41 छोटंसं मोटुएका – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

अॅबेल टॅस्मन नॅशनल पार्कला जाताना ‘मोटुएका’ शहरात थांबलो होतो. आता परत येताना तिथंच मुक्काम करायचं ठरलं. शक्यतो हे थांबायचं ठिकाण नाही. सगळेजण नेल्सन नावाच्या मोठया शहरात परत जातात. कायतेरीतेरीच्या बस थांब्यापाशी गेल्यावर असं लक्षात आलं की मोटुएका मधूनही आपल्याला गोल्डन बे ह्या भागात जायला बस मिळेल. तिथल्या बुकिंग क्लार्कला आम्ही मोटुएका शहराची तिकिटं द्यायला सांगितली. त्यानं आम्हाला माहिती दिली की हे तिकीट नेल्सनपेक्षा तुम्हाला फक्त सव्वासात डॉलर स्वस्त पडेल. त्याचा सांगायचा हेतू हा की प्रवाशांना मोठया शहरात करायला अनेक गोष्टी असतात. आम्ही आपले हसून त्याच्याकडे पाहिलं. आता त्याला कशाला सांगा की आमचे नुसते सव्वासात डॉलर नाहीत तर सव्वासात गुणिले पंचेचाळीस रुपये वाचणार आहेत! मोटुएकात पोहोचलो तेव्हा दुपार उलटून गेली होती. सुंदराचे सोहळे पाहायच्या नादात खायचं राहून गेलं होतं. बोटीत बसल्यावर सुद्धा काही बघायचं राहायला नको म्हणून आम्ही तसेच कुळकुळत राहिलो! इथल्या हॉस्टेलमध्ये आल्यावर भुकेची चरचरीत आठवण झाली. आमच्याकडे ब्रेड, ड्रेस्ड चिकन, कोल्डकट्स होते. जेवल्यावर निवांत झालो. आता एकदम दुसऱ्या दिवशी दुपारी आम्हाला गोल्डन बे ला घेऊन जाणारी बस येणार होती.

इथल्या रिसेप्शनच्या माणसानं आम्हाला जागा दाखवताना कॉमन रूम, स्वयंपाकघर झाल्यावर मागे नेऊन ‘इथं कपडे वाळत घाला’ म्हणून चक्क दोऱ्या दाखवल्या. एरवी ह्या कामासाठी मशीन्स आणि ड्रायर्स वापरणाऱ्या विकसित न्यूझीलंड मध्ये दोरीवर कपडे वाळत घालायच्या कल्पनेनं आम्ही चांगलेच चकित झालो! इथं एक भला मोठा फ्रीज असतो. आपलं खाण्याचं सामान एका पिशवीत भरून त्यात ठेवता येतं. आपलं नाव फक्त त्यावर लिहून ठेवायचं. त्या कॉमन फ्रीजमध्ये आम्ही मोठया मोठया प्लॅस्टिकच्या पिशव्या बघितल्या. पास्ताची, पिठांची पाकिटं, अंडी असं काय काय. तुम्ही प्रवास करत असताना अशा वस्तू ठेवत नाही. आमची उत्सुकता वाढली. एज्वत असताना आम्हाला तिथं जॉन नावाचा चायनीज माणूस भेटला. त्याच्या पिशवीतून काहीबाही काढून तो स्वयंपाक करायला लागला. आम्ही संधी साधून त्याला त्या मोठया पिशव्यांबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘ह्या पिशव्या ‘WOOF’ing करणाऱ्या मुलांच्या आहेत.’ आमची टयूब लगेच पेटली! WOOF म्हणजे वर्ल्डवाईड ऑर्गनायझेशन फॉर ऑरगॅनिक फार्मिंग! फार सुरेख कल्पना. छोटीशी रक्कम भरून ‘वूफ’चे सदस्य व्हा. हयात निरनिराळ्या देशातले शेतकरीही नाव दाखल करतात. ज्या देशात शेतकरी सेंद्रीय पद्धतीनं शेती करतात त्यांच्या शेतावर काम करायला जा. तिथली शेती कशी करतात ते शिकून काम करा. त्या बदल्यात तुम्हाला शेतकरी अन्न, निवारा आणि काही मोबदला देतील! न्यूझीलंडमध्ये वाईनरीज, फळबागा, चीज बनवणारे शेतकरी असे सगळे ह्या ‘वूफ’चे सदस्य आहेत. इथले शेतकरी साधारण पंधरा दिवस तरी काम करा म्हणून आग्रह करतात. तेवढा वेळ तुम्हाला शिकायला लागतोच. आम्हीपण अर्ज केला होता. हे करण्यासाठी तुम्हाला वर्किंग हॉलिडे व्हिसा लागतो. पण भारत आणि न्यूझीलंड देशात अशी काही सोय नाही म्हणून आमची निराशा झाली होती. ह्या हॉस्टेलमधली सगळी हायस्कूल पास किंवा पदवीधर मुलं अशीच इथं काम करून राहात होती. प्रवास करा, काही दिवस शेती करा, पैसे स