16 सुट्टीचे शुभ्र ‘सुक्रे’! – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

सकाळी झोप संपवून पलंगावर उठून बसलो. उन्हाचे मऊलूस कवडसे बघण्यात किती वेळ गेला कळलंच नाही. आम्हाला रात्री आश्रय देणारा माईक (हा जर्मनीचा.) खोलीत आला तेव्हा आळसावून उठलो आणि टेरेसपाशी जाऊन उभे राहिलो. ते तुलनेनं उबदार शहर जागं होत होतं. इतक्या ठिकाणी कुडकुडत इथं आल्यावर ही एवढी उबही खूप वाटत होती. उन्हात न्हायलेल्या सुक्रेचं पहिलं दर्शन फार आश्वासक होतं. आदल्या रात्रीचा सगळा थकवा आणि वैताग त्यात वितळून गेला. सतत काही तरी करत राहण्याच्या आमच्या स्वभावानं अचानक एक पलटी मारली. म्हणलं फार थकलोय आम्ही! जरा विश्रांती हवी की नको? सुक्रेतच सुखानं शांतपणे काही दिवस घालवू यात.

तांबडा पांढरा

मग आमची ‘सुट्टी’ सुरु झाली! पण ‘त्या’ तांबडया पांढऱ्याचा ह्या सुट्टीत काही निराळाच संदर्भ लागला! मुख्य सुक्रे शहर अथ पासून इति पर्यंत पांढरं आणि तांबडं आहे. म्हणजे तुमच्या घराच्या आतल्या भिंती आकाश-कंदिला सारख्या का असेनात, बाहेरच्या भिंती गोऱ्यापानच हव्यात. वधूच्या अपेक्षा लिहिताना जितकी ‘गोरीपान हवी’ तितक्याच ह्या भिंतीही स्वच्छ पांढऱ्या! आणि छप्पर लालीलाल कौलारू! तसा नियमच आहे सुक्रेचा. ह्याचं कारण नंतर लक्षात आलं.

सुक्रेची स्थापना होतानाचं नाव होतं ‘चांदीचं शहर’. इथे आसपासच्या शहरांमध्ये चांदीच्या खाणींचा व्यवसाय तेजीत सुरु झाला होता, पण सगळी शहरं समुद्रसपाटीपासून किमान ४००० मीटर उंचीवर होती. त्या तुलनेत २८१० मीटरवर असलेलं थोडं उबदार सुक्रे स्पॅनिश राजेशाहीला आणि उच्चभ्रू सरंजामदारांना फार भावलं. भव्य राजवाडे, प्रचंड वाडे आणि प्रशस्त बंगले सुक्रेत सजू लागले, त्याची शोभा वाढवू लागले. आणि वसाहतवादाच्या वेळची ती घरं म्हणजे ‘काय सांगू महाराजा’ अशी होती! ती तशीच राहिली, रंगसंगती पिढयानपिढया जोपासली गेली. आता तर शहराचा मुख्य भाग ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणून जाहीर झाला. म्हणजे आता ह्या ठिकाणी कुठलाही बदल करता येणार नाही; डागडुजी पण मूळ सौंदर्याला बाधा येणार नाही अशी! सगळं राजेशाही थाटात. (अजूनही सुक्रे ही बोलिव्हियाची घटनात्मक (constitutional) राजधानी आहे.) आम्ही राहात होतो ते हॉस्टेल अशाच एका घरांपैकी होतं. हे शहर एका टेकडीवर वसलेलं आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडलं की वर खाली होत सगळ्या दिशेनं गेलेल्या गल्ल्या आणि रस्ते लागतात. टेकडीच्या माथ्यावर एक ‘मिराडोर’ (टेहेळणी मनोरा) पण आहे. तिथं आम्ही रोज जायला लागलो. पांढऱ्या लाल घरांवर मावळणारा सुंदर सूर्य. वेगानं पसरणाऱ्या अंधारात नागमोडी रस्त्यांवरचे चमचमते दिवे, वाढत जाणारी थंडी. थोडया वेळानं मग उबेसाठी घराकडे परत. असे दिवस सुखाचे!

शहरातल्या शहरात

हे शहर जरा आम्हाला आवडलंच. आम्ही निवांत झालो. सकाळी उन्हं आली की उठावं. तिथल्या आरशासारख्या स्वच्छ स्वयंपाकघरात दोन कप चहाचे उकळावेत आणि शांतपणे टेरेसमध्ये येऊन सकाळचं ऊन खात बसून राहावं. अशाच एका सकाळी एक कल्पना सुचली. आमचं स्पॅनिश भाषेचं गाढ अज्ञान आम्हाला आतापर्यंत गोत्यात आणत होतं. स्पॅनिश भाषा इंग्लिशमध्ये शिकवणाऱ्या मास्तरांनी सुक्रे शहर गच्च भरलेलं आहे. गल्लोगल्ली ‘फाडफाड स्पॅनिश शिका’च्या पाटया आहेत. आम्हाला काही भाषेचे दिवे उजळायचे नव्हते! त्यामुळं अगदी फाडफाड नाही तरी गेला बाजार ‘जुगाड’ करत आमचं काम भागेल इतपत भाषा शिकावी असं मनानं घेतलं. आमच्यात संदीपानं भाषा शिकावी आणि चेतननं त्या वेळात फोटो, वेबसाईट (sandeepachetan.com) आणि व्हिडीओचं काम करावं अशी वाटणी झाली. उरलेल्या वेळात बाजारात जाऊन जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी जिन्नस आणावेत, हॉस्टेलच्या इतर दोस्तांशी गप्पागोष्टी आणि मस्करी करावी, माईक आणि राकेशशी (इथला अजून एक व्यवस्थापक; भारतीय वंशाचा) हितगुज, नवीन जागांची माहिती घ्यावी असा दिनक्रम चालू राहिला. अधूनमधून इथल्या सुबक चर्चेसना भेटी देऊन आलो.

राकेश कधी बार्बेक्यू किंवा भारतीय मसाले वापरून चिकन करी करायचा. अशाच एका मेजवानीत कळलं की इथं ‘सियेते कास्कादास’, सात धबधब्यांचं एक ‘स्थळ’ आहे! काही दिवसात ट्रेक म्हणून कुठं गेलोच नव्हतो. म्हणून निघालो. ‘आसं गावाच्या आंगानं गल्ली पकडून चालत राह्यला की पोचताय बघा!’ इतकी साधी दिशा! त्याप्रमाणे चालत राहिलो आणि खरंच पोहोचलो. पण जाईपर्यंत धाकधूक होती! नेमके पोहोचू ना ह्याची! तिथं पाणी काही जास्त नव्हतं. पाच धबधबे तर रुसून वाहायचे बंद झाले होते! आणि उरलेले दोन ‘वाहू की नको’ असे आमच्यासारख्या भटक्यांसाठी नाईलाजानं वाहात होते! शहरात काही दिवस काढल्यानंतर अशा छोटया भटकंतीला मात्र खूप मजा आली.

शहरी ‘रुटीन’मध्ये चांगलेच रंगून गेलो. शहराचे होऊ लागलो. मर्कादो म्युनिसिपाल ह्या भव्य बाजारात रोज भाजीपाला, फळं, मांस, किराणा, दूध अशा गोष्टींसाठी जाणं होऊ लागलं. फिरून फिरून कंटाळा आला की तिथंच वरच्या मजल्यावर जायचं आणि भरगच्च बाऊल भरून रसाळ फ्रुट सॅलड खायचं! किंवा अनेक प्रकारचे,चवींचे आणि आकाराचे केक्स! ते जर नको असेल तर खाण्याचे इतर भरपूर पर्याय होते. आणि किंमती पण बऱ्या. भारतात आपण देतो तशा! आमच्या भारतीय मनाला थंडावा देणाऱ्या. (तसं बोलिव्हियाचं चलन आपल्या रुपयाच्या तुलनेत तगडं आहे!)

कधी आमच्यापैकी कुणी एकटंच बाजारात गेलं की नेहेमीच्या ‘गाळे’वाल्याकडून प्रश्न यायला लागला, ‘अमिगा?’… ‘तुझा मित्र..तुझी मैत्रीण नाही आली?’ (बायकोला कुणी मैत्रीण समजण्याचे प्रसंग तसे विरळाच!) किंवा सुट्टे पैसे नसले की ‘उदया’चा वायदा चालू लागला. आम्ही त्या शहराचे होत चाललो. तिथले रस्ते, गल्ल्या, बाजार आणि त्यातली बोलिव्हियन प्रजा आम्हाला आपलं म्हणू लागली.

शाहरुखचं ताराबुको

सुक्रेपासून साधारण दोन तासांवर असलेल्या ताराबुको नावाच्या छोटया गावातून आम्ही फिरतोय. बोलिव्हियातले मूळ रहिवासी असलेलं हे एक गाव. काळाच्या ओघात स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवणारं. यांपारा नावाची संस्कृती जपणारं आणि स्पॅनिशऐवजी क्वेचुआ ही स्थानिक भाषा बोलणारं. त्यांना म्हणे फोटो काढून घ्यायला आवडत नाहीत. फोटो काढल्यास त्यांच्या चैतन्याचा काही भाग कमी होतो असं ते मानतात. त्यामुळं फोटो काढणं जरा मुश्कील होत होतं. फिरत फिरत आम्ही एका न्हाव्याच्या दुकानापुढून निघालो आणि थबकलो. पुन्हा मागं वळलो. त्या दुकानाच्या एका भिंतीवर चक्क शाहरुख खानचा फोटो मोठया दिमाखात झळकत होता! आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. बोलिव्हियातल्या एका छोटया गावात, चिंचोळ्या गल्लीत, क्वेचुआ ही अगम्य भाषा बोलणाऱ्या माणसाच्या दुकानात शाहरुख खानचा फोटो हे फारच होतं! लगेच आम्ही ‘हा तर आमचा माणूस’ म्हणून त्या ‘सलून’वाल्याशी सलगी केली. तो एकदम तरुण पोरगा होता. आम्ही त्याला विचारलं, “ आम्ही तुझे आणि ह्या दुकानातल्या फोटोचे फोटो काढू का?” तर त्यानं चक्क “तुम पेह्चानो?’ असा आपल्याच राष्ट्रभाषेत सवाल केला! आम्ही तीनताड उडालो! लगेच आमचं उत्तर, ‘हाँ, हम पेह्चानो!’ फोटो काढायला सुरुवात! आम्ही भारतातले असूनही शाहरुख खानची आणि आमची ओळख नाही हे समजल्यावर त्याला भीषण दु:ख झालं. आम्हीही मग त्याला दुःखात सोडून निघालो. क्वेचुआ मध्ये ‘मै आ रहा हूँ सिमरन’ कसं म्हणत असतील हा प्रश्न तसाच राहिला!

तू चाल पुढं..

नाही म्हणलं तरी सुक्रेत रमून दोन आठवडे होऊन गेले. भरपूर विश्रांती घेऊन झाली होती. स्पॅनिशचं कामचलाऊ ज्ञान आमच्याकडे होतं. उरलेला प्रवास शिल्लक होता. सुट्टी संपली! माईक आणि राकेश म्हणत होते, “ओह्ह! कमॉन, स्टे लॉंगर!” आणि आम्हाला राहून राहून उन्हाळ्याची सुट्टीच आठवायला लागली. उन्हाळ्याची सुट्टी संपत आली की कसं जीवावर येतं. आजोळचं कौतुक ओसंडत वाहात असतं. मामाचे लाड आणि मामीचं प्रेम ह्यात आपण अगदी गुदमरून जाऊ इतके बुडालेले असतो. मामे-मावस भावंडं, भांडणं, खेळणं, फिरणं असं सगळं असोशीनं भोगत चवीनं सुट्टीचा एकेक दिवस पुढं जात असतो. दिवस कमी होतात आणि आता निघायची वेळ झाली हे लक्षात येतं. आवराआवरी होते. इतके दिवस आनंदात खिदळणारी तोंडं बारीक होतात. आपलं गुपित असलेली एखादी बहीण येऊन सरत्या दुपारी कळवळून म्हणते, “ए राहा की रे आणखी!” आपल्याकडे उत्तर नसतं. समोर बॅग भरून तयार असते, आता फक्त निरोप घ्यायचा असतो. बहीण मूकपणे तिथंच आपला निरोप घेते!

पुढं चालायलाच लागतं, ‘पुन्हा येऊ’ म्हणत निघावं लागतं. त्या शांत, शुभ्र शहरानं आम्हाला असाच मूक निरोप दिला!

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW Series.

Scroll to Top