थ्री फ्रंटीयर पॉईन्टवर आम्ही उभे. एकदम तीन देश पाहतोय. इगुआसु आणि पराणा नदीच्या संगमावर ब्राझील,अर्जेन्टिना आणि पॅराग्वे ह्या तीन देशांच्या सीमा एकवटल्या आहेत. हिरव्या रंगाच्या गर्द झाडीमागे त्या त्या देशांची ठाणी. बाकी बंदोबस्त काही नाही. निदान आम्हाला तरी दिसला नाही. आपल्याकडे संगमांचं स्थानमाहात्म्य काही नवीन नाही. त्या ‘पवित्र’ स्थळाकडे पाहाताना आपलेपणाची जाणीव वाढली. बदलतं काय? काही नाही. फक्त नकाशे बदलतात, आपलेपणा नाही. देणाऱ्यांचे हजारो हात मुक्तहस्ते देतात. आपण घेत राहायचं. देश कुठला का असेना. बोयनॉस आयरेसला जाताना केलेल्या वीस तासांच्या बसप्रवासातील अनंत आठवणींचं हे संचित!
मोकळ्या हवेचं शहर
आम्ही अर्जेन्टिनाच्या राजधानीत येऊन दाखल झालो. बोयनॉस आयरेस. म्हणजे शुद्ध मोकळी हवा! देशाच्या ह्या सर्वात मोठया शहरात आपलेपणाच्या भावनेची साय अजूनच घट्ट झाली होती. ह्याचं कारण होते आमचे यजमान. अवघ्या ‘लॅतिन’ अमेरिका खंडातले आमचे एकमेव ‘स्नेही’! दोन वर्षांपूर्वी मुंबईला आमच्याकडे राहून गेलेले. तेव्हा आम्ही ‘राउंड द वर्ल्ड’च्या स्वप्नात चाचपडत होतो. आमचे सूर तिथेच जुळले. त्यांच्या भेटीचा हा अपूर्ण स्नेहधागा त्यांच्या शहरात जाऊन निरगाठीत बांधायचा हे ठरवलंच होतं. त्या अनोळखी शहरात आम्ही अचानक आजोळी आल्यासारखे निर्धास्त झालो! ‘स्वप्नवाटे’चा आत्तापर्यंतचा प्रवास निको आणि लॉराला सांगू लागलो. मग कुठं आलं घालून सगळ्यांना चहाच करून दे, कधी ब्रेकफास्टला निवांत गप्पा मारत बस असा वेळ मौजेचा गेला. निको आणि लॉरा तीन महिन्यांच्या भारतप्रवासात आपल्या खादयप्रकारांच्या प्रेमातच पडले होते. एके रात्री खास त्यांच्यासाठी पालकपनीर, छोले आणि चक्क दाण्याचं कूट घालून कोशिंबीर असा बेत झाला. यथावकाश आम्ही भटकायला सिद्ध झालो.
शहराच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागातून आमची ‘फ्री टूर’ सुरु झाली. अर्जेन्टिना आणि इतर लॅटिन अमेरिकन देशांची कहाणी साधारण आपल्यासारखी. संपन्न भौगोलिक साधनसंपत्तीनं ओतप्रोत असून देशाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती रेंगाळलेली. आपल्यासारखंच अर्जेन्टिनासाठी एकोणीसशे नव्वद महत्वाचं. देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली. राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत झालेला. त्यातून देशानं भरारी घेतली. स्थानिक उदयोगांची भरभराट झाली, निर्यात वाढली. ह्या बदलत्या व्यवस्थेचं प्रतिबिंब बोयनॉस आयरेसच्या रस्त्या-रस्त्यांवर दिसत होतं. ‘अर्जेन्टिना मेक’चं, स्वाभिमानाचं, आत्मविश्वासाचं आपल्याला परिचित असलेलं एक राष्ट्रीय चित्र! आपल्यासारखं!
ह्या शहराला दक्षिण अमेरिकेचं सर्वात ‘युरोपियनाळलेलं’ (हुश्शsss बरोब्बर म्हणलं!) शहर म्हणून ओळखतात. अतिआधुनिक सुपर मॉल्स आणि गृहसंकुलांच्या बाजूला म्हणूनच एखादी गॉथिक शैलीची दोन मजली इमारत सहज आपलं भारदस्त अस्तित्व टिकवून उभी राहू शकते. मुख्यत्वे स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन प्रभाव. लोकांच्या बोलण्याला आणि देहबोलीला इटालियन तडका. आम्हाला तर ‘गॉडफादर’ची अगदी चरचरीत आठवण येऊन गेली! आम्ही भेटलेल्या बहुतेक माणसांकडे अर्जेन्टिनासोबत इटलीचाही पासपोर्ट होता.
मरणानंतर सुद्धा आब राखून असणारी ही माणसं. म्हणजे सगळेच नाहीत. जे श्रीमंत आणि प्रसिद्ध आहेत तेच! ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल म्हणतात तसला प्रकार. आयुष्यात थडगी बघायला जाऊ असं नव्हतं वाटलं! रेकोलेटा दफनभूमी हे अशा स्टायलिश थडग्यांचं आश्रयस्थान. मात्र ह्या थडग्यांचं डिझाईन आणि बांधणी इतकी सुंदर की प्रथमदर्शनी ‘दफन’ न आठवता त्या ‘सृजन’ आविष्काराचं कौतुक करावंसं वाटतं.
टँगो, फुटबॉल आणि ला-बोका
शरीरांचा मादक, हळवा स्पर्श. नृत्य पुढे नेणारा एक ‘नर’ आणि दुसरी त्याला सळसळती सोबत करणारी ‘मादी’. मानवसंस्कृतीचा उच्चबिंदू रेखणारं एक लपलपतं उत्कट कलाप्रतीक. टँगो! ह्यांची नुसती शरीरंच नाही तर नजराही नाचतायत, एक सनातन आवाहन करतायत. त्या आवाहनाची खोलाई आपल्या नजरेपलीकडची. ती ते नर्तकच जाणोत! ला-बोकाच्या निवांत रेस्टॉरंटमध्ये बसून आम्ही गरम सूप पीत येरुसारखे त्या टँगोनृत्याकडे पाहात होतो! टँगो बोयनॉस आयरेसच्या मातीतच जन्मला, रुजला आणि फोफावला.
ला-बोका हे ह्या शहराचं एक ‘नेबरहूड’. चमकदार रंगीत घरांचं, फुटबॉलच्या गोलांचं आणि दिएगो मॅराडोनाचं. छोटया, आर्थिकदृष्टया कमकुवत अशा भागातला हा महान फुटबॉल खेळाडू जगाच्या नकाशावर आपली ‘पदचिन्हं’ कोरत गेला आणि लोकांचं दैवत बनला. इथे सगळीकडे फुटबॉलची लागण झाली. आम्हाला ह्या वेडाची झलक जागोजागी दिसत गेली. ला-बोकाचा कामिनितो रस्ता रविवारच्या बाजारामुळे जिवंत झाला होता. ठिकठिकाणी टँगो नृत्य, छोटया दगडी रस्त्यांवर थाटलेली लाल, निळी, पिवळी दुकानं, पपेट शोज आणि जादुगारांची करामत.
असे अनेक रस्ते, नेबरहूडस्. सॅल-तेल्मोही प्रेक्षणीय. आपला ‘विंटेज लूक’ जपणारं. सगळं जुन्या पद्धतीनं सजवलेलं. कॅफेज,चर्चेस, बारपासून ते थेट संगीत तबकडया, बाहुल्या, कपडे इथपर्यंत. रस्त्यावर उभे असलेल्या ‘गवैय्या’ आणि ‘बजवैय्यां’नी परिसर नुसता दुमदुमत होता. गंमत म्हणजे सॅन डोम्बेल नावाच्या ग्रुपनं एक ठेका धरला तो थेट आपल्या गणपती विसर्जनाच्या ठेक्यासारखा! सगळं विसरून, कामं टाकून लोक चक्क नाचायला लागले. नुसती धमाल उडाली. ठेका संपताना परतीची वाट धरली.
इथला बहुतेक प्रवास मेट्रो किंवा बसनंच करत होतो. आम्ही परदेशातून आलो म्हणल्यावर लगेच प्रेमळ सूचनांचा भडिमार. खिसे सांभाळा, कॅमेरा, मोबाईल सुरक्षित ठेवा, इकडे जाऊ नका, असं करा तसं नको, एक ना दोन. त्यातून त्यांची काळजी सहज दिसत होती. रस्त्यावरचे लोक, दुकानदार, बस-कंडक्टर असे सगळे भाषा येत नसली तरी खाणाखुणांनी सांगत होते, हसत होते. त्या निर्व्याज भावनेचा आनंद मोठा होता.
आपुलकीचं ‘असाडो’
आपल्या पुरणपोळीला एक परंपरा आहे. म्हाताऱ्या सुरकुतलेल्या हातच्या पुरणपोळीची भन्नाट चव वर्षानुवर्षं झिरपत हिरवी कांकणं ल्यायलेल्या गोऱ्यापान हातात उतरावी. त्या सुग्रासावर पिढीच्या पिढी पुष्ट व्हावी. संक्रमण चालू राहावं. तसं काहीसं इथल्या ‘असाडो’चं आहे. आणि असाडोला असाडोच म्हणायचं. बार्बेक्यू नाही. नाहीतर अपमान होतो! त्या संस्कृतीचा आणि त्या कलाकृतीचाही. मांस हा इथल्या संस्कृतीचा ‘बडा’ ख्याल आहे! इथलं मांस जगातील सर्वोत्तमांपैकी एक मानलं जातं. आपला खाटीक, आपण शोधावा, तुकडा हेरावा, शेलकासा ह्या न्यायानं मांस खरेदी संपन्न होते. अत्यंत गंभीरपणे असाडोची तयारी चालते. स्वतःच्या किंवा कॉमन ग्रीलवर परतायला पडते. हा प्रांत स्त्रियांचा नाही. घराघरातले बल्लव आपापल्या पुत्रशिष्यांना ही संथा देतात. आमच्या यजमानानं सिध्द केलेला असाडो आम्ही फार आदरानं खाल्ला. निको आम्हाला वाढत होता. आग्रह करत होता. त्याचं सगळं कुटुंब आमच्याकडे आपलेपणानं पाहात होतं. त्या आदरातिथ्याचा भार होत नव्हता.
इथे ‘डुल्से द लेछे’ म्हणजे गोड दुधापासून केलेल्या क्रीमचा एक भन्नाट प्रकार मिळतो. आमच्या रोजच्या खाण्यात तो आम्ही मुबलक वापरला. डुल्से द लेछे फ्लेवर असल्याशिवाय अर्जेटिनावासीयांच्या खादयप्रकाराला पूर्णत्व येत नाही. एक गोड, नरम आपुलकीचं पूर्णत्व. आम्हाला तसंच वाटत होतं. वाटत होतं की बोयनॉस आयरेस हे आमच्या प्रवासातलं डुल्से द लेछे आहे. हे शहर खरंच आमचं आहे. आमचं बोयनॉस आयरेस!
छायाचित्र : संदीपा अाणि चेतन
शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com.
This was originally published in the RTW series.