मस्त मिरमिरती थंडी असावी. जशी अँन्डीजच्या पायथ्याला असते तशी. आम्ही अगदी इव्हिनिंग गाऊन आणि टक्सेडो परिधान करून नसलो तरी बऱ्यापैकी ठेवणीतले कपडे असावेत. वाईनच्या लालसर पावलांनी संध्याकाळ हळूहळू पावलं टाकत यावी. पसरत जाणारी रात्र रोमँटिक होत जावी. अंधार उजळायला जेमतेम तीन मेणबत्त्या. आमच्या टेबलावर ठेवलेल्या. जगातल्या सर्वोत्कृष्ट स्टेक डिनरची प्लेट समोर घमघमत यावी. पहिल्या घासाआधी एकमेकांच्या हातात हात घालून वाईनचा एक ‘डिव्हाईन’ घोट घेत आम्ही हसावं. संध्याकाळ त्या रोमँटिक क्षणात सहज विरघळून जावी.
मांडोझाचा माहौल
आमच्या मांडोझा मुक्कामाची सुरुवात साधारण अशा वळणानं व्हायला हवी होती! तो भागच तसा होता. योजना पण तयार होती आमची. माल्बेक द्राक्षांच्या मळ्यांतून दूरवर सायकल भटकंती किंवा गाडीनं निवांत लॉंग ड्राईव्ह. सकाळ संध्याकाळ अर्जेन्टिनाच्या ह्या रोमँटिक वाईन-राजधानीतलं वाईनाराधन. जिभेच्या प्रत्येक अग्राला नवं आव्हान देत येणारं ते ‘ड्रिंक’! मनात बेत आखत थकून हॉस्टेलवर येऊन पडलो. पुढच्या तयारीला लागलो.
एका दळभद्री क्षणाला आमचं बँक स्टेटमेंट बघायची बुद्धी आम्हाला झाली आणि सगळा माहौलच बदलला! कल्पना होतीच की पातागोनियात इतका खोलवरचा प्रवास आमच्या आर्थिक फळीला मोठी चाट लावणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही कागदावर फिरणारे ते आकडे बघत नाही तोपर्यंत त्या खर्चाची खरी कल्पना येत नाही. त्या आकडयांनी आमचा जीव काढला. इतका सलग प्रवास, दिवसरात्र झपाटल्यासारखी आश्चर्य-दृश्यांची न संपणारी तरीही हवीहवीशी मालिका. मन आणि बुद्धीला विसावा न देणारे अनुभव. आम्ही थकलो होतो बहुधा! म्हणूनच इतक्या दिवसांचं मित्र-मैत्रीणीसारखं ‘वर्तन’ सोडून कुठलेही सामान्य किंवा असामान्य नवरा बायको वागतात तसे आम्हीपण वागलो. भां-ड-लो! अगदी जोरदार भांडलो! मेंडोझा ह्या अर्जेन्टिनाच्या सगळ्यात रोमँटिक शहरानं एका ‘तडकेदार’ मराठी जोडप्याचं ‘रोष’न जोश (रोगन जोशच्या धर्तीवर) दणकेबाज भांडण ऐकलं. हा एकमेकांवरचा रोष फक्त त्या परिस्थितीचा एकत्रित परिणाम होता. एका क्षणी तर ‘जाऊ ते सगळं ते, जाऊ आता परत’ ह्या विचारापर्यंत येऊन परत गेलो!
म्हणूनच कुठलंही सर्वसाधारण समजूतदार जोडपं करतं तसं आम्हीही केलं. थोडया वेळापुरते ‘संसारात’ गुंतलो. वाईनपेक्षा वाईफ महत्वाची; आणि मेंडोझा शहराची मिंड सापडवत जाण्याऐवजी ‘हसबंड’ची साथ गरजेची! हॉस्टेलमध्ये मग किराणा येऊन पडला, बरेच दिवस न चाखलेले पदार्थ शिजू लागले. sandeepachetan.com परत घासून पुसून काढली! गप्पा मारल्या. एका शहाण्या जोडप्याला तळ्यावर (चुकलो ‘ताळ्यावर’! बघा, अजून जात नाही तळं) यायला अजून काय लागतं? विश्रांती, क्षुधाशांती आणि सहवासातून मन:शांती. वाईनटूर रद्द! प्रवास बंद. सगळा रोमान्स घरीच. ही अशी प्रवासाला तीट लावून गेलो तर दृष्ट लागणार नाही आणि आपण न पाहिलेलं हे मेंडोझा नावाचं ‘पोर’ कसं दिसतंय हे पहायला अर्जेटिनात परत येणं होईल. हॉस्टेलमध्ये वाईन मोफत होती त्यामुळे ती हुरहूर लागली नाही.
त्यातल्या त्यात चैन म्हणजे शहरापासून जवळच असलेल्या काचुता ह्या उष्ण झऱ्यांना भेट. मेंडोझा नदीतली ही नैसर्गिक उष्ण पाण्याची कुंडं. तासन्-तास त्या गरम पाण्याच्या उबेनं आमची अवस्था ‘उष्ण झरे रोष हरे’ अशी झाली. पुढच्या प्रवासासाठी आम्ही एकदम ‘तय्यार’ झालो.
रंग माझा वेगळा
अँडीजला डावीकडे ठेऊन पुढे उत्तरेकडे सरकत होतो. रस्त्याच्या बाजूनं सगळं चित्र बदलत चाललं होतं. रख्ख कोरडे डोंगर आणि कोरडी माती. आमची अर्जेन्टिनाची (जवळजवळ) कडेकडेनं चाललेली प्रदक्षिणा संपत आली होती. इंग्लिश बोलणारी, समजणारी माणसं उत्तरेकडे सरकू तशी कमी होत गेली. सालता शहराच्या मुक्कामापासून तर हे प्रकर्षानं जाणवू लागलं. लोकांच्या चेहऱ्यांची ठेवण बदलली, पोशाख बदलले. आम्हीही केवढे बदललो! एकमेकांना जगाच्या संदर्भात ओळखायचा हा केवढा मोठा धडा घेत होतो. इथे आम्हाला दुसरं कोणीच नव्हतं एकमेकांशिवाय. किती सुखात हिंडत होतो एका अनोळखी देशात. कसलाही ताप नाही. पैसे कमी झाले तरी संपले नाहीत ना? काची नावाच्या एका छोटया गावातून तर मुलं साध्या शाळेत जायला काही तास प्रवास करतात. रोजचा झगडा एवढा मोठा. त्यामानानं आमचा झगडा थिटा वाटू लागला. त्यातूनच भौगोलिक परिसरातलं एक साम्यही जाणवून गेलं. हिमालयाच्या पायथ्याशी फिरताना आम्ही तिथल्या मुलांना विचारलं होतं. ती मुलंही ह्या अँडीजच्या मुलांसारखी अनेक तास कापून शाळा शिकतात. आणि खुरटलेल्या झुडपांत ताठ मानेनं उभी असलेली कॅक्टसची ती शूर झाडं. त्या वैराण पण आकर्षक भूमीत तग धरून असलेली! आमचा उत्साह वाढला. हे सगळे रंग आम्हाला नकळत प्रोत्साहन देत होते.
खरी गंमत होती हुहुई राज्यातल्या पुर्मामार्का ह्या छोटया गावात. प्रत्येक देशाची एक विशिष्ट खासियत असते. ती देशात सर्वत्र माहीत असते पण परदेशी पाहुण्यांना फार कल्पना नसते. अर्जेंटिनाचा व्हिसा मिळवताना मात्र आम्ही मुद्दाम ही माहिती घेऊन गेलो होतो. व्हिसा ऑफिसरनं विचारलं, तुम्ही ‘उत्तर-पश्चिमेला का चाललाय?’ आम्ही ह्या प्रश्नाची वाट पाहात असल्यासारखं उत्तर दिलं होतं, ‘सेहो दे लोस सियेते कोलोरेस बघायला!’ सात रंगांच्या पर्वतरांगा! त्याच्या चेहऱ्यावर हसू फुटलं होतं. तो म्हणाला,’काळजी करू नका, तुमचा व्हिसा पक्का झाला!’
आपल्याकडे कुठल्याही देवळाच्या आधी जशी दुकानं असतात तशी ह्या डोंगररांगांच्या आधी होती! ती टाळून तडक पुढे निघालो. ह्याआधी लडाखला त्सो-मोरिरी हा जांभळा पर्वतराज पाहिला होता पण सप्तरंगांची उत्सुकता जास्त होती. एका कोरडया नदीपात्रातून पुढे सरकलो आणि लाल रंगानं एकदम हल्ला केला! एकदम तजेलदार लाल. ह्या कोणे एके काळी अखंड असलेल्या राशीचं काळानं मोठं सुंदर रुपांतर केलं होतं. हजारो वर्षांच्या वारा पाण्यानं छोटया छोटया अगणित चिंचोळ्या शिखरांसारखा तो डोंगर दिसत होता. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी काळ बदल आणतोच! जवळजवळ सहा किलोमीटर आतमध्ये गेल्यावर अचानक उजवीकडे पिवळा रंग दिसू लागला. आणखी पुढे, आणि तो पर्वत त्याच्या समग्र रंगांत आमच्या दृष्टीला पडला. लाल, पिवळा, तपकिरी, जांभळा, थोडा फिकट जांभळा, गुलाबी आणि चक्क पांढरा! आम्ही फोटो-बिटो काढायचं थांबवून आधी डोळे भरून ते रंग पिऊन घेतले!
रंग माझा वेगळा म्हणत त्या सेहो दे लोस सियेते कोलोरेस पर्वतानं अर्जेन्टिनाच्या आमच्या समग्र प्रवासाचा जणू सारांशच समोर ठेवला. तो सांगत होता की देशाचा (किंवा माणसाचा) बाह्यरंग काहीही असेल त्याचा अंतरंग सापडला तर जगणं सापडत जाईल. ह्या जागी येता-येता आमच्या लाल रंगाच्या रोषाचं, रागाचं रुपांतर पुन्हा पहिल्यासारखं गुलाबी झालं. पांढरे झेंडे फडकवत एका शहाण्या जाणीवेनं आम्ही एकमेकांना समजावून घेतलं. आमचं प्रेम त्या पर्वताच्या जांभळ्या रंगासारखं गडद होत जाणार होतं. त्या रंगांच्या सान्निध्यात आमच्या अर्जेन्टिना प्रवासाची अखेर होत होती. केशवाय नम:, माधवाय नम: म्हणत सोडलेला हा अर्जेन्टिना संकल्प आता ‘ओम शांति:’च्या उंबरठयावर येऊन ठेपला होता. खूप वेळ तिथे घालवला. नजर जमिनीकडे गेली. त्या डोंगरांचेच विविधरंगी छोटे तुकडे सगळीकडे विखुरले होते. आमच्या अर्जेन्टिना प्रवासाच्या भरतवाक्याची आठवण म्हणून प्रत्येक रंगाचे काही तुकडे पुरचुंडीत बांधून घेतले! आरती प्रभूंची ओळ आठवली, नाव आहे चाललेली कालही अन आजही!
शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com
This was originally published in the RTW series.




