23 महासागरांचे मावंदे – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

विमानात बसलोय की काय असा सुरेख सजवलेला अंतर्भाग. आरामशीर सीटस. मधूनच खाण्यापिण्याचे जिन्नस आणून देणाऱ्या परिचारिका. आम्ही नक्की बस मधूनच चाललोय ह्याची खात्री पटत नव्हती! सहज पडदा उघडून बाहेर डोकावलं की मात्र लगेच लक्षात यायचं! हांss, हा तर सपाट रस्ता आहे आणि तो बाजूनं दिसणारा; तो एक महासागर आहे! आम्ही निघालो होतो लिमा नावाच्या शहराकडे. मोठया तीर्थयात्रेहून आल्यावर पूर्वी प्रसादासाठी आप्तेष्टांना बोलावून ‘मावंदं’ घातलं जाई. आमच्या ‘महासागरांचं मावंदं’ लिमा शहरात घातलं जाईल असं वाटलं नव्हतं!

लिमा शहराकडे

इकापासून लिमा शहर साधारण चार तासांच्या अंतरावर. बऱ्याच दिवसांनी थोडे जास्त पैसे खर्च करून क्रुझ डेल सुर ह्या कंपनीच्या अद्ययावत बसमधून अतिशय सुखाचा प्रवास केला. आत्तापर्यंत दोन महिने सतत ह्या रस्त्यांवर आमच्या डाव्या बाजूला लांबलचक पसरलेल्या अँडीज पर्वतरांगा असायच्या. आता त्याची जागा निळ्याशार पॅसिफिक महासागरानं घेतली होती. मधूनच बीच रिसॉर्टच्या पाटया दिसू लागल्या. लिमा शहराविषयी कुण्या पर्यटकानं बरं म्हणल्याचं पाहिलं नव्हतं. हायवेज, काचेच्या इमारती, कॉर्पोरेट ‘कल्चर’ असं बरंच काही ऐकून होतो. पण लिमात शिरल्या शिरल्या निराळा अनुभव आला. असं चेहरा नसलेलं शहर कधी अनाहूतपणे तुम्हाला हलकं करून टाकतं. एकदम शांत शांत वाटायला लागतं. इथं काहीही शोधायचं नाही, नवीन नाही. पाहायलाच पाहिजे अशी सक्ती नाही. जायच्या वाटेवरचा एक निवांत टप्पा म्हणून आम्ही लिमा निवडलं.

झटकन हॉस्टेलची सोय लावून बाहेर पडलो. इतके दिवस इन्का संकृतीच्या कुशीत वावरत असताना अशी मेट्रो शहरं बघायला मिळाली नव्हती. एकदम अठरापगड! इथला माणूस शहरी होता. त्याला संस्कृतीशी घेणं देणं नव्हतं. पैसा, सुखसुविधा, चैन ह्याच्या मागे असलेलं कुठलंही आंतर्राष्ट्रीय शहर जसं दिसेल तसंच हे शहर दिसलं. ह्या ‘पेरू’ची चव आम्हाला ‘म्हमईकर’ असल्यानं चांगलीच माहीत होती. केनेडी पार्कला गेलो. इथलं ‘हँगआऊट’चं लाडकं ठिकाण. वायफाय आणि संगीत मोफत! हादडायची सोय. अजून काय हवं. एका खुल्या नाटयमंचावर एक होतकरू गायक गात होता. बसून ऐकत राहिलो. अचानक गर्दीत ओळखीचे दोन चेहरे चमकून गेल्यासारखे झाले. माचूपिचूला आम्हाला भेटलेलं ते इराणी हॉटेलवाल्याचं ‘पोर’ आणि त्याची कॅनेडीयन बायको! त्या गर्दीचे सूर जरा आता कुठं बरे वाटायला लागले. त्याच वेळी काही म्हातारेकोतारे रंगमचावर दाखल झाले. ‘हे काय आता’ म्हणत आम्ही निघणार इतक्यात स्पॅनिश गाण्याचे काही बुलंद स्वर मंचावरून उधळले गेले आणि आम्ही आपोआप थांबलो. ती सगळी उर्जेनं भरलेली मंडळी फक्त शरीरानं वयस्क होती. त्यांचे सूर आणि मनं एखादया वसंतातल्या कोवळ्या पालवीइतकी रसरशीत हिरवी होती. इतकी की गाणं सुरु झाल्यावर काहीच मिनिटांत त्यांनी गर्दीचा ताबा घेतला. दोन बायका उठून चक्क नाचायला लागल्या. इतरही मग सामील झाले. गात गात जवळजवळ तासभर धमाल उडून गेली.

दुसऱ्या दिवशी बारानकोस नावाच्या भागात आमचा बाडबिस्तरा हलवला. ‘तुमच्याकडे वायफाय मिळत नाही’ ह्या कारणावर हॉस्टेल सोडता येतं इथे! म.टा.च्या लेखाची सोय लावणं आमच्यासाठी फार महत्वाचं असतं! शहराचा हा भाग जास्त कलात्मक होता. बसमधून उतरल्या उतरल्या हे लक्षात आलं. रंगीबेरंगी घरं. ग्राफिटीमय भिंती आणि रुचीनं सजवलेली कॅफेज. पण हे सगळं सोडून आम्हाला एका निराळ्याच गोष्टीनं खेचून नेलं.

पेरूच्या आणि एकूण अमेरिकास खाद्यसंस्कृतीचा एक महोत्सव तिथं भरला होता. आम्ही लगेच जमा झालो! खाण्याची बात येते तेव्हा पाहणं थोडं कमी झालं तरी चालेल ह्या मताचे आम्ही दोघंही असल्यानं लगेच स्टॉल्स धुंडाळणं सुरु. लिमातली सर्वोत्कृष्ट मासळी खायला आम्ही एका ‘दुकानी’ गेलो. सर्वांत मोठया माशाची डिश मागवून त्याची चव घेतली आणि थोडी निराशाच झाली. आपल्या सुरमई फ्रायच्या मानानं ही मासळी अगदीच ‘उथळ’ निघाली! ‘सेविचे’ ह्या कच्च्या मासळीच्या कोशिंबीरीसारखी एक डिश पण दिसली. सेविचे ही पेरूची राष्ट्रीय खाद्यकृती. पांढरं मांस असलेल्या माशाचे कच्चे बारीक तुकडे. त्यात मीठ, मिरची आणि मिरपूड घातलेली. एकत्र करून खायच्या आधी फक्त भरपूर लिंबू पिळून त्यात थोडं मुरलं की लगेच खायची. हे खाणं ताजंच संपवायचं, अगदी लगेच! आम्हाला मोह झाला होता कारण आधीची ह्याची चव जिभेवर होती. त्या स्टॉलवरची सेविचे मात्र बराच वेळ आधी तयार केलेली दिसत होती म्हणून टाळली.

ह्यानंतर एकमेकांच्या नादानं पुढे आम्ही खात खिलवत राहिलो. ‘अँतिकुचो’ नावाचा एक ‘बडा’ पदार्थ बराच वेळ खुणावत होता. मेनुकार्डवर एकदम ठळक दिसायचा. आम्हाला उत्सुकता होती. तिथंच एक पेरुनिवासी शांत चित्तानं काहीतरी रिचवत बसलेला आढळला. आम्ही सहज त्याला ‘अँतिकुचो’ म्हणजे काय रे भाऊ’? असा बरेच दिवस मनात घोळणारा ज्ञानसंपादनात्मक प्रश्न विचारलाच. तो म्हणाला ‘दिल थामके सुनो’! ‘अँतिकुचो’ चक्क गुराच्या हृदयापासून बनवतात. स्टेकसारखाच लागणारा हा पदार्थ खरोखर अतिशय दिलदारीनं बनवला गेला होता. ह्या बडया चमचमीत खाण्यानंतर जिभेला गोडाचे डोहाळे लागले! पिकॅरोन्स नावाचं एक कुरकुरीत डोनट आमच्या जिभेची सगळी अग्रं स्पर्शून गेलं. भोपळा, कॉर्न सिरप आदी पदार्थ मिसळून केलेला हा प्रकार बाहेरून एकदम सोनेरी आणि कुरकुरीत. त्याचा तुकडा तोडला की आत अगदी मऊ आणि हलकं. आम्ही ह्या पिकॅरोन्स मध्ये विरघळून गेलो. ‘चिचा मोराडा’ असं विचित्र नावाचं पेयही प्यायलो. हे म्हणे काळ्या मक्यापासून तयार करतात. चवीला अननस, साखर आणि वेलची!

जेवणं आकंठ झाली होती. आळसावल्या पावलांनी बारानकोसच्या गल्ल्यांमधून निवांत भटकत होतो. जुनी घरं, चर्चेस, बागा असं मागं पडत होतं. एका उंच जागेवर येऊन पोहोचलो. आपल्या हँगिंग गार्डनहून जसा राणीचा रत्नहार दिसतो तसा नजारा होता! समोर पसरलेला ‘पॅसिफिक’ महासागर. अचानक लक्षात आलं, ‘पॅसिफिक’? आम्ही चक्क ‘पॅसिफिक’ महासागर बघत होतो! अटलांटिक मागे पडला. अटलांटिकच्या काठाकाठानं आम्ही सगळ्या दक्षिण अमेरिका खंडाची जणू परिक्रमा करत ह्या महासागराला भेटायला आलो होतो. आमची परिक्रमा पूर्ण होत चालली होती. वेगानं उतरत समुद्र किनाऱ्यापाशी आलो. भरल्या पोटाचा तृप्तपणा त्या थंडगार वातावरणात अजूनच सैलावला. हा तृप्त भाव! हे परतीचे वेध तर नव्हेत? कदाचित! केवळ दहा पावलांवर तो महासागर आणि त्याच्याच प्रसादानं तुडुंब भरलेली क्षुधा! दोन महासागरांच्या तीर्थाचं मावंदं जणू इथंच घालून दर्शनाला आल्याची ही भावना होती. अजून प्रवास भरपूर बाकी होता पण तो परतीचा. हे शेवटचं पुढं जाणं. इथून आता उलटया दिशेनं मागे वळायचं!

पॅसिफिकच्या पाण्यात पाय बुडवताना एक धन्य भावना मनात दाटून आली. ही भावना सांगायला आमच्याबरोबर आमचे औट घटकेचे का होईना पण ‘दोस्त’ होते ह्याचा आनंद होता. सूर्यास्ताचं भरतवाक्य, गर्भनिळं पाणी, मिटल्या डोळ्यांनी सायुज्यमुक्तीचं आश्वासन देणारा ख्राईस्ट रिडीमर. अटलांटिकच्या किनाऱ्यावरच्या त्या आठवणी संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात झळाळू लागल्या. काही महिने, काही देश, काही पैसा आणि धोधो अनुभवातलं सचैल न्हाण! आम्ही पॅसिफिक महासागराला हे सगळं इदं न मम म्हणत अर्पण केलं.

९०० शब्द
vachak.vishesh@gmail.com / rtw@sandeepachetan.com
छायाचित्र : संदीपा आणि चेतन शब्दांकन : अभय अरुण इनामदार
Photos: http://photos.sandeepachetan.com/keyword/Article23/