ही दोघं. आठवणीचं दृष्यमोहोळ आणि सतत हीच भावना: इथला नसे हा सोहळा…!

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW Series.

Scroll to Top