31 राऊंड द वर्ल्ड- व्हाया ठाणे – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

मागच्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये चेत्याचा अचानक फोन आला. ‘अभ्या’, आम्ही चाललोय, व्हिसाचं काम झालं!’. मनात विचार आला, हे एक दिवस होणार होतंच. ज्यावेळी आम्ही सगळेच नोकरी-बिकरी करायचो, महिन्यातून काहीवेळा भेटायचो तेव्हा ह्या राऊंड द वर्ल्डची हलकी झुळूक यायची. मग चेतननं लग्न केलं आणि चक्क जोरदार वाराच की हो वाहू लागला! संदीपा आणि चेतन यांनी यथावकाश आपापली कामं करायचं थांबवलं. मलाही माझ्या नोकरीत काही स्वर्गीय आनंद नव्हता! पगार चांगला मिळतो म्हणून मी इमाने-इतबारे सेवा बजावायला बीकेसीत जायचो. मग मीही नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ लिखाण करावं ह्या विचारानं झपाटून गेलो. काही काम मिळू लागलं, चित्रपट गाणी, जिंगल्स वगैरे.

चेतन-संदीपानं दक्षिण अमेरिका दौ-याचं व्यवस्थित नियोजन केलं होतं. मटाच्या अशोकराव पानवलकरांना भेटून त्यांनी रविवार मटात लेखासाठी जागा मिळवली होती. चेत्यानं मला जेव्हा हे सांगितलं तेव्हा माझे डोळे चमकू लागले! एकतर वृत्तपत्र लिखाण नवीन होतं. पण आत्तापर्यंत जाहिराती आणि कॉर्पोरेट क्षेत्रात भरपूर लिखाण केलं होतं त्यामुळे शब्दमर्यादेत लिखाण कसं बसवायचं ते माहीत होतं. मी हे तुझ्यासाठी लिहू शकतो असं मी त्याला सांगितलं.

आम्ही तातडीनं ठाण्यात माझ्या घरी भेटलो. मला माझ्यासाठी हे लिखाण करायचं होतं. फक्त मी त्यात कुठंच दिसता कामा नये! चेतन आणि संदीपा सगळ्या लेखांत दिसत राहणं गरजेचं होतं. आम्ही घरी बसून ह्यावर थोडया गप्पा मारल्या. त्यांनी मराठी किंवा इंग्लिशमध्ये मला ‘लॉग’ पाठवावा आणि मी त्याचं कथानक मांडावं असं साधारण ठरलं. आम्हाला (मला जरा जास्त!) हे लिखाण ट्रॅव्हल डायरीसारखं करायचं नव्हतं. इथे गेलो, हे पाहिलं ही जंत्री आम्हा तिघांनाही पहिल्यापासून पसंत नव्हती. पहिल्या लेखाचा ‘माल’ तर आधीपासून तयार होता. ह्या दोघांची भारतातली भटकंती आणि तयारी ह्यावरचा लेख. ते ब्राझीलला पोहोचले आणि लेखमाला सुरु झाली.

पहिल्या काही लेखांसाठी मराठीत माहिती आली. त्यानंतर इंग्रजीतच माहिती यायला सुरुवात झाली. कित्येक वेळा त्यांनी पाठवलेलं वाचत मी बसून राहायचो. चेतन उत्तम छायाचित्रकार आहे. अतिशय कलात्मक फोटोज काढतो. त्यांनी पाठवलेल्या फोटोत बुडी मारायचो. लेखाची नस हाती यायची. ज्या ज्या ठिकाणी ते गेले आहेत त्या त्या ठिकाणी मी गुगलवर जाऊन यायचो! मिळेल ती जास्तीची माहिती वाचायचो. ह्याचा योग्य तो परिणाम दिसायला लागला. त्यांनी सांगितलेला अनुभव माझ्या मनाला खरा वाटायला लागला. लिखाण सुरु करताना मी अक्षरशः रिकामा असायचो. बहुधा रात्री तर कधी दिवसभरात कधीतरी लिहायचो. फक्त एखादा शब्द किंवा एकच विचार मनात असायचा. पण लिहायला लागलो की असं वाटायचं मी त्यांच्याबरोबर आहे. हळूहळू त्याची मजा वाटायला लागली. लिहून झालं की मी त्यांना लेख ईमेलवर पाठवून द्यायचो. बहुतेक करून लेखावर एकमत व्हायचं. कधी व्हॉटसअॅप कॉलपण व्हायचे पण ते मुख्यतः ‘बरं चाललंय ना’ विचारायला असायचे! त्यात चेतन आणि संदीपा पूरक माहिती द्यायचे.

ह्या तीस लेखांच्या लेखमालेत मला सगळीच स्थळं आवडली पण काही ठिकाणं, काही शब्द मात्र कायमचे लक्षात राह्यले.

ब्राझीलमध्ये संदीपा चेतनच्या साओपावलोच्या भेटीत ठिकाणांची रेलचेल होती. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या. त्यांनी मला लिहून पाठवलं आणि तो पसारा उघडून रात्री मी बसलो. दोनदा वाचूनही सुरुवात कुठून करायची ते कळत नव्हतं. थोडा अस्वस्थ होऊन नवी माहिती इंटरनेटवर वाचत राहिलो. त्यातूनही काही ‘दुवा’ मिळेना. परत त्यांच्या माहितीवर आलो आणि चाळायला लागलो. अगदी तिसराच लेख आणि मी माती तर खाणार नाही ना अशी धाकधूक वाटत होती. त्यांनी अनेक वर्णनं पाठवली होती. त्यात काही कारण नसताना एकदम त्या वर्णनाशी फटकून एकच वाक्य लिहिलेलं होतं. लीबेर्दार्ज म्हणजे स्वातंत्र्य! ते वाचून पुढे गेलो आणि परत तेवढयाच वेगानं मागे फिरलो! त्यांनी नकळतपणे त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं उद्दिष्टच पोर्तुगीज शब्दात सांगून टाकलं होतं. आम्हाला आमच्या मनाप्रमाणं जगण्याचं स्वातंत्र्य हवं आहे. रूढार्थानं जे जगणं आहे ते आम्ही नाकारलंय. झालं. मला त्या लेखाचा दुवा सहज मिळून गेला. पुढच्या काही तासातच ताजा लेख तयार होता. आधी काही लेखात शब्दमर्यादेचं बंधन ठेवलं नाही पण नंतर आपोआप तिथं येईपर्यंत लेख संपायला लागला.

अर्जेंटिनात असताना पतागोनियाच्या विशाल भूमीतून संदीपा चेतन प्रवास करत होते, त्यांच्याबरोबर मीही मनानं प्रवास करत होतो. आता काय दिसणार ह्याबद्दल त्यांच्याइतकाच उत्सुक होत होतो. लागो अर्जेतीनो तळं पाहून ते पेरितो मोरेनो ग्लेशियर बघायला गेले. हे वाचत असताना मी त्याचे फोटो बघत होतो. निरनिराळ्या निळ्या छटांचा बर्फ कसा दिसत असेल ह्या विचारात असताना एकदम मनात विचार आला! हा बर्फ जेवढा जास्त निळा तेवढा जास्त जुना असतो. म्हणजे काही बर्फ हा मानवी उत्क्रांतीपासून तिथं उभा असावा. जीवसृष्टी जगावी, समृद्ध व्हावी म्हणून पृथ्वीच्या तापमानावर खडा पहारा देत हा शूर शिपाई अनादि काळापासून इथे उभा होता. मी मिटल्या डोळ्यांतून ते हिमखंड पाहतोय आणि कडकड आवाज होतोय! त्यातलाच काही भाग धाडकन खाली कोसळून पडलाय. कदाचित एखादा कडा नव्याला वाट करून द्यायला आपणहून कृष्णार्पण होतोय. डोळे उघडतो तो मी आहे तिथंच आहे. पण मी, चेतन आणि संदीपा, आमच्यावर त्या शिपायाचं ऋण आहे! माझी बोटं मग लॅपटॉपवर पळायला लागली.

अॅमेझॉन नदीचा प्रवास असाच तंद्रीत नेऊन सोडणारा. नदी आणि मानवी आयुष्य ह्याचं फार मोठं आणि प्राचीन नातं आहे. त्यात जगातल्या सर्वात प्राचीन आणि अजस्त्र नद्यांपैकी एका नदीतून, चक्क अॅमेझॉनमधून चेतन संदीपा प्रवास करत होते. माझ्यावर बसल्या बसल्या अॅमेझॉनच्या अरण्याचं गारुड झालं होतं. तो अनुभव आरती प्रभूंच्या ‘नाव आहे चाललेली’ सारखा होता. शेवटी न राहावून मी एका लेखाला ते नाव देऊन टाकलं.

कधी वाटून जातं की आपणही त्यांच्याबरोबर असतो तर काय बहार उडाली असती, मीही कायकाय पाहिलं असतं! नंतर लक्षात येतं माझं राऊंड द वर्ल्ड- व्हाया ठाणे होतं तेच बरोबर झालं. नाहीतर अभय अरुण इनामदार त्यात डोकावला असता. ह्या लेखमालेत मी शब्दांकन केलं, कल्पनारंजन नाही! मनाची कोरी पाटी घेऊन दर आठवडयाचा तो अनुभव धमाल उडवत कसा सादर करता येईल ह्याचा विचार केला.

असं म्हणतात की ता-यांचं जन्मस्थान नेब्युला नावाच्या अपरिमित ढगात असतं. नुसताच इथून तिथं निर्विकार निर्हेतुक भटकणारा वायू! लिखाणाला तयार असलेलं मन मला त्या नेब्युलासारखं वाटत आलंय. ता-याच्या आकारासारखं काही लिखाण दिसतं आणि कागदावर उतरत नाही. ह्या सगळ्या अनिश्चित डळमळीत वातावरणात मागच्या वर्षी उगवलेला हा चिमुकला, तीस लेखांचं बाळसं धरलेला ‘तारा’ मला धीर देतो, म्हणतो, ‘माझ्याकडे बघ, अजून बरंच घडवायचंय’; आणि मला लिहायला धीर येतो. माझं नाव असलेला रूढार्थानं हा पहिला आणि शेवटचा लेख! राऊंड द वर्ल्ड- व्हाया ठाणे!

लवकरच आम्ही येतोय नवीन अनुभव सांगायला, संदीपा चेतन आणि मी पण!
९१५ शब्द
— अभय अरुण इनामदार

Scroll to Top