21 पर्वतांतला पाचू: माचूपिचू – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

जगातल्या प्राचीन, प्रेक्षणीय स्थळांना भेट देणाऱ्या असंख्य पर्यटकांसारखे आम्ही दोघंही. पेरू नावाच्या चिमुकल्या देशात इन्का नावाची एक मोठी संस्कृती नांदली. कुठल्याही सौम्य, लीन आणि सहिष्णू समाजावर आक्रमक समाज हल्ले करून त्याला आपल्या कह्यात करायला बघतोच. स्पॅनिश आले आणि घोड्यांच्या टापांनी बघता बघता इन्काची वैभवशाली परंपरा तुडवली गेली. नवे गडी नवं राज्य आलं. ही सगळी प्रचंड स्थित्यंतरं शांतपणे पाहात अगदी जवळच्याच दुर्गम पर्वतांत त्यावेळचं एक अद्ययावत शहर मात्र आक्रमणकर्त्यांच्या वक्रदृष्टीपासून वाचलं, काळाच्या ओघात झाडावेलींनी झाकलं गेलं आणि योग्य वेळी आपलं सगळं तेज उजळत प्रकट झालं! माचू-पिचू! इन्काचा जिवंत इतिहास, पर्वतातला एक
स्वयंभू पाचू.

महागडा इतिहास

दररोज लाखोंचा व्यवसाय करणारं माचू पिचू (अर्थी म्हातारा डोंगर!) आमच्या खिशाला चांगलीच चाट लावणार असं दिसू लागलं. किंमती यूएस डॉलरमधल्या. कुस्कोतल्या भरमसाट टुरिस्ट कंपन्यातली एकही स्वस्त निघाली नाही! कुस्को ते अॅग्युआस कालिअन्तेस् ह्या दोन तासांच्या रेल्वे प्रवासाचं भाडं पाहून तर आम्ही अक्षरशः थिजून गेलो. उद्या दादर ते सीएसटी भाडं (सेकंड क्लास हंss !) साडेतीनशे केल्यावर जो कोलाहल होईल तसं! अॅग्युआस कालिअन्तेस् हे माचूपिचूच्या पायथ्याचं एक गाव. पर्यटकांना सगळ्या सोयी पुरवणारं.
रेल्वेचा पांढरा हत्ती परवडत नव्हता म्हणून जवळजवळ १० तासांचा गाडीरस्त्याचा प्रवास आम्ही पत्करला. त्यातही शेवटचे दोन तास रेल्वे रुळांच्या बाजूनं चालून जायचं! ‘जेहत्ते काळाचे ठायी’ जे व्हायचं ते होवो म्हणून आम्ही निघालो. प्रत्यक्षात हायड्रोइलेक्ट्रिक ते अॅग्युआस कालिअन्तेस् हे दोन तासांचं चालणं फार मजेत झालं. सगळीकडे हिरव्या रंगाचा शिडकावा. लांबच लांब पसरलेले डोंगर, त्यातून मधूनच डोकावणारी छोटी मोठी हॉटेल्स. इतिहास आम्हाला इतरांच्या मानानं स्वस्तात पडणार असं वाटू लागलं कारण ह्या अनुभवाचं मूल्य फार मोठं होतं. पांडुरंगाच्या दर्शनाला पायी गेलं की त्याचं दर्शन अजून खरं आणि मौल्यवान वाटतं तसं!

अॅग्युआस कालिअन्तेस् जाऊन पोहोचलो. जंगलात झाडं उगवतात त्यात अचानक एखादं गाव उगवावं तसं अॅग्युआस कॅलेंटस समोर येतं. कळतच नाही कधी आलं. आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वगैरे काही नाही. एकदम रूळ ‘संपतात’ आणि गाडी थांबते! आमची पथारीची सोय अत्यंत गचाळ होती. गाईडनं दुसऱ्या दिवशीच्या सूचना दिल्या आणि ‘उदया पहाटे चार वाजता भेटू यात’ म्हणून निघून गेला. वर माचूपिचूला घेऊन जाणाऱ्या बसचं तिकीटही भीषण महाग होतं, पण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. मग आम्ही एका वेळच्या बसची व्यवस्था केली. खाणंपिणं सुद्धा वर खूप महाग असतं म्हणून कोरडया खाऊची आणि पाण्याचीही सोय लावली आणि गुपचूप झोपी गेलो.

उंच उंच अनुभव

पहाटे चारला आपण बाहेर पडल्यावर वाटतं व्वा काय लवकर बाहेर पडलोय आणि बसस्टँडवरची भलीमोठी रांग पाहून वाटतं अरे थोडा उशीरच झाला. ह्याचं कारणही तसंच होतं. दक्षिण अमेरिका खंडातल्या सर्वात महत्वाच्या, वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या ऐतिहासिक स्मारकाला आम्ही भेट दयायला चाललो होतो. यथावकाश बसवाऱ्या सुरु झाल्या. नागमोडी हिरव्यागार वळणावळणाच्या रस्त्यानं माचूपिचूच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो. इतक्या भव्य स्मारकाला भेट द्यायच्या आधी त्याचे असंख्य फोटो पाहिले गेलेले असतात, अनुभव वाचलेले असतात. आपणही मनातल्या मनात अनेकदा तिथं जाऊन आलेले असतो. त्यामुळे प्रथमदर्शनी त्या स्थळाचं दर्शन एकदम कमी दर्जाचं किंवा जास्त गाजावाजा केलेलं वाटू शकतं. इथे आपल्याला आवडलेली गोष्ट इतरांपेक्षा निराळीच होती आणि अगदी साधी होती हेही शक्य असतं. तरीही इथं उभं राहिलं की दिव्यत्वाची आणि आश्चर्याची एक अदृश्य भावना अलगद तुम्हाला लपेटून घेते. ती भावना काय आहे कशी आली ह्याचा शोध घेतच मग तुम्ही दिवसभर हिंडत राहाता.

माचूपिचूच्या अवशेषांवर सकाळचं कोवळं उन्ह बरसत होतं आणि आम्ही ह्याच भावनेच्या भरात पावलं उचलत होतो. १९०० सालच्या सुरुवातीला अमेरिकच्या येल विद्यापीठातून हिरम ब्रिंगम नावाचा प्राध्यापक ह्या प्रदेशात संशोधनासाठी आला आणि योगायोगानं ह्या इतक्या मोठया हरवलेल्या इन्का शहराचा शोधकर्ता झाला. राज्यकारभार, शेतकी आणि निवासी असे ह्या शहराचे तीन मोठे भाग पडले आहेत. ब्रह्माविष्णूमहेश सारख्या त्रिमूर्तीची तसेच सूर्याची पूजा आणि आराधना आपल्यासारखीच. आम्ही हिंडत होतो. पर्वतांमुळे खोगीरासारख्या खोलगट झालेल्या भागात हे प्राचीन शहर वसलेलं होतं. म्हणूनच ते स्पेनच्या आक्रमक राज्यकर्त्यांपासून सहज लपून राहिलं. एका बाजूच्या दऱ्या सखोल अॅमेझॉन खोऱ्यात जाणाऱ्या तर एका बाजूच्या दऱ्या थेट अँडीज पर्वताला भिडणाऱ्या! आपल्या महाराष्ट्राला हे नैसर्गिक भक्कम संरक्षण नवीन नाही. प्रतापगड, राजगडासारखे बेलाग किल्ले त्याचीच साक्ष देतात.
हे शहर ज्या पर्वताच्या कुशीत वसलं आहे त्याच्यावर चढून वरून हा ‘नजारा’ कसा दिसतो हे पाहायचं ठरवलं. आम्ही चढण चढू लागलो. त्या चढणीनं आमचा चांगलाच दम काढला. ह्या इतक्या उंचावर अजून एक वेगळाच किस्सा झाला. सगळेजण हाशहुश्श करत वर चढत होते. खाली येणाऱ्यांना अजून किती राहिलं विचारत होते. सगळेजण, ‘झालं! थोडं राहिलंय, वरून मस्त दिसतं सगळं!’ असं म्हणत धीर देत होते. त्या तसल्या ठिकाणी आम्ही शेजारून चाललेल्या एका माणसाशी बोलू लागलो आणि चाटच पडलो. त्या इराणी माणसाची मुळं भारतात रुजलेली होती! त्याच्या आजोबांचं मुंबईत चक्क इराणी कॅफे होतं. आता कॅनडात असलेला हा माणूस काही महिने भारतात येऊन गेला होता. आमच्या आणि त्याच्या ब्रिटानिया, के रुस्तम अशा मुंबईतल्या आवडीच्या खाद्यठिकाणांची कुंडली जुळली आणि गप्पांमुळे ती चढण सोपी वाटायला लागली. त्याची बायको इराणमध्ये वाढली होती पण पुण्यात शिक्षणासाठी जावं अशी फँटसी तिच्या मनात होती! ते भरभरून आमच्याशी बोलत होते.

बघता बघता शिखरावर येऊन पोहोचलो आणि चारही दिशांनी अप्राप्य, अखंड असं माचूपिचू शहर पाहून एक घायाळ श्वास सोडला. कसं जमलं त्या लोकांना हे. कुठली अज्ञात शक्ती होती त्यांच्यात. इतक्या अनाघ्रात जंगलात स्वयंपूर्ण वसाहत निर्माण करून इन्का संस्कृतीच्या या पाईकांनी स्वतःची पदचिन्हं कायमची काळाच्या छातीवर गोंदवून ठेवली. आम्ही आपले अवशेषातून तिच्याकडे बघायचा प्रयत्न करत होतो…

इतिहासाची खिडकी

खाली उतरून सूर्यद्वारापाशी आलो. तिथून थोडया अंतरावर इन्का ब्रिज नावाचा छोटासा पूल आहे. वाट चिंचोळी होत तिथं जाते. एका क्षणी फक्त दोन पाय मावतील इतक्या लहान जागेतून अक्षरशः कडयामध्ये कोरलेला हा पूल पुढं सरकत एका प्रच्छन्न ठिकाणी अरण्यातून नाहीसा होतो. हा पूल ओलांडून हे ‘पूर्वज’ आक्रमण टाळायला इथून कायमचे निघून गेले असतील! आमच्या समोर इतिहासाची एक खिडकी उघडली होती, आम्ही त्यातून डोकावून पाहात होतो! आपण रायगडाच्या अवशेषातून महाराजांचा सगळा राज्याभिषेक मनातल्या मनात बांधून काढतो तसं!

परतत असताना आम्हाला वाटलं की त्या इराणी माणसासाठीही आम्ही म्हणजे एक इतिहासाची चालती बोलती आधुनिक खिडकी होतो! त्यानं आमच्यातून डोकावून पाहात त्याच्या आजोबांचं मुंबईतलं इराणी कॅफे आपल्या मनात बांधून काढलं होतं. माचूपिचू पाहून आलेली ती अदृश्य भावना अचानक अशी मूर्त स्वरूपात त्या पुलाच्या आणि माणसाच्या रुपानं उभी राहिली… परतीचं उत्तर सापडून गेलं!

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW Series.

Scroll to Top