41 छोटंसं मोटुएका – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

अॅबेल टॅस्मन नॅशनल पार्कला जाताना ‘मोटुएका’ शहरात थांबलो होतो. आता परत येताना तिथंच मुक्काम करायचं ठरलं. शक्यतो हे थांबायचं ठिकाण नाही. सगळेजण नेल्सन नावाच्या मोठया शहरात परत जातात. कायतेरीतेरीच्या बस थांब्यापाशी गेल्यावर असं लक्षात आलं की मोटुएका मधूनही आपल्याला गोल्डन बे ह्या भागात जायला बस मिळेल. तिथल्या बुकिंग क्लार्कला आम्ही मोटुएका शहराची तिकिटं द्यायला सांगितली. त्यानं आम्हाला माहिती दिली की हे तिकीट नेल्सनपेक्षा तुम्हाला फक्त सव्वासात डॉलर स्वस्त पडेल. त्याचा सांगायचा हेतू हा की प्रवाशांना मोठया शहरात करायला अनेक गोष्टी असतात. आम्ही आपले हसून त्याच्याकडे पाहिलं. आता त्याला कशाला सांगा की आमचे नुसते सव्वासात डॉलर नाहीत तर सव्वासात गुणिले पंचेचाळीस रुपये वाचणार आहेत! मोटुएकात पोहोचलो तेव्हा दुपार उलटून गेली होती. सुंदराचे सोहळे पाहायच्या नादात खायचं राहून गेलं होतं. बोटीत बसल्यावर सुद्धा काही बघायचं राहायला नको म्हणून आम्ही तसेच कुळकुळत राहिलो! इथल्या हॉस्टेलमध्ये आल्यावर भुकेची चरचरीत आठवण झाली. आमच्याकडे ब्रेड, ड्रेस्ड चिकन, कोल्डकट्स होते. जेवल्यावर निवांत झालो. आता एकदम दुसऱ्या दिवशी दुपारी आम्हाला गोल्डन बे ला घेऊन जाणारी बस येणार होती.

इथल्या रिसेप्शनच्या माणसानं आम्हाला जागा दाखवताना कॉमन रूम, स्वयंपाकघर झाल्यावर मागे नेऊन ‘इथं कपडे वाळत घाला’ म्हणून चक्क दोऱ्या दाखवल्या. एरवी ह्या कामासाठी मशीन्स आणि ड्रायर्स वापरणाऱ्या विकसित न्यूझीलंड मध्ये दोरीवर कपडे वाळत घालायच्या कल्पनेनं आम्ही चांगलेच चकित झालो! इथं एक भला मोठा फ्रीज असतो. आपलं खाण्याचं सामान एका पिशवीत भरून त्यात ठेवता येतं. आपलं नाव फक्त त्यावर लिहून ठेवायचं. त्या कॉमन फ्रीजमध्ये आम्ही मोठया मोठया प्लॅस्टिकच्या पिशव्या बघितल्या. पास्ताची, पिठांची पाकिटं, अंडी असं काय काय. तुम्ही प्रवास करत असताना अशा वस्तू ठेवत नाही. आमची उत्सुकता वाढली. एज्वत असताना आम्हाला तिथं जॉन नावाचा चायनीज माणूस भेटला. त्याच्या पिशवीतून काहीबाही काढून तो स्वयंपाक करायला लागला. आम्ही संधी साधून त्याला त्या मोठया पिशव्यांबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘ह्या पिशव्या ‘WOOF’ing करणाऱ्या मुलांच्या आहेत.’ आमची टयूब लगेच पेटली! WOOF म्हणजे वर्ल्डवाईड ऑर्गनायझेशन फॉर ऑरगॅनिक फार्मिंग! फार सुरेख कल्पना. छोटीशी रक्कम भरून ‘वूफ’चे सदस्य व्हा. हयात निरनिराळ्या देशातले शेतकरीही नाव दाखल करतात. ज्या देशात शेतकरी सेंद्रीय पद्धतीनं शेती करतात त्यांच्या शेतावर काम करायला जा. तिथली शेती कशी करतात ते शिकून काम करा. त्या बदल्यात तुम्हाला शेतकरी अन्न, निवारा आणि काही मोबदला देतील! न्यूझीलंडमध्ये वाईनरीज, फळबागा, चीज बनवणारे शेतकरी असे सगळे ह्या ‘वूफ’चे सदस्य आहेत. इथले शेतकरी साधारण पंधरा दिवस तरी काम करा म्हणून आग्रह करतात. तेवढा वेळ तुम्हाला शिकायला लागतोच. आम्हीपण अर्ज केला होता. हे करण्यासाठी तुम्हाला वर्किंग हॉलिडे व्हिसा लागतो. पण भारत आणि न्यूझीलंड देशात अशी काही सोय नाही म्हणून आमची निराशा झाली होती. ह्या हॉस्टेलमधली सगळी हायस्कूल पास किंवा पदवीधर मुलं अशीच इथं काम करून राहात होती. प्रवास करा, काही दिवस शेती करा, पैसे साठले की परत प्रवास करा! किती मजेदार कल्पना. आम्हाला त्यांचा फार हेवा वाटला. त्याच वेळी हळहळ पण वाटली! चीनकडे पण अशी वर्किंग हॉलिडे व्हिसा व्यवस्था आहे आपल्याला मात्र नाही. ती रात्र अॅबेल टॅस्मन नॅशनल पार्कच्या आठवणीत सरली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मोटुएकात चक्कर मारायला बाहेर पडलो. स्वच्छ उन्हाळ दिवस होता. म्हणजे जसा असायला हवा तसा! गोल्डन बे ह्या भागातल्या तकाका ह्या शहरात हॉस्टेलमध्ये आम्ही राहणार होतो. दोन बेड बुक करायला म्हणून तिथं फोन केला. एका माणसानं फोन उचलला, ‘गुड मॉर्निंग देअर, इट इज सच अ लव्हली डे इजंट इट!’ आम्हाला तर पहिल्यांदा वाटलं की रेकॉर्डेड मेसेज वाजतोय की काय? आम्हाला वाटलं की आता, रिझर्व्हेशनसाठी एक दाबा’ म्हणणार! पण एक खराखुरा माणूस फुरसतीत आमच्याशी बोलत होता, ‘माझं नाव अॅलन, बोला काय सेवा करू? अशा आशयाचं बोलून मगच तो थांबला. आम्हाला संध्याकाळपासून जागा हवीये असं त्याला सांगितलं. आम्ही भारतातून आलोय म्हणल्यावर अजूनच प्रेमानं तो आमच्याशी बोलायला लागला. त्याची मोठी मुलगी दक्षिण भारतात कुठेशी होती. ‘या, आम्ही वाट बघतोय’ म्हणून त्यानं फोन ठेवला. इतक्या पारदर्शक माणसाशी बोलल्यावर तिथलं सगळं वातावरण अजूनच नितळ वाटायला लागलं. ह्याहून नितळ आणि पारदर्शक असं काहीतरी पाहायला आम्ही तिथं जाणार होतो!

मोटुएकामध्ये हिंडायला लागलो. फिरण्यासाठी आखलेल्या आकर्षक हिरव्या वाटा हे तर सगळ्या न्यूझीलंडचं वैशिष्टय. थॉर्प बुश नावाच्या वाटेवरून निवांत चालायला लागलो. समोर नजर गेली तर थोडया दूरवर मेंढरांची कुरणं होती. त्या बाजूला घरं. म्हणजे शहराच्या शेजारी निवांत पडलेलं खेडं. घरातून निघा. थोडया वेळातच मेंढरं हाकून कुरणात चरायला सोडा. ते झाल्यावर अद्ययावत कॅफेत कॉफी पिऊन तिथंच असलेल्या क्लबमध्ये क्रिकेट, रग्बी नाहीतर बास्केटबॉल खेळा. मग उगाच परत शेतात चक्कर मारून मेंढरांवर पण लक्ष द्या. न्यूझीलंडच्या ह्या अनोख्या पैलूचा पुन्हा प्रत्यय आला. आम्हाला वाटलं होतं ऑकलंड आणि वेलिंग्टन सोडल्यावर आम्हाला शहरी आयुष्य दिसणारच नाही. पण इथं उलटं आहे मोठया शहरांसकट इथलं जगणं ग्रामीण आहे! हे एक आधुनिक आदर्श जगणं वाटलं आम्हाला. शेती आणि गुरेपालन हा मुख्य व्ययसाय असल्यानं निसर्गाच्या जवळ राहाणीमान. स्वतःच्याच शेतात उगवलेल्या भाज्या आणि फळं, शहरापासून दहा मिनिटांवर जंगल, समुद्र किंवा नदी तेसुद्धा स्वच्छ आणि काचेसारखी हवा. ह्याचवेळी शिक्षण आणि आरोग्यासह सर्व अद्ययावत शहरी सुविधा आणि साधनं! भारतातही हे होऊ शकतं फक्त इथल्या तुरळक लोकसंख्येमुळे ते अजून स्पष्ट दिसून येतं. ह्यात परत आमच्यासारख्यांना चालायला एक सुंदर वाटपण काढून दिलेली असते!

त्या वाटेवरून चालत रस्त्यावर आलो. बाजूनं खेळणारी मुलं आणि पक्षी बघत हिंडलो. तिथून समुद्र किनाऱ्यावर गेलो. विकेंड असल्यानं गर्दी बऱ्यापैकी होती. पोरं खेळत होती आणि पोरांचे आईबाप काहीतरी खात नाहीतर गप्पा मारत बसले होते. तिथून निघून बाजारात जरा गेलो. तिथं एका ठिकाणी लहान मुलांसाठी लॅपिडरी वर्कशॉप अशी पाटी होती.आम्हाला कळलं नाही म्हणून आत डोकावलो तर दगडावरचं कोरीवकाम शिकवणं चाललं होतं.
आमची निघायची वेळ झाली. बरं झालं आम्ही इथं थांबलो. काहीही न करण्यातही एक गंमत असते. जिथून आलो त्याच्या आठवणी काढत हे प्रवासी जगणं थोडंसं आपलं आपणच निरखून नको का बघायला? त्यासाठी असा वेळ मिळतो. तो असा वापरला जातो. ही अशी इथून समोरच्या दुपारच्या वेळी मग रस्त्यावरून बस येते. ती आम्हाला गोल्डन बे ह्या भागातल्या तकाका ह्या शहराला घेऊन चाललेली असते. आम्ही बसमध्ये बसल्यावर बस सुटते. छोटं मोटुएका छोटे छोटे आनंद देऊन मागे मागे जाणाऱ्या रस्त्यावरून दिसेनासं होतं. आमचं जगणं, आमचा प्रवास चालू राहातो.

vachak.vishesh@gmail.com / rtw@sandeepachetan.com
छायाचित्र : संदीपा आणि चेतन शब्दांकन : अभय अरुण इनामदार
Photos: https://photos.sandeepachetan.com/Article41/

Scroll to Top