24 ‘अमेझिंग’ अॅमेझॉनकडे – राउंड द वर्ल्ड- एक विश्व वारी

ती नदी प्रचंड आहे! अनेक आश्चर्यांनी भरलेली आहे. हिरव्याकंच जंगलाच्या पसरलेल्या गालीच्यावरून एखादया भारदस्त राणीनं दिमाखानं, डौलानं जावं तशी चार देशातून ती वाहात वाहात महासागराला भेटायला जाते! तिच्या काठावरचं अजब जगणं बघत बघत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. ‘अॅमेझॉन’ खरोखर ‘अमेझिंग’ आहे हे आमच्या डोळ्यांनी पाहणार आहोत. घरी परतायच्या तारखा ठरल्या! भारतासाठी विमानाची तिकीटंही ‘कन्फर्म’ झाली. आम्ही ब्राझीलमधून घरी जाणार. पण त्याला अजून वेळ आहे.

वाट चालावी चालावी

अॅमेझॉन नदीचं आकर्षण दक्षिण अमेरिका खंडात पाय ठेवल्या दिवसापासून मनात होतं. आता प्रत्यक्षात जाता येणार होतं. पण जाणार कसं? खरंच जाता येतं का इतक्या देशांच्या सीमा पार करून? कुठून सुरुवात करायची? अगदी काहीच माहीत नव्हतं. लिमा शहरात माहिती गोळा करायला लागलो. तारापोतो नावाच्या ठिकाणी जायचं. तिथून पुढे चार तासांवर अॅमेझॉनचा प्रवास सुरु करता येतो. कळल्या कळल्या आम्ही लगेच बस बुक करायला धावलो. बस सर्व्हिस म्हणल्यावर हॉस्टेल ट्रॅव्हल डेस्कच्या मुलीनं लगेच नाक मुरडलं. ‘अहो फ्लाईटनं लगेच पोहोचाल.’ आम्ही विचारलं, ‘पण बस जाते ना?’ तिचं उत्तर, ‘हो, अठ्ठावीस तास लागतील! आम्ही लगेच सांगितलं, ‘मग दोन तिकीटं दया!’ तिनं हताशपणे आमच्या वेडेपणाला मान हलवली.

तारापोतोची बस बरी होती म्हणायची. म्हणजे ह्याहून वाईट आम्ही मागे अनुभवून आलो होतो. इथली स्वच्छता तुलनेनं चांगली होती. त्यात परत तपकिरी वैराण उघडावाघडा प्रदेश आता गच्च हिरवा झाला होता. आपल्या पश्चिम घाटासारखा. डोळ्यांना गार वाटत होतं. किनारे, पर्वत आता मागे पडले होते. हिमालय असो वा अँडीज, अनुभव दोन्हीकडे सारखाच. रस्ता आता आम्हाला अॅमेझॉनच्या खोऱ्याकडे खोल खोल घेऊन चालला होता.

दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी बस नाश्त्यासाठी एका ‘टपरी’वर थांबली. आम्ही काही दिवस अॅव्हाकॅडो नावाच्या झकास फळावर सपाटा लावला होता. थोडं मीठ, मिरपूड लावून एकदम मस्त लागतं! आम्ही आपले ते अॅव्हाकॅडो आणि इतर काही सटरफटर खात तिथं उभे. बाकी सगळे काही तरी यायची वाट पाहात होते. त्या टपरीतल्या बाईनं त्यांच्यासमोर डिशेस आणून ठेवल्या. सगळ्यांना ‘फिश सूप’ आणि भात! एक तळलेलं केळं. बस्स एवढंच! मला पोहे नको शिरा हवा, नको मी वडाच खाते, चटणीमध्ये कढीलिंब नको असले लाड नाहीत. आहे ते, आहे तसं. आपल्या खाण्याच्या टपरीवरही किमान आठ दहा ‘व्हरायटी’ मिळते आणि इथे निमूट मान खाली घालून लोक तो एकच पदार्थ खात होते. ह्या विरोधाभासाची मजा वाटली आणि आपल्या तिखट वडापाव, मिसळीची चरचरीत आठवणही झाली!

तारापोतोत निवांत होतो!

सरत्या दुपारी तारापोतोत पोहोचलो. खूप उकडत होतं. इथल्या एल अाचुअाल हॉस्टेलला येणारे आम्ही पहिले भारतीय पाहुणे होतो. साध्या खोल्या, आजूबाजूला गर्द झाडी आणि वाहणारा झरा. आम्ही रमून गेलो. बाजारात जाऊन फळफळावळ, शहाळी, फ्रेंच ब्रेड अशी जंगी खरेदी केली. ते झाल्यावर फार काही करायला नव्हतं. मग झऱ्याकाठी आणि बाजूच्या जंगलझाडीत भटकंती घडली. काही नाही म्हणून आजारी पडून घ्यावं तसं दोन दिवस आजारीही पडलो!

अज्ञानात फार सुख असतं ह्याचा अनुभव आला. रात्री जेवायला हाॅस्टेलवर एकत्र बसलो होतो तेंव्हा एक फ्रेंच बाई भेटली. ती आम्हाला सहज प्रवासाविषयी विचारू लागली. लिमापासून तारापोतोचा आमचा बस प्रवासाचा रस्ता आम्ही तिला सांगितला. तिचे डोळे विस्फारले गेले. मात्र तिनं नंतर जे सांगितलं त्यानं आमचे डोळे बाहेर यायचेच बाकी राहिले होते! आम्ही ज्या रस्त्यानं आलो होतो तो इथल्या अंमली पदार्थांच्या चोरटया वाहतुकीचा ‘हायवे’ होता! एरवी बसेस त्या रस्त्याला वळसा घालूनच जातात. तीन चार तास जास्त लागतात पण ते सुरक्षित असतं. काही झालं असतं तर? ह्या विचारानंच धडकी भरली आणि मनातल्या मनात आम्ही त्या तस्करांचे आभार मानले. जसं ह्या चोरांनी आम्हाला टाळलं तसं आम्हीही एक विधी टाळला. आयाहुआस्का नावाचा काढा पिण्याचा एक विधी, ज्यात मांत्रिकाच्या, ‘शमन’च्या मदतीशिवाय आपण काही केलं तर त्याचे भयंकर परिणाम होतात. योग्य मांत्रिकासोबत हा काढा प्यायला की जिझस पाण्यावर चालून दाखवतो , आणि संगीताचे रंग दिसायला लागतात असं म्हणलं जातं! आम्ही म्हणलं, ‘जाऊ दे, पुढच्या वेळी करू!’ (ही पळवाट छान असते…!)

नदीकाठावरून

अॅमेझॉनच्या पात्रातला प्रवास युरीमागुआस नावाच्या छोटया शहरातून सुरु होतो. तिथं पोहोचलो तेव्हा उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात फेरफटका मारला. बाजार जोमात चालू होता. फळं, भाज्या, गुरं, मासे, किराणा, असं कायकाय. आम्ही निवांत भटकलो. खायच्या प्यायच्या वस्तू आणि दोन झोपायचे झुले घेऊन आलो. लागणारच होते ते!

हे शहर अॅमेझॉन खोऱ्यासाठी फार महत्वाचं आहे. इथून बोटीनं निघालं की इकीतोस ह्या मोठया शहरापर्यंत अॅमेझॉनच्या काठावर असंख्य खेडी आणि माणसं वसली आहेत. त्या सगळ्यांचं रोजचं जगणं ह्या शहरातून येणाऱ्या बोटींवर अवलंबून आहे. त्यामुळे इथून रोज यच्चयावत गोष्टींचा पुरवठा केला जातो. आम्हीही अशाच एका बोटीतून प्रवास करणार होतो! तिथं जाऊन पोहोचलो तेव्हा एकच धमाल उडाली होती. कांदे बटाटयांची पोती, प्यायचं पाणी, तांदूळ आणि बरंच काही धडाधड बोटीवर चढवलं जात होतं. घामात न्हायलेली माणसं पटापट हात उचलत होती. रांग धरून तरुण दणकट पोरं, म्हातारी, लहान पोरं, खलाशी असे सगळेच कामाला भिडलेले. थांबायला वेळच नाही. ह्या बोटीला तीन चार मजले. तळात आणि पहिल्यावर ‘माल’ ठासून भरलेला, आमच्यासारखे प्रवासी दुसऱ्या मजल्यावर आणि सगळ्यात वर सुकाणू. दुसऱ्या मजल्यावर धर्मशाळेत लावतो तशी आमची झुल्याची पथारी लावली. इथे खायची प्यायची व्यवस्था आहे, फक्त जेवायला आपापली भांडी घेऊन जायचं म्हणे!

बोट संध्याकाळी सुटणार म्हणून गावात फिरायला गेलो. भूक लागली होती आणि तहानही. सरळ एक लिटरचा आईस्क्रीमचा डबा आणला! एका बाकावर बसून इकडंतिकडं बघत फस्त केला. तिथंच थोडा वेळ पेंगून परत आलो तर काम चालूच, पण आता सहप्रवासी आले होते. नॉर्वेची ज्युलिया, स्वीडनचं एक जोडपं, पेरू-पोलंडचं एक ‘ट्रान्स-नॅशनल कपल’ कॅनडाचा डेव्हिड अर्जेन्टिनाची कारो आणि सायकलीस्ट विली. सगळं विश्व संमेलन. सगळ्यांच्या डोळ्यात चमक होती! अॅमेझॉन त्यांच्याही मनात आमच्यासारखंच स्पंदत होतं. असं लक्षात आलं की बोट आज सुटणार नाही. फार तर उदया सकाळी आठपर्यंत सुटेल. आमचा अमेझिंग अॅमेझॉनचा प्रवास अजून थोडा लांबणीवर पडला.

दुसऱ्या दिवशी सकाळीही ती धांदल चालू राहिली. आठ, नऊ, दहा..करता करता बारा वाजले. अचानक शांतता झाल्यासारखी वाटली. पाहातो तो किनाऱ्यावरचे सगळे ट्रक रिकामे, गडबड कमी झालेली. इथून आता निघायचं. मनात एकाच वेळी आनंद आणि दु:ख दाटलं. पुढचे काही दिवस आम्ही पाण्यावर. बोटीनं खुश होऊन एक भोंगा दिला आणि बोट हलली! ‘आता कधी परत यायचं?’ असं मूक विचारणारे किनारे सोडून आम्ही जगातल्या एका विशाल नदीच्या आमच्या आकलनासाठी निघालो होतो.

vachak.vishesh@gmail.com / rtw@sandeepachetan.com
छायाचित्र : संदीपा आणि चेतन शब्दांकन : अभय अरुण इनामदार
Photos: http://photos.sandeepachetan.com/keyword/Article24/