44 हॉप इन आणि ‘होप’… – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

Photos: हॉप इन आणि ‘होप’…

एका गाडीतून दुसऱ्या गाडीत उड्या मारत ‘हिचहायकिंग’ प्रवासाची मजा एव्हाना वाढत चालली होती. आम्ही तकाका शहरात अजूनही बिग अॅलनच्या प्रशस्त घरात तळ ठोकलेला. गोल्डन बेचा फारारिकी किनारा पाहायला जायचा बेत ठरला. दक्षिण बेटाचा हा सर्वांत उत्तरेचा किनारा. तुम्ही न्यूझीलंडच्या नकाशात पाहिलं तर खालच्या बेटाच्या डाव्या बाजूला एक लांब निमुळता भाग तुम्हाला दिसेल. त्याच्या शेवटच्या टोकाला फारारिकी आहे.

प्रथेप्रमाणे सकाळी अंगठे दाखवत रस्त्यावर उभे राहिलो. तकाकामधून हा किनारा ५४किलोमीटर लांब आहे. थोडया वेळानं एक गाडी थांबली पण ती अर्ध्या अंतरावरही जाणार नव्हती. तरीही थोडं अंतर पुढं जायला मिळेल म्हणून आम्ही लगेच चालकाच्या सांगण्यावरून ‘हॉप इन’ झालो. हा माणूस चित्रपट क्षेत्रात होता. तो राजस्थानला येऊन गेला होता. या बाबाला स्वतःच्या गाडीविषयीही फार प्रेम होतं. ऑस्ट्रेलियात बनवलेली ही गाडी एकदम ‘वरिजीनल’ आणली होती त्यानं! त्यानंतर मोठया प्रेमानं आपल्याला पाहिजे तसे बदल त्यात करून घेतले. गप्पा मारत असताना एका अरुंद वळणावर गाडी थांबली. आम्ही उतरलो. त्या माणसानं आम्हाला कुठं उभे राहा ते सांगितलं. आमचा निरोप घेऊन तो ज्या रस्त्यानं जंगलात दिसेनासा झाला ते पाहून आम्हाला त्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहिलं नाही. कशाच्याही आड न येणारं एकदम शांत आणि निवांत जगणं! त्यानं दाखवलेल्या जागेकडे निघालो आणि आमच्या हॉस्टेलमधलेच दोन कार्यकर्ते एका गाडीतून पुढं गेले. त्यांनी सुदैवानं आम्हाला पाहिलं आणि गाडी थांबवली. आम्ही परत ‘हॉप इन’! थोडं अजून पुढे. तरी मुक्काम लांबच होता. हे दोघं आम्हाला कॉलिंगवूड नावाच्या छोटया शहरात सोडून निघून गेले. इथून पुढचा टप्पा गाठायचा होता. कुठली तरी गाडी येईल या आशेवर आम्ही जवळजवळ दोन तास तिथं थांबून राहिलो. गाडया आल्या पण त्या आमच्या दिशेला जाणार नव्हत्या किंवा प्रवाशांनी भरलेल्या होत्या. दुपार थोडयाच वेळात कलणार होती. दोन वाजून गेलेले. आलो तेवढं पुष्कळ झालं म्हणून आम्ही परत निघायच्या तयारीला लागलो. चालत कॉलिंगवूडला गेलो. तिथंच एका बाकावर बसून पॅक करून आणलेलं खाल्लं. एक छोटी चक्कर मारायला गेलो आणि लक्षात आलं की कॉलिंगवूड हे शहर आर्ट गॅलरी आणि योगासनांचं आहे! त्यातला एका कलाकार तर रात्री प्रकाश फेकणाऱ्या साधनांवर त्यांची कला सादर करत होता! अंधारात चमकणारे ते रंग, आद्य स्त्री आणि पुरुष, त्याच्या आध्यात्मिक दृष्टीकोनातून चितारलेली काही पेंटींग्ज. या महाशयांचं मागच्या बाजूला खाऊच्या वस्तूंचं आणि फळांचं दुकान होतं. जाता जाता तिथं गेलो तर सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या. कुणीही माणूस नाही. फळ, सॉस, मार्मालेड जे हवंय ते घेऊन फळ्यावर लिहिलेली किंमत एका लाकडी पेटीत टाकून निघून जायचं! कुणी आपल्याला फसवणार नाही हा विश्वास आणि आशा! परत रस्त्यावर बाहेर पडलो. तकाकाच्या दिशेनं परत जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवायला लागलो. थोड्याच वेळात एका ‘मास्तरांनी’ आम्हाला त्यांच्या गाडीत बसवून घेतलं. हा मध्यमवयीन शिक्षक मुलांना इलेक्ट्रॉनिक्स शिकवत होता. तकाकाला तो त्याच्या दातांवर उपचार करायला चालला होता. भारतात यायची त्याची इच्छा होती. आम्ही आनंदानं त्याला यायचं आमंत्रण दिलं आणि खाली उतरलो.

थोडेसे खट्टूच होऊन हॉस्टेलमध्ये परतलो. आमचा फारारिकी किनारा राहिला म्हणून सगळे आमची समजूत काढायला लागले. परत कधीतरी नक्की जाल असं सगळे म्हणत असताना एकदम बिग अॅलनची जपानी पत्नी धाडकन आत आली. तिला हे काही पटलेलं दिसत नव्हतं. इतक्या जवळ येऊन हे पाहुणे तसेच परत गेले तर आपल्याला बट्टा लागेल या भावनेतून तिनं एकदम आम्हाला विचारलं, ‘व्हाय डोंट यू रेंट अ कार?’ आमच्या माहितीप्रमाणे इथं तशी व्यवस्था नव्हती म्हणून आम्ही त्या भानगडीत पडलोच नव्हतो. तसं आम्ही तिला सांगितलं तर तिनं थेट फोन लावून आमच्या गाडीची व्यवस्था करून टाकली. भाडयानं गाडी ही चैन हाताशी असल्यावर आता आम्हाला बंद झालेला तो रस्ता मोकाट उघडा झाला! संध्याकाळ आत्ताशी होत होती. बाई म्हणली, ‘हाणा लवकर गाडी! सूर्यास्त बघायला मिळेल!’ मोठया आशेनं आम्ही तिथून सुसाट निघालो. इतका वेळ विझलेली आशा पुन्हा पेटून उठली. एक चक्कर झालेली असल्यानं सराईतासारखे आम्ही गाडीतून किनाऱ्याकडे निघालो. जाताजाता काहीजणांना ‘हॉप इन’ म्हणत गेलो!

शेवटचे दीड किलोमीटर चालत किनाऱ्यावर पोहोचलो. सूर्यास्त व्हायचा होता. पाहातो तो काही खटपटे जपानी आपले अद्ययावत कॅमेरे त्याच्या अजस्त्र लेन्स वगैरे लावून सूर्यास्त ‘कव्हर’ करायला एकदम ‘तय्यार’ होते! ते सोडलं तर पूर्ण किनारा एकदम शांतपणे अव्वाच्या सव्वा पहुडला होता. वाऱ्यानं छिद्रं पाडलेले दोन अप्रतिम दगड एकमेकांची साथ देत तिथं उभे होते. त्याचं प्रतिबिंब खालच्या पाण्यात पडलंय. ते पाहता पाहता सूर्य आपले रंग उधळत चाललाय क्षितिजाकडे! माओरी संस्कृतीत शरीर सोडून आत्मा याच किनाऱ्यावर विसाव्याला येतो म्हणतात. त्या किनाऱ्यात काहीतरी झपाटून टाकणारं तत्त्व होतं! आम्हाला काही ते तसंच्या तसं जाणवलं नाही, पण दिवसभर आशा लावून जे मनाला स्थिर करणारं दृश्य आम्हाला अगदी योगायोगानं, एवढया कष्टानं मिळालं त्याची किंमत त्या क्षणाला त्या आत्म्याएवढी वाटत असेल कदाचित. सुरेख हुरहुरती रात्र आली आणि आम्हाला तिच्या गार मिठीत वेढायला लागली. अजून थांबू असं वाटत असूनही ती रात्र तिथंच सोडून देऊन आम्ही परतलो! आता गाडी असल्यानं आम्हाला रानच मोकळं मिळालं. दुसऱ्या दिवशी परत तिथंच गेलो. तिथून पुढं फेअरवेल केप हा इथला सर्वांत उत्तरेचा भाग आहे. सकाळच्या उन्हात चकाकणारे खडक आणि आजूबाजूला झळाळणारं निळंशार पाणी. ‘पुन्हा कधी गोल्डनबे ला इथं येऊ? येऊ, एखाद्या अशाच सकाळी कधीतरी नक्की!’ अशी आशा ठेवून तिथून निघालो. येता येता एका खोलगट जागेतली फर सील्सची कोवळी तपकिरी ‘पोरं’ पाहून मौज वाटत होती. इथं इतक्या दूरवर सुद्धा सूचना लावलेल्या होत्या, ‘प्राण्यांना हात लावू नका, त्यांना संसर्ग होईल!’

परत येताना काहीजणांना तकाकापर्यंत लिफ्ट दिली. गाडीभाडयाच्या नियमाप्रमाणं टाकीत पेट्रोल पूर्ण भरून गाडी परत करायला गेलो. तिथल्या बाईंनी हसतमुखानं स्वागत करत आमच्या अनुभवाबद्दल प्रेमानं विचारलं. गप्पा झाल्या. तिनं गाडीची किल्ली घेतली. आम्हाला वाटलं की आता ती गाडी बघायला येईल, किमान पेट्रोल भरलं का विचारेल, पण तशी काही चिन्हं नव्हती! शेवटी आम्हीच न राहावून तिला तुम्ही गाडी पाहणार नाही का, म्हणून विचारलं. तर आश्चर्य वाटल्यासारखा चेहरा करून ती म्हणाली, का? काही झालंय का गाडीला?’ आम्ही या सहज विश्वासानं अगदी गांगरून गेलो आणि आमच्याकडे असा अनुभव येत नाही म्हणून मोकळेपणानं तिला सांगितलं. ‘आम्ही पेट्रोलही भरलंय’ म्हणल्यावर ती समजुतीनं हसली आणि म्हणली, हो भरलंच असणार तुम्ही.’ हा आमचा इथला शेवटचा दिवस होता. एका आदर्श जीवनपद्ध्तीनं आमचा जणू ताबाच घेऊन टाकला होता, गरज असेल तर ‘हॉप इन’ आणि धीर सुटत असला तर ‘कीप अप द होप’! आशा ठेवा चांगली माणसं भेटण्यावर!

Photos: All Wharariki photos / हॉप इन आणि ‘होप’….

शब्दांकन : अभय अरुण इनामदार
rtw@sandeepachetan.com

This was originally published in the RTW series.

Scroll to Top