19 संस्कृतीच्या मांडवाखाली – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

देश बोलिव्हिया पाहून संपला! ‘गडी’ रांगडा पण फार अबोल. कधी मोकळा म्हणून वागलाच नाही लेकाचा. काय मनात घेऊन बसला होता कुणास ठाऊक. खुलून स्वागत करता झाला नाही. चार शब्द हसून फेकायला महाग! आम्हीही जसा वाटयाला आला तसा पत्करला. इथल्या स्थानिकांचा पाहुण्यांविषयीचा भाव अतिशय कोरडा आणि थंड होता. मन भारून टाकणाऱ्या अनेक अनुभवांत हीच एक कसर राहून गेली. एखादया गूढ, अबोल इसमासारखा आम्हाला गुंगारा देत प्राचीन इन्का संस्कृतीची झलक दाखवत तो मागे पडला. आम्ही पेरुकडे निघालो.

पेरू : इन्काचं माहेरघर

बोलिव्हिया-पेरू सीमेवर एका बोलिव्हियन ‘येरू’नं आम्हाला पासपोर्ट समोर धरून ताटकळत ठेवलं. त्याला स्वतःच्याच देशाचा आमच्या पासपोर्टवर मारलेला शिक्का दिसेना! ‘बुस्कार’, म्हणजे ‘शोधा’ म्हणत त्यानं आम्हालाच पासपोर्टवर त्याच्या देशाचा शिक्का दाखवायला लावला. पाहुण्यांविषयीच्या अनास्थेचा हा शेवटचा बोलिव्हिअन अनुभव ठरला. मुकाटयानं पुढं निघालो तर पेरूच्या सीमेवर लगेच हसून आमचं स्वागत झालं. ‘पेरूत पहिल्यांदाच आलात का?’ विचारत भरल्या तोंडानं शुभेच्छा झाल्या! वास्तविक पेरू आणि बोलिव्हिया एकाच महान इन्का संस्कृतीचे पाईक. पण वागण्या बोलण्यातला फरक दिसून येऊ लागला. का हा आमच्या दृष्टीचा भ्रम होता? कारण तशा अर्थानं बोलिव्हिया मागास असूनही इन्का संस्कृतीच्या भाषा, चालीरीती, पोशाख टिकवून होता. आम्हाला क्वेचुआ किंवा स्पॅनिश येत असतं तर बोलिव्हियाची कळी खुलली असती का? पुढारलेल्या पेरूत संस्कृती केवळ पर्यटनाच्या दावणीला तर बांधली गेलेली नाही ना? प्रश्न त्रास देऊ लागले. ते हळूहळू सुटणारच होते. आम्ही आपले ‘कुस्को’च्या प्रवासाला लागलो. पेरूतील, किंबहुना दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात ऐतिहासिक शहर. प्राचीन इन्का साम्राज्याची राजधानी.

पहाटे कुस्कोला उतरताक्षणी ट्रॅव्हल-हॉटेल एजंटस् चा सुळसुळाट पाहून कळून चुकलं की आम्ही एका पर्यटकांनी गजबजलेल्या शहरात आलो आहोत. संस्कृतीच्या खुणा वगैरे पाहाणं ठीक आहे, पण वस्तू विकू पाहणाऱ्या माणसांना टाळणं हे इथलं सगळ्यात मोठं आव्हान आहे! एका दिवसाची सोय आम्ही करून ठेवली होती. आमच्या टॅक्सी ड्रायव्हरनं आम्हाला फार प्रेमानं वागवलं. हॉस्टेल आल्यावर घंटा वाजवून आम्ही आत जाईपर्यंत उभा राह्यला. ‘आमचं शहर ‘भारी’ असून तुमचा वेळ फार छान जाईल’ असं आश्वासन देऊन तो आमच्या खिशाला मोठ्ठं भोक पाडून निघून गेला. बहुधा त्याच्या पुढच्या सगळ्या दिवसाची बेगमी एकाच ‘गिऱ्हाईका’त झालेली दिसली! ‘चला, कुणीतरी गेला बाजार आपलं स्वागत केलं आणि बोललं तरी’ म्हणून आम्ही ते मोठ्ठं छिद्र आमच्या समाधानाच्या बारीक धाग्यानं तुरपलं! हॉस्टेलमध्ये साओ पावलो, ब्राझीलमधली दोन जोडपी भेटली. आमचा प्रवास ह्याच शहरापासून सुरु झाला असल्यानं विशेष आपुलकीनं गप्पा झाल्या. तिथंच एक अचाट कुटुंब भेटलं. मायकल, गॅब्रिएला आणि त्यांची अकरा वर्षांची एलेना ही मुलगी. अमेरिकेतून दहा महिन्यांच्या दौऱ्यावर निघालेलं हे कुटुंब स्थानिक शाळांमध्ये जाऊन विदयार्थ्यांना आपली कला सादर करायला प्रोत्साहन देतं. #studio everywhere ह्या ब्लॉगच्या माध्यमातून ही कला जगाला प्रस्तुत करतं. अकरा वर्षांच्या एलेनासाठी हा किती मोठा अनुभव आहे ह्याची जाणीव होऊन आम्ही थक्क झालो. प्रचलित पद्धतीच्या वर नेणारं जगण्याचं शिक्षण! कदाचित त्यांच्या देशाचा ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ त्यांना योग्य प्रकारे कळला असावा. अमेरिकेचा १७७६ सालचा हा जाहीरनामा तुम्हाला आनंदाचा पाठपुरावा करायचा हक्क देतो! तोच हक्क बजावणारं इतकं मनस्वी कुटुंब प्राचीन इन्का संकृतीच्या राजधानीत आम्हाला भेटावं हा योगायोग विलक्षणच.

कुस्को: एक धांडोळा

ऐतिहासिक महत्वाच्या ह्या शहरात कमीत कमी बारा तरी पाहण्यायोग्य संग्रहालयं होती. ती बाजूला सारून आम्ही शहरात हिंडू लागलो. शहराचं प्रतिबिंब मनात पडत होतं. आधीच्या अनेक गोष्टींचा धांडोळा घेऊ लागलो. स्पेनच्या वसाहतीतलं साम्य लक्षात आलं. मोठं शहर वसवताना एक प्रशस्त घडीव चौक किंवा एक महत्वाची इमारत (सेन्ट्रल प्लाझा) आणि तिथून सूर्यकिरणांसारखं पसरत गेलेलं शहर. कुस्कोतही आम्ही ‘प्लाझा दे आर्मास’ ला भेट दिली. तिथून पुढचे दोन दिवस आम्ही रोज तिथंच जात राहिलो! भरपूर पाहायला आणि अनुभवायला होतं.

मुख्य चर्चच्या, कॅथेड्रलच्या आजूबाजूला चक्क चौदा चर्चेस त्याचा पदर धरून उभी होती. एकजात सुंदर. अॅन्डीज पर्वताच्या फत्तरापासून घडलेली. भिंतींवर उत्तम कलाकुसर. पण एकदम एका ठिकाणी इतक्या प्रार्थनास्थळांचा अर्थ लागेना. नंतर कळलं की आधी ही सगळी चर्चेस म्हणजे इन्का धर्मसंस्कृतीची प्रार्थनास्थळं होती! जेत्याचा पहिला प्रहार जिताच्या धर्मावरच होतो. धर्म हा सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा भावनिक आधार असतो. त्याचा धर्म हिरावला गेला की तो पराभूत होतो आणि जेत्यांचा धर्म आणि नवी संस्कृती स्वीकारायला तयार होतो. हा इतिहास इथलाच नाही तर जागतिक आहे. ह्या सत्याची जाणीव मात्र कुस्कोच्या अप्रतिम सुंदर चर्चेसच्या इमारतींनी दिली. फोटो काढायला बंदी असल्यानं नुसत्या डोळ्यांनी टिपत होतो. क्वेचुआन कलाकारांच्या आविष्कारानं ह्या इमारती नखशिखांत मढलेल्या दिसल्या. पण प्रतीकं सगळी कॅथॉलिक. पद्धतशीर कलाशिक्षण देऊन कलाकारांकडून काढून घेतलेली. आपलं साधं नावही त्या कलेला दयायची मुभा नाही. असे अनेक अज्ञात कलाकार आणि त्यांची कला जागोजाग विखुरलेली. प्रसिद्ध क्वेचुआन कलाकार मार्कोस झपाटानं रेखाटलेलं ‘द लास्ट सपर’चं पेंटिंग पाहात आम्ही उभे होतो. अचानक असं कळालं की येशूच्या पुढयात असलेलं गिनिपिग हे इन्काच्या खाद्य संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे. आपल्या संस्कृतीचा मनात झिरपणारा साधा झरा त्या कलावंतानं सहज नवीन संस्कृतीत मिसळून दिला आणि त्याला एक नवं परिमाण दिलं! येशू ख्रिस्त कायमचा ह्या भूमीचा होऊन गेला. नवा धर्म समाजजीवनात झिरपू लागला.

वसाहतींची अनेक रूपं समोर येत होती. बोलिव्हियानं आपलं ‘इन्का’पण जपलं आणि विकास-प्रगतीला हेतुपूर्वक बगल दिली. पेरूतल्या कुस्को आणि तत्सम इतर शहरांनी मात्र नावापुरतं किंवा पर्यटनाच्या सोयीसाठी इन्का नाव वापरणं पसंत केलं. काय खरं आणि काय खोटं?

‘भारतीय’ चिंतन

आमच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखी झाली. क्वेचुआ ही बोली भाषा असल्यानं त्याचं संगोपन आणि संवर्धनाचा प्रश्न अवघड आहे. तरीही प्रयत्न चालू आहेत. संस्कृती जपली जातीये. असाच विचार करता करता लक्षात आलं की इन्का संस्कृती ‘फक्त’ पाचशे वर्षं जुनी आहे! भारतीय म्हणून आपण आपली ‘संस्कृती’ किमान पाच हजार वर्षं तर सहज लांब दाखवू शकतो! म्हणजे आपल्या अस्तित्वाचे पुरावे आपण किमान इतकी हजार वर्षं जपले, जोपासले आणि परकीय आक्रमणातून ही सगळी प्रतीकं जगवली. जेत्यांच्या जगण्याचं त्यात मोठं प्रतिबिंब पडलं पण जेतेही शेवटी इथंच मिसळून गेले. भारत दिवसेंदिवस पाश्चिमात्य जीवनपद्धतीचा अनुनय करतोय. जे चांगलं आहे ते बाहेरून स्वीकारताना आपल्या इतक्या समृद्ध ‘जीवना’चा ऱ्हास आपण आपल्याच हातानं करत नाही ना हे पाहाणं गरजेचं आहे. प्लाझा दे आर्मासच्या सुरेख कॅथेड्रलच्या भिंतीला टेकून आम्ही विचारांची भरपूर चक्रं फिरवली. वारा जोरदार वाहात होता!
एकदम असं वाटून गेलं की संस्कृती अशी सफरचंदासारखी हातात घेऊन दाखवायची गोष्ट थोडीच आहे?! संस्कृती प्रवाही असते. ती काही फ्रीजमध्ये गोठवून ठेवून टिकत नाही. रोजच्या रोज नवीन आव्हानांचा सामना करत लवचिकपणे ती आपला मार्ग काढत पुढं जाते. काही गोष्टी काळाच्या ओघात टिकून राहतात, काही नष्ट होतात. ज्या गोष्टी टिकतात त्या अनाहूतपणे इथल्या माणसांच्या वागण्या- बोलण्यातून दिसून येतात. आपण माणसं पाहात जावीत.. अमेरिकेची, बोलिव्हियाची, पेरूची आणि भारताची पण! संस्कृती आपोआप मागे मागे येईल, कळत जाईल.

vachak.vishesh@gmail.com / rtw@sandeepachetan.com

छायाचित्र : संदीपा आणि चेतन
शब्दांकन : अभय अरुण इनामदार

Photos: http://photos.sandeepachetan.com/keyword/Article19/